दिल्लीत लॉकडाऊन लागलंय, पण कोरोनामुळं नाही…

कोरोनाच्या संसर्गानं जगभर थैमान घातलं, तेव्हापासून लॉकडाऊन हा शब्द चांगलाच परवलीचा झाला. या लॉकडाऊनमुळं लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं. मानसिक आरोग्यालाही मोठी हानी पोहोचली. त्यामुळं, सामान्य जनतेनं लॉकडाऊन या शब्दाचा चांगलाच धसका घेतलाय.

देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलंय. विशेष म्हणजे हे लॉकडाऊन कोरोनाच्या संसर्गामुळं नाही, तर वाढत्या प्रदूषणामुळं पाळावं लागतंय.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानं (CPCB) दिल्लीकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. शनिवारी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स हा ४९९ आला. आतापर्यंत दिल्लीतल्या हवेची ही सर्वांत खराब गुणवत्ता आहे. हाच गुणांक शुक्रवारी ४७१, तर गुरुवारी ४११ होता. त्यामुळं, खबरदारीचं पाऊल म्हणून दिल्लीत लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानं दिल्लीतल्या खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, फिल्डवरील कामं टाळावी, कार पुलिंगसारख्या सुविधांचा वापर करावा आणि शक्य असेल तर घरूनच काम करावं असं आव्हान केलं आहे.

दिल्लीतल्या प्रदुषणाची कारणं काय?

नुकतीच दिवाळी पार पडली. दिल्लीकरांनी हा सण उत्साहात साजरा करताना मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. त्यामुळं आधीच वाहनांच्या व औद्योगिक प्रदूषणामुळं खराब झालेल्या दिल्लीतल्या हवेची स्थिती आणखी खराब झाली. फटाक्यांमुळं दिल्लीकरांना चांगलाच फटका बसला आहे.

दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या आजूबाजूला असणाऱ्या पंजाब, हरियाणामध्ये शेतात लावलेल्या आगींचाही दिल्लीतल्या हवेवर मोठा परिणाम होतो. हवेच्या झोतासोबत धूळ आणि धूरही दिल्लीत येते आणि इथली हवा आणखी खराब होते. आसपासच्या राज्यांमधल्या शेतीमध्ये खोडे जाळल्याचाही फटका बसतो. त्यामुळं, सर्वोच्च न्यायालयानं खोडे जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही खोडे जाळण्याचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत.

दृष्यमानतेवर परिणाम

या खराब वातावरणामुळं, गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतल्या एनसीआरमध्ये विजिबिलिटीवर म्हणजेच दृश्यमानतेवर फरक पडला आहे. इथल्या हवेत धुक्याची दाट चादर दिसत असून कुतुबमिनार, लोटस टेंपल, अक्षरधाम मंदिर अशा प्रसिद्ध ठिकाणांवर धुकं आणि कमी दृश्यमानता नोंदवण्यात आली.

धोक्याची घंटा

दिल्लीतल्या हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स सरासरी पाचशेच्या जवळ पोहोचला आहे. तर दिल्लीतल्या काही भागांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्सनं ७०० पर्यंत मजल मारली आहे. एअर क्वालिटी इंडेक्सचं प्रमाण शून्य ते ५० म्हणजे चांगलं, ५१ ते १०० म्हणजे समाधानकारक, १०१ ते २०० म्हणजे मध्यम, २०१ ते ३०० म्हणजे खराब, ३०१ ते ४०० म्हणजे अत्यंत खराब आणि ४०१ ते ५०० म्हणजे गंभीर मानलं जातं. त्यामुळं दिल्लीतल्या हवेची स्थिती आधीच गंभीर झाली आहे. त्यात सातशेच्या जवळ गेलेला एअर क्वालिटी इंडेक्स हा दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा आहे.

तात्काळ उपाययोजना हव्यात

तज्ञांच्या मते, दिल्लीतल्या हवेत विष पसरलं आहे. हवेत पसरलेलं हे धुकं ही पब्लिक इमर्जन्सी असून गाड्या, उद्योग, बांधकाम आणि रस्ते यांसारख्या धुळीच्या स्रोतांवर तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे. प्रदूषणाचे स्रोत आणि हॉटस्पॉट ओळखून त्यानुसार काम करण्याची आवश्यकता आहे. हवेच्या ढासळत्या गुणवत्तेमुळं रुदिल्लीत श्वसन आणि त्वचेच्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

याआधीही दिल्लीकरांना प्रदुषणाचा चांगलाच फटका बसला होता. त्यावेळी इतर उपाययोजनांसोबतच सम-विषम नंबरच्या गाड्या सम-विषम तारखेला रस्त्यावर आणण्याचा उपाय मोठ्या प्रमाणावर गाजला होता.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.