PUB-G च्या नादाला लागून एकाने आईचा खून केला, तर एकजण येडा झाला : त्या ५ घटना
वाचलं तरी अंगाला काटा येईल अशी घटना. पूर्ण वाचण्याचीही अनेकांची हिम्मत झाली नसेल. १६ वर्षांचं पोर. त्याने स्वतःच्या आईला कोणताही विचार न करता धाड धाड गोळ्या घातल्या. त्याची नऊ वर्षांची बहीण सर्व बघत होती. तिलाही धमकावून शांत केलं.
जर कुणाला काही सांगितलं तर वाईट परिणाम होतील. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून तो रूम फ्रेशनर वापरत होता.
हे सगळं करण्याचं कारण काय?
तर आईने पब्जी खेळण्यास मनाई केली म्हणून…!
काल ८ जूनला दिवसभर जिकडे तिकडे हीच बातमी फिरत होती. लखनौच्या यमुनापुरम कॉलनीमध्ये एक महिला दोन मुलांसह राहात होती. तिचे पती ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर असून ते पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत. तिच्या मुलाला पब्जी गेम खेळण्याचं व्यसन होतं. त्याच हेच व्यसन तोडण्यासाठी आई नेहमी पब्जी खेळण्यापासून त्याला थांबवत असे.
मात्र मुलाचं व्यसन इतक्या टोकाला गेलं होतं की, त्याच्या ओघात त्याने स्वतःच्या आईलाच वडिलांच्या लायसन्स पिस्तुलातून गोळी झाडून मारून टाकलं. दोन दिवस ते प्रेत तसंच खोलीत पडून होतं आणि हा मुलगा त्याच्या बाजूला बसून पब्जी खेळत होता. दोन दिवसांनी प्रेतातून वास येऊ लागल्याने त्याने आपल्या वडिलांना फोन करून कळवलं.
वडिलांनी तात्काळ शेजारच्यांना बातमी कळवली आणि त्यांनी पोलिसांना. पोलीस घरी आल्यावर मुलाने खोटेनाटे उदाहरण द्यायला सुरुवात केली मात्र अखेर त्याला मान्य करावं लागलं.
पब्जीच्या व्यसनामुळे आपण काय करतोय याचं भानही त्या मुलाला राहिलं नाही आणि इतक्या टोकाचं पाऊल या मुलाने उचललं. टेक्नॉलॉजी येतेय तशी ती खूप माणसातील माणूसपण आणि भावना कशा शून्य करत जातेय याचंच हे उदाहरणं.
हे काही पहिलंच उदाहरण नाहीये. पब्जीच्या आहारी जाऊन अशा अनेक भयानक घटना घडलेल्या आहेतच…
१) गेल्या डिसेंबरमध्ये पालघरच्या विरारमध्ये या खेळामुळे मृत्यू झाला होता.
दीपक दौडे असं मुलाचं नाव असून त्याच वय २३ वर्ष होतं. तो स्वतः पब्जी ऍडिक्ट होता. दोन वर्षांपूर्वी त्याने हा खेळ खेळायला सुरुवात केली होती आणि तो त्याच्या आहारी गेला की, दिवस-रात्र पब्जी खेळू लागला.
याच सतत गेम खेळल्यामुळे त्याला निद्रानाशाचा त्रास देखील सुरू झाला होता.
झोप येत नसल्याने डॉक्टरांनी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मात्र या व्यसनाने मानसिक संतुलन बिघडत गेलं आणि एक दिवस त्याने गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टर्स त्याला वाचवू शकले नाही.
२) अजून एक घटना मथुरेतली…
पब्जी सारख्या ऑनलाईन गेम्समध्ये एकमेकांशी स्पर्धा केली जाते. याच स्पर्धेने अनेकदा मित्रामित्रांमध्ये भांडणं देखील होतात. अशीच स्पर्धा दोन मुलं एकमेकांत करत असताना त्यांचा ट्रेन खाली येऊन चिरडल्या गेल्याची घटना मथुरेत घडली होती.
सकाळी मॉर्निंग वॉकला जातोय म्हणून ही मुलं घरातून निघाली होती. दोघंही किशोरवयीन फक्त १४ वर्षांचे. गौरव आणि कपिल कुमार अशी त्यांची नावं. बाहेर जाऊन पब्जी खेळात त्यांनी स्पर्धा लावली आणि खेळामध्ये ते इतके व्यस्त झाले होते की ट्रेनच्या पटरीवरून जातोय हे देखील त्यांच्या लक्षात आलं नाही आणि ट्रेनचा आवाजही त्यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही.
या दुर्घटनेचे कोणतेही साक्षीदार पोलिसांना सापडले नाहीत. परंतु फोनमध्ये PUBG चालू असल्यामुळे या दोघांचा अपघात गेम खेळण्यामुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावला होता.
३) २०१९ मध्ये तर एका फिटनेस ट्रेनरने स्वतःला मारहाण केली होती.
जम्मूतील एका फिटनेस ट्रेनरला पब्जीचं इतकं वेड लागलं होतं की तो १० दिवस तो जवळपास नॉनस्टॉप हा खेळ खेळत होता. हळूहळू त्यांना मानसिक त्रास होऊ लागला, त्याच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं. एक दिवस तर त्याने एक फेरी पूर्ण झाल्यानंतर स्वत: ला मारहाण करण्यास सुरवात केली, ज्यात तो जखमी झाला.
त्यानंतर त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले होतं की, त्याचं मानसिक संतुलन असं बिघडलं होतं की तो आजूबाजूच्या लोकांना देखील विसरू लागला होता. त्याला दिवसरात्र पब्जीच्या बॅटल ग्राउंडवर असल्यासारखा भास होत होता.
४) एक तर इतकी विचित्र घटना आहे की पब्जी खेळणाऱ्या मुलाने पेपरमध्ये गेम लिहिला होता…
कर्नाटकातील एका मुलाचा अर्थशास्त्राचा पेपर होता. पेपरमध्ये ‘जीडीपीबाबत सविस्तर माहिती द्या’ अशा प्रश्न विचारला होता. मात्र तेव्हदेखील त्याच्या डोक्यात पब्जी गेम सुरु असताना त्याने उत्तरात ‘पब्जी कसा खेळावा? खेळताना काय करावे आणि काय करू नये? हे लिहिलं.
हा मुलगा अभ्यासात हुशार होता कारण त्याने एसएसएलसी परीक्षेत टॉप केलं होतं. परंतु जेव्हापासून त्याने पब्जी खेळायला सुरुवात केली तो आजूबाजूच्या गोष्टीतही पब्जी शोधायचा. पब्जी त्याच्या विश्वाचं केंद्र बनलं आणि त्याने आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा मागोवा गमावला. त्याला असं व्यसन लागलं की पब्जी खेळण्यासाठी तो वर्गही बंक करू लागला होता आणि जवळच्या बागेत जाऊन पब्जी खेळायचा.
जेव्हा त्याने परीक्षेत काय प्रकार केलाय हे त्याच्यच लक्षात आलं तेव्हा तो स्वतःवरच रागावला आणि विद्यालयाकडे परत पेपर देता यावा अशी मागणी केली होती. मात्र त्याला पुढच्या वर्षी संधी होती आणि अशाप्रकारे त्याचं वर्ष वाया गेलं.
भारत तर आहेच मात्र पब्जीच्या आहारी गेलेले लोक जगभरात आहेत. नुकतंच,
५) पाकिस्तानमध्ये पब्जीमुळे घरच्यांना मारून टाकल्याची हादरवणारी घटना घडली आहे.
२९ जानेवारी २०२२ ला पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात १४ वर्षीय ‘पब्जी’चं व्यसन जडलं होतं. तेही असं की त्याने आईसह तीन भावडांची गोळ्या घालून हत्या केली. नाहिदा मुबारक असं त्याच्या आईचं नाव. त्यांचा घटस्फोट झाला होता. त्या आपल्या मुलांसह वेगळ्या राहत होत्या. त्यांच्या मुलाला सतत पब्जी गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं.
याच कारणाने नाहिदा त्याला रागवायच्या. त्यादिवशी त्या अशाच रागावल्या आणि यानंतर मुलाने घरात असणार्या बुंदकीतून गोळ्या झाडत आईसह तीन भावंडांची हत्या केली.
शोधायला गेलं तर अशा ढिगाने घटना सापडतील. कुणी स्वतःला मारलंय, कुणाचं मानसिक स्थैर्य गेलंय, कुणाचा अपघात झालाय तर कुणी कंट्रोलमधून बाहेर जात घरच्यांना मारून टाकलंय.
जामा नेटवर्क ओपन या संस्थेने नुकतंच एक संशोधन केलं होतं. यामध्ये त्यांनी २०० पेक्षा जास्त मुलांना समाविष्ट केलं. ५० टक्के मुलांना नॉन व्हायोलिएंट व्हिडिओ गेम खेळण्यासाठी दिले तर ५० टक्के मुलांना बंदुकीच्या हिंसेसह व्हिडिओ गेम खेळण्यास दिले.
त्यानंतर थोड्याच वेळात बंदुकीचा खेळ खेळणाऱ्या ६०% मुलांनी लगेच बंदूक पकडली तर नॉन व्हायोलिएंट गेम खेळणाऱ्या केवळ ४४% मुलांनी बंदूक पकडल्याचं दिसून आलं.
त्यामुळे कुठलाही गेम असो, त्याचा अतिरेक न करता, ठराविक मर्यादेपर्यंतच तो खेळावा, अन्यथा त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हे ही वाच भिडू :
- पब्जीचं काय सांगताय आमच्या पिढीला नोकियाच्या ‘ सापाच्या गेम ’ ने येडं केलं होतं !..
- तुमच्या पब्जीचा पण पप्पा म्हणजे आमचा GTA व्हाईस सिटी..!
- पब्जीच्या खोट्या युद्धातले सैनिक करत आहेत खऱ्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत