फक्त १९ स्केअर किलोमीटरचं राज्य मोदींना इतकं महत्वाचं का वाटतं…?

भारताच्या नकाशात पॉंडिचेरी/पुदुच्चेरी राज्य एका बिंदूपेक्षा थोडं मोठं असावं. एरिया सांगायचा झाला तर फक्त १९ स्केअर किलोमीटर. लोकसंख्या सांगायची झाली तर ती २ लाख ४४ हजार. पुण्याची लोकसंख्या ३१ लाखाच्या दरम्यान आहे. कोल्हापूरची सात-आठ लाखाच्या दरम्यान. औरंगाबादची ११ लाखाच्या घरात. गेलाबाजार आपल्या लातूरची लोकसंख्या देखील चार लाखाच्या घरात आहे.

म्हणजे लातूर पेक्षा लोकसंख्येनं छोटं असणारं हे राज्य कम केंद्रशासित प्रदेश. इथून केवळ १ खासदार लोकसभेत निवडून जातो. तर विधानसभेत फक्त ३० आमदार आहेत तरीही या इवल्याश्या केंद्रशासित प्रदेशाला जिंकण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री आणि इतर राज्यातील खासदार आणि आमदारांना प्रचारात उतरले होते.

प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी इथं २ सभा घेतल्या, तर गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील सभा घेऊन इथं मतदारांना वेगवेगळी आश्वासन दिली होती.

त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे इथे NDA सत्तेत येताना दिसून येतय. सध्याच्या माहितीनुसार NDA २७ जागांवर आघाडीवर आहे.

भाजपनं या केंद्रशासित प्रदेशासाठी एवढी ताकद का लावली होती? ही विधानसभा त्यांच्यासाठी महत्वाची का होती?

दक्षिण भारतातील भाजपची कालपर्यंतची कामगिरी बघितली तर कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पॉंडिचेरी या सगळ्या राज्यांमध्ये केवळ कर्नाटकमध्येच सत्तेत येण्यास यश मिळालं आहे. सध्याचे कल बघितले तर भाजपसाठी केरळ अजूनही दुरापास्तच आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये देखील अनुक्रमे के. चंद्रशेखर राव आणि जगनमोहन रेड्डी यांचे गड मानले जातात.

राहिला प्रश्न तामिळनाडूचा.

तर इथं १९६७ पासून एकाही राष्ट्रीय पक्षाला निवडणूक जिंकता आलेली नाही. तामिळनाडूमध्ये अद्रमुक आणि द्रमुक हे दोघेच आलटून-पालटून सत्तेत आहेत. त्यामुळे सीमेला लागून असलेल्या पॉंडिचेरी या छोट्याश्या प्रदेशाला जिंकून भाजपचा आपल्यासाठी तामिळनाडूचे दार उघडण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक आणि जेष्ठ पत्रकार सांगतात.

आता हे कसं तर जेष्ठ पत्रकार  आर. भगवान सिंह हे आपल्या लेखात सांगतात,

पॉंडिचेरीमध्ये भाजपचा विकासाचा एक मोठा रोड मॅप तयार आहे. यात रोजगार उपलब्ध करून देणं, मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करून लोकांचं राहणीमान उंचावणे, असं सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

२५ फेब्रुवारी रोजी इथं जेव्हा पंतप्रधान मोदींची सभा झाली होती तेव्हा ते म्हणाले होते की, 

मी पॉंडिचेरीला सर्वश्रेष्ठ बनवू इच्छितो, एनडीए पॉंडिचेरीला BEST बनवू इच्छितो, यात B चा म्हणजे बिझनेस हब, E म्हणजे एजुकेशन हब, S म्हणजे आध्यात्मिक हब आणि T म्हणजे टुरिस्ट हब बनवणार आहे.

यातून भाजपला आशा आहे की,

तामिळनाडूचे मतदार पॉंडिचेरीमध्ये होत असलेल्या विकासाकडे बघून भाजपकडे वळण्यासाठी प्रेरित होतील आणि आपल्या राज्यात देखील भाजपला मतदान करण्यावर विश्वास दाखवतील. अशा परिस्थितीमध्ये २०२६ ची निवडणूक भाजपला एक चांगली संधी तयार होणार असल्याचं देखील आर. भगवान सिंह सांगतात.

आता थोडसं पाठीमागच्या दिवसांमध्ये बघू

नव्या वर्षाच्या सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री एन नारायणसामी आणि तत्कालीन उपराज्यपाल किरण बेदी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते, नारायणसामी सातत्यानं हे सांगतं होते कि, केंद्रानं आपली सत्ता घालवण्यासाठी बेदींना उपराज्यपाल बनवलं आहे.

त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किरण बेदींना हटवत असल्याची घोषणा केली, यापाठीमागे निवडणुकीत वादग्रस्त चेहऱ्यामुळे आपल्याला फटका बसू नये म्हणून भाजपनं बेदींना हटवल्याच सांगितलं गेलं.

त्यानंतर काँग्रेससमोर एक नवं संकट येऊन उभं राहील. अवघ्या १४ दिवसांमध्ये त्यांचे २ आमदार भाजपमध्ये गेले. यात ए. नमशिव्यम यांचा देखील समावेश होता. ते नारायणसामी यांच्या कॅबिनेटमध्ये नंबर दोनचे मंत्री होते. त्यावेळी विधानसभेत काँग्रेसचे १५ तर द्रमुकचे २ आमदार होते. मात्र यानंतर बहुमताअभावी नारायणसामी यांचं सरकार पडलं.

तेव्हा पासून आज पर्यंत राज्यात राष्ट्रपती लागू आहे.

म्हणजेच केंद्रातील भाजपनं बेदींना हटवून, काँग्रेसमधील ताकदीचे नेते आपल्या पक्षात घेऊन, याआधीच पॉंडिचेरी जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. 

तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अद्रमुक या पक्षांनी मागच्या ५ दशकांपासून सत्ता गाजवली आहे, या उलट पॉंडिचेरी प्रदेशात सातत्याने काँग्रेस या राष्ट्रीय प्रदेशाला साथ दिली आहे. आता भाजपला विश्वास आहे की सध्याच्या सरकारमध्ये आपण सहभागी असणार आहे.

कल बघितल्यास हा विश्वास सार्थ होताना दिसत आहे. जर बहुमत मिळालं तर भाजप आणि मित्रपक्षांमधे जास्त जागा लढणारा अखिल भारतीय एनआर कांग्रेस या सरकारच नेतृत्व करणार आहे. भाजप इथं केवळ ९ जागा लढवत आहे. तर ५ जागा अद्रमुक लढवत आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.