चांगल काम करताय म्हणत शाबासकी दिली अन् ४८ तासात राष्ट्रपती राजवट लावून टाकली

आज सकाळी शरद पवारांनी माध्यमांसोबत बोलत असताना आपण मुख्यमंत्रीपदावर असताना राज्यात कशाप्रकारे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती त्याचा किस्सा सांगितला.

माध्यमांसोबत बोलत असताना पवार म्हणाले की, 

रात्रीचे १२ राज्याचे मुख्य सचिव माझ्याकडे आले आणि त्यांनी पुलोदचं सरकार बरखास्त केल्याचा आदेश वाचून दाखवला.  मुख्यमंत्री पद गेल्यानं त्याच रात्री मी सरकारी निवासस्थान सोडलं. 

दूसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची मॅच होती. मी जुन्या फियाट गाडीतून स्वत:च ड्रायव्हिंग करत पत्नीसोबत मॅच पहायला गेलो. 

हा झाला पवारांनी सांगितलेला किस्सा पण हा किस्सा इथून सुरवात होत नाही, या घटनेच्या ४८ तासांपूर्वी घडामोडी घडण्यास सुरवात झाली होती.

इंदिरा गांधींची आणिबाणी त्यानंतर जनता पक्षाची राजवट दरम्यानच्या काळात वसंतदादांच सरकार पाडून शरद पवारांनी केलेली पुलोदची खेळी अशा बऱ्याच घटना घडून गेल्यानंतर देशात मुदतपुर्व निवडणूका लागल्या. 

सुमारे ३५४ जागांसह इंदिरा गांधी पून्हा सत्तेत आल्या… 

इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनात मराठवाड्यात झालेल्या नामांतरावरूनच्या दंगलीचा विषय चांगलाच गाजू लागला. विरोधकांनी पुलोद सरकारला घेरलं होतं. याच दरम्यान शरद पवारांना देशाचे गृहमंत्री ग्यानी झैलसिंग यांनी फोन केला, 

नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाड्यात झालेल्या दंगलीविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे  असा निरोप त्यांनी दिला. 

हिवाळी अधिवेशन दोन दिवसात संपत असून अधिवेशन पार पडलं की तात्काळ दिल्लीला येत असल्याचं शरद पवारांनी कळवलं आणि ते दिल्लीला गेले. 

शरद पवार दिल्लीत उतरताच त्यांना दिल्लीच्या विमानतळावर निरोप देण्यात आला की तुम्ही महाराष्ट्र सदनला न जाता थेट नॉर्थ ब्लॉकच्या गृहमंत्र्याच्या कार्यालयात भेटण्यासाठी यावं. 

पवार गृहमंत्रालयांच्या कार्यालयात गेले. समोर ग्यानी झैलसिंग होते. ते आले आणि म्हणाले माझं कोणतही काम नाही खरतर तुम्हाला इंदिरा गांधींनी भेटायला बोलवलय… 

झैलसिंग यांनी शरद पवारांना सोबत घेतलं आणि गाड्यांचा ताफा इंदिरा गांधींच्या २४ विलिग्डन सिक्रेट बंगल्याकडे गेला. 

बंगल्यात उतरल्यानंतर ग्यानी झैलसिंग म्हणाले, तुम्हाला एकट्यालाच भेटायला बोलावले आहे माझी इथं गरज नाही.. 

शरद पवार आणि इंदिरा गांधींची मिटींग ठरली ती अशा नाट्यमय पद्धतीने… 

इंदिराजींच्या विरोधात यशवंतराव चव्हाणांची बाजू घेतल्याने या भेटीत शरद पवार अवघडले होते. इंदिरांनी ख्यालीखुशाली विचारतं मुळ विषयाला हात घातला, त्या म्हणाल्या, 

डिस्पाईट ऑल ऑड्स यू आर मॅनेजिंग वेल.. 

अर्थात खडतर परिस्थितीत तुम्हा चांगल काम करताय.. 

त्यानंतरचा प्रश्न होता आत्ता पुढे काय 

यावर पवार म्हणाले आत्ता सुरू आहे तसच मार्गक्रमण सुरू राहणार.. 

त्यानंतर मात्र इंदिरा थेट म्हणाल्या, 

तुमच्यात एक दोष आहे, तुम्ही वरिष्ठाची साथ सोडत नाही.. तुम्ही कॉंग्रेसच्या विचारसरणीच्या तरुणांनी एकत्र काम करायला हवं. त्यांचा रोख संजय गांधी यांच्या नेतृत्वात शरद पवारांनी काम करण्यास सुरवात करावी असा होता. 

या विषयाला कशी बगल द्यायची या विचारात असणाऱ्या पवार म्हणाले, 

तुमच्या पक्षाला बहुमत आहे. आमच्या पक्षाचे तर एकच खासदार निवडून आलेत ते देखील यशवंतराव चव्हाण. आम्ही कशी जबाबदारी घेणार.. 

यावर इंदाराजींच उत्तर होतं, निवडणूका येतील जातील. सत्तेबाहेर आम्हीही फेकलो गेलो होतो. पण परत निवडून आलो. तुम्ही ठरवलं तर तरुण नेतृत्वाला पाठबळ देवू शकता. देशाचं प्रशासन चालवू शकता. मला तुमच्या कर्तृत्वाबद्दल खात्री आहे. 

यावर शरद पवार म्हणाले, 

मग तुम्हीच मला का पाठींबा देत नाही… 

इंदिरा हसल्या आणि ही मिटींग संपली..

त्यानंतर इतर कामे आटपून शरद पवार मुंबईत आले. मिटींग होवून अठ्ठेचाळीस तास झाले होते. सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि अचानक रात्री साडेबाराच्या सुमाराच राज्याचे तत्कालीन मुख्यसचिव शरद पवारांकडे आले आणि त्यांनी पुलोद सरकार बरखास्त होवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आदेश वाचून दाखवला.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.