तुकोबारायांचा वडाखालचा लव्हसीन.

असं म्हणतात आजचा जमाना पिक्चरच्या प्रमोशनचा आहे. सिनेमापेक्षा सिनेमाचा ट्रेलर, त्याची जाहिरात ठरवते की सिनेमा चालणार की नाही ते. कधीही मिडियाशी सरळ न बोलणारे सेलिब्रेटी न्यूज चॅनल पासून युट्युबपर्यंत आणि कपिल शर्माच्या नाईटपासून थुकरटवाडीच्या मॉलपर्यंत सगळीकडे मुलाखती देत असतात. गजिनीसाठी आमीर खान पब्लिकचे केस कापत हिंडतो तर अरबाज मलाइका तलाकच्या वावड्या उठवून परत लग्न करतात. कोणी काय मार्केटिंग ट्रिक वापरेल हे सांगता येत नाही.

तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की ब्याऐंशी वर्षापूर्वी आलेला महाराष्ट्रातला सगळ्यात सोज्वळ चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ट्रिक म्हणून पब्लिसिटी स्टंट केला होता.

नेमकं झालं काय होतं ?

संत तुकाराम हा प्रभात स्टुडियोचा महत्वाकांक्षी सिनेमा होता. दिग्दर्शक विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल शेख या जोडगोळीचा पहिलाच प्रयत्न होता तरी त्यांनी तांत्रिक बाजूसाठी कोणतीच तडजोड केली नव्हती. प्रभातच्या कलाकारांनी अतिशय मायेच्या निगुतीने हा सिनेमा बनवला होता.

संत तुकाराम ही अतिशय सुंदर कलाकृती बनून तयार झाली तेव्हा जवळपास एक लाख रुपये खर्च झाले होते. तुकारामांच्या वैकुंठगमनाचा प्रसंग पडद्यावर साकारला होता, त्या सीन मधल्या भव्य तांत्रिक करामतीची चर्चा शुटींगच्यावेळी  झालेल्या अपघातापासूनच जोरात होती. हा सिनेमा गाजणार याची छातीठोक हमी प्रभात परिवारातल्या प्रत्येकाला होती. पण…

७ नोव्हेंबर १९३६ ला सिनेमा पुण्याच्या प्रभात टॉकीज मध्ये रिलीज झाला.

नेमकी त्या दिवशी मुंबईमध्ये जातीय दंगल झाल्यामुळे तिथे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यासाठी ५ आठवडे थांबावे लागले. हा काळ फत्तेलाल दामले प्रभूतीसाठी खूप टेन्शन वाला होता. जशी अपेक्षा होती तसा प्रतिसाद संत तुकारामला मिळाला नव्हता.

प्रभातच्या भागीदारामध्ये तुकारामच्या थंड रिलीज मुळे खळबळ माजली.

आता काय करायचे याबद्दल चर्चा करण्यासाठी संचालकांची बैठक बसली. दिग्दर्शकापासून ते हिरो हिरोईन या सगळ्यात एकही ‘स्टार’ नसल्यामुळे लोक सिनेमाघरात येण्यास उत्सुक नाहीत हे कारण पुढे आले. तुकारामची भूमिका करणारे मुख्य हिरो विष्णुपंत पागनीस हे तरपूर्वी स्त्रीपार्टीच काम करायचे. अपयशाच एकमेकावर खापर फोडल जात होत. दामलेच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीवर काही जणांनी शंका घेतली.

 

दामलेनी आत्मविश्वासाने उत्तर दिल,

” प्रामाणिकपणे मेहनत करून हा सिनेमा बनवला आहे. जर संस्थेचे नुकसान झाले असेल तर आम्ही दिलगीर आहोत.”

चर्चा अशी वैयक्तिकपातळीवर घसरू लागल्यावर थांबवण्यात आली. आता सिनेमा चालावा यासाठी आक्रमकपणे पब्लिसिटी हा एकमेव पर्याय समोर होता. प्रभातचे प्रसिद्धीप्रमुख बाबुराव पै यांना खुली सूट देण्यात आली. त्यांनी अनेक युक्त्या प्रयुक्त्या संत तुकारामसाठी वापरल्या.

पुण्याच्या आसपासच्या खेड्यातून बाजारात भाजीपाला फळफळावळ विकण्यासाठी छकडे यायचे. या छकडयावर हातात वीणा घेतलेल्या संत तुकारामांचे भले मोठे पोस्टर लावण्यात आले. या फिरत्या जाहिरातीमुळे प्रेक्षकांची पाऊले सिनेमा कडे वळली.

सिनेमा मध्ये एक सीन आहे. एका टेकडीवर झाडाखाली तुकाराम महाराज भगवंताच्या उपासनेमध्ये लीन झाले आहेत. त्यांची बायको जिजाऊ उर्फ आवली त्यांना शोधत शोधत भाकरी घेऊन तिथे येते. त्यांना हलवून जागे करते. मग दोघे बसून ती भाकर खातात. त्यावेळी मायेन तुकाराम महाराज आवलीला भाकरीचा घास खाऊ घालतात. त्या नवराबायकोच्या नात्याचे पदर उलगडणारा साधासा भावस्पर्शी प्रसंग.

८ नोव्हेबर १९३६च्या ज्ञानप्रकाश वर्मानपत्राच्या पुणे, मुंबई आवृत्तीमध्ये संत तुकाराम सिनेमाची एक जाहिरात छापून आणण्यात आली होती. त्या जाहिरातीच हेडिंग होत,

“तुकोबारायांचा लव्हसीन ! “

तुकोबारायांचा वडाखालील लव्हसीन पाहून पुण्यात सर्वत्र आनंदोद्गार ऐकू येत होते,”एकंदरीत तुकाराम बुवा बरेच रोमांटिक होते.” असे वाक्य तुकोबा आणि अवलीच्या भाकरी खातानाच्या फोटोवर लिहिला होता. हा सीन पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते असा उल्लेखही या जाहिराती मध्ये होते.

IMG 20181203 1938022

या जाहिरातीमुळे त्याकाळच्या पुण्यात किती खळबळ झाली काही कल्पना नाही. पण व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रात या कल्पक जाहिरातीनंतर प्रेक्षकांची उत्सुकता चाळवून सिनेमाने जीव धरला असा उल्लेख आहे.

संत तुकारामने पुढे इतिहास घडवला. खेडोपाड्याहून बैलगाड्या भरून भरून लोक पुण्यामध्ये तुकाराम सिनेमाच्या दर्शनाला येऊ लागले. विष्णुपंत पागनीस यांना तर खरोखरचा तुकाराम समजून ते दिसतील तिथे लोक त्यांच्या पायावर डोके ठेवू लागले. प्रभात स्टुडिओसाठी ही फिल्म माईलस्टोन ठरली.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.