पवारांचं पुलोद सरकार पाडण्यासाठी यशवंतराव मोहितेंनी संघबंदीची खेळी केली होती..

पुरोगामी लोकशाही दल उर्फ पुलोद महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात गाजलेले सत्तेचा प्रयोग. १९७८ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातील तीन दिग्गज मंत्री अचानक विरोधी बाकांवर जाऊन बसले. यात वसंतदादांचे सर्वात विश्वासू सहकारी समजल्या जाणाऱ्या शरद पवारांचा समावेश होता. पवारांनी दादांचं सरकार तर पाडलंच शिवाय जनता दलाची मदत घेऊन आपलं सरकार स्थापन केलं.

हाच तो पुलोदचा प्रयोग.

महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार सत्तेत आले होते. या पुलोदच्या प्रयोगात पवारांनी जुने काँग्रेसी, जनता पक्षवाले,समाजवादी, कम्युनिस्ट, जनसंघ या टोकाच्या विचारसरणीच्या पक्षांची एकत्र मोट बांधली होती. एस एम जोशींच्या मार्गदर्शनाखाली पवार हे सरकार चालवण्यासाठी तारेवरची कसरत करत होते.

केंद्रात देखील जनता पक्षाचं सरकार होतं. आणीबाणी नंतर सत्ता भ्रष्ठ झालेले इंदिरा काँग्रेसचे नेते काहीही करून पुन्हा सत्ता मिळवण्याच्या मागे लागले होते. केंद्रातून संजय गांधींनी राज्यातल्या नेत्यांना चॅलेंज दिलेलं, शरद पवारांना खुर्चीतून हलवायचं. महाराष्ट्रातील काँग्रेस आपल्या पाठीत खुपसलेल्या खंजिराचा बदला घेण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होती.

अशातच कराडच्या यशवंतराव मोहितेंनी पुलोद सरकारमध्ये फूट पाडायची योजना आखली.

पुलोदमध्ये दोन प्रमुख गट होते. पहिला होता पुरोगामी विचारांचा आणि दुसरा कट्टर हिंदुत्ववादी जनसंघ. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या साक्षीने यांचं सरकार चाललं होतं. त्यांच्यातही वाद व्हायचे पण पवारांनी अक्कलहुशारीने कोणताही वाद चव्हाट्यावर येऊ दिला नव्हता. त्यांच्या चाणक्यनीतीला हरवून पुलोद सरकार पाडायचं म्हणजे मोठं आव्हान होतं.

७ एप्रिल १९७९ रोजी विधानसभेत यशवंतराव मोहितेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कवायतींवर बंदी आणायची मागणी केली.

मोहितेंनी हा प्रश्न मांडला आणि सत्ताधाऱ्यांची तारांबळ उडाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर जनसंघ हा पक्ष उभा होता. त्यांचे अनेक नेते संघाच्या मुशीत घडले होते. पक्ष सत्ता याच्या पेक्षा हिंदुत्व विचार त्यांना महत्वाचे वाटत होते. अशातच संघावर येणारे निर्बंध त्यांना पसंत पडणारे नव्हते. तर दुसऱ्या बाजूला पुलोद मधले शरद पवार, एस एम जोशी, भाई वैद्य, सुशीलकुमार शिंदे, शंकरराव चव्हाण असे नेते हे संघाचे व हिंदुत्ववादी विचारांचे कठोर टीकाकार होते. त्यांना संघाच्या कवायतींवर बंदीच्या विषयावर पाठिंबा द्यावाच लागणार होता.

इंदिरा काँग्रेसच्या यशवंतराव मोहिते, सुधाकरराव नाईक आदी जेष्ठ नेत्यांनी ‘संघ हा लोकशाहीच्या विरोधी विचारांचा व अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधी असल्यामुळे त्यांच्या कवायतीत बंदी आणावी हा प्रस्ताव मांडला.

शरद पवार अडचणीत आले. या प्रस्तावाला सामोरे कसे जायचे या विचारात सत्ताधारी मंडळी अडकली. जनसंघाचे नेते मात्र आक्रमक होते. काहीही झालं तरी हा प्रस्ताव हणून पाडायचा यासाठी सत्ता गेली तरी चालेल असं त्यांचं म्हणणं होतं. विधानसभेत या प्रस्तावाविरुद्ध बोलण्यासाठी जनसंघाच्या जयवंतीबेन मेहता उभ्या राहिल्या. त्यांनी संघाची आजवरची परंपरा, राष्ट्रभक्ती, लहान वयापासून देशप्रेमाचे दिले जाणारे संघ संस्कार याबद्दल जयवंतीबेन मेहता बोलल्या.

इतकंच नाही तर त्यांनी थेट यशवंतराव मोहितेंवर हल्ला केला. त्या म्हणाल्या,

“संघाने हुकूमशाही लादणाऱ्या आणिबाणीशी लढा दिला तर मोहिते स्वतः तेव्हा आणीबाणीचे समर्थन करणार्यात आघाडीवर होते. त्यांना हुकूमशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.”

जयवंतीबेन मेहता यांच्या नंतर बोलणाऱ्या काँग्रेसच्या प्रभा राव म्हणाल्या,

संघाच्या कवायतींमुळे हिंदू मुस्लिम फूट पडते. 

जनसंघातर्फे तीन जण बोलणार होते. त्या तिघांमधले राम नाईक सांगतात, अचानक जनता पक्षाचे कुर्ल्याचे आमदार शमसुद्दीन हक खान बोलायला उभे राहिले. शरद पवारांना घाम फुटला. खान संघाला थेट विरोध करणार असच सगळ्यांना वाटत होतं. पुलोद सरकार बुडणार असंच वाटू लागलं. खान आपल्या भाषणात म्हणाले,

” मैं भी एक मुसलमान हूं और हिंदुस्थान में रहनेवाला हर मुसलमान हिंदू है. हिंदू कि व्याख्या यह है कि हिंदुस्थान में रहनेवाला हर आदमी चाहे किसी भी जाती का हो हिंदू कहेलाएगा “

खान यांच्या भाषणानंतर विरोधकांची हवाच निघाली. संघाचे कट्टर विरोधक म्हणवले जाणारे राष्ट्र सेवा दलाचे गुलाबराव पाटील हेही संघाच्या बाजूने बोलतील याची कोणी अपेक्षा केली नव्हती. अनेकांनी आरएसएसच्या गणवेशावरून खिल्ली उडवली होती तर त्याला गुलाबराव पाटलांनी विरोध केला.

“मी आपल्याला सांगतो मोहिते साहेब, आरएसएसची चड्डी स्वच्छ राष्ट्राभिमानी आहे. चारित्र्यवान आहे, शिस्तबद्ध आहे.आरएसएसच्या चड्डीला कोठेही डाग पडलेला मला सापडत नाही.”

संघावर बंदी आणण्यापेक्षा इतरांनी आपल्या संघटनांही तशा तोडीच्या बलवान होतील याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केलं. युक्रांदचे आमदार कुमार सप्तर्षी यांनी देखील संघाला आमचा वैचारिक विरोध आहे मात्र आम्ही त्यांच्या कवायतींवर बंदी आणू देणार नाही.

राम नाईक सांगतात त्या दिवशीची चर्चा संस्मरणीय अशी झाली. एवढी आरडाओरडा न होता सगळ्यांनी आपले मुद्दे मांडले. खुद्द मुख्यमंत्री शरद पवार यांनी देखील संघाला आमचा विरोध असेल पण त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार नाही असं सांगितलं. शेवटी चर्चा ज्या नियमाखाली झाली त्या नियमाप्रमाणे ठरावावर मतदान झाले नाही.

शरद पवारांचे सरकार वाचले, संघावर येऊ घातलेली बंदी देखील टळली.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.