भाजपचे मोजके खासदार निवडून यायचे, त्यात ७ रूपयांत निवडून येणाऱ्या दानवेंचा समावेश असायचा.

जालना जिल्हयातल्या भोकरदन तालुक्यातील एका पिंपळगाव सुतार या छोटयाशा गावात जन्मलेला साधा माणूस आपल्या बुद्धीमत्ता आणि जनसंपर्काच्या जोरावर भारताच्या संसदेत चमकतो. आणि जेव्हा भाजपचे मोजकेच खासदार निवडून यायचे त्यात ७ रूपयांत निवडून येण्याचा करिष्मा करतो. त्यांचं नाव पुंडलिकराव दानवे.

वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा, ही उक्ती पुंडलिकराव दानवेंना जशीच्या तशी लागू पडते.

१९५२ पासून राजकारणात सक्रिय असलेले पुंडलिक हरी दानवे यांची घरची गरिबीची असतांना सुद्धा स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून जनसेवेचा वारसा नेटाने पुढे नेला. आणीबाणीच्या काळात स्वतःची पत्नी आजारी असतांना सुद्धा जनतेसाठी तुरुंगात गेले.

काही काळ त्यांनी गाव परिसरात शिक्षक म्हणून काम केलं. अनेकांना पोटा पाण्याला लावण्याच्या कार्यामुळेच त्यांना परिसरात मास्तर म्हणुन ओळखायला लागले. त्यांची खरी राजकिय कारकिर्द सुरु झाली ती पिंपळगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनं.

पिंपळगाव ग्रामपंचायतचे बिनविरोध १५ वर्ष सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे १५ वर्ष चेअरमन या पदावरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली राजकिय कारकिर्द फुलविली. ५ वर्षे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद या स्तरावरून राजकारण करत १९६७ साली त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी ६० रुपये खर्च केले होते.

ही निवडणुक त्यावेळी खूप गाजली. त्यावेळी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसुन पुंडलिक हरी दानवे बैलगाडीने प्रचार करत होते तर विरोधकांचा प्रचार मोटारीने सुरु होता. निवडणूक लढविली त्यावेळी त्यांचा अवघ्या १५०० मतांनी पराभव झाला. पण लोकांच्या ही निवडणूक भलतीच लक्षात राहिली. १९७२ ला पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र तेव्हाही ते पराभूत झाले.

त्यावेळी पराभवाने खचून न जाता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

१९७७ साली जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. ती निवडणूक लढवताना दानवेंच्या खिशात अवघे सात रुपये असताना जनता पक्षाने उमेदवारी दिली. त्यांनी प्रचार सुरू केला. मतदारसंघातील एखाद्या गावात जायच. तेथील दोन चांगल्या माणसांकडे निरोप द्यायचा. ती माणसं त्यांच्या त्यांच्या गावात दानवेंच्या उमेदवारीसंदर्भात माहिती द्यायचे. आणि नंतर मतदानही करायचे. लोक कोणत्याही अपेक्षेशिवाय दिलेला शब्द पाळायचे. ‘जान जाय, पर वचन न जाय’, या तत्वाने लोक वागायचे.

प्रचार सुरू केल्यानंतर दानवे स्वतः सुद्धा गावागावात जाऊन भेटी घ्यायचे. कधी बैलगाडी तर कधी पायी असं रात्रंदिवस ते आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसोबत फिरायचे. सोबतचे लोकही स्वत: घरून भाकरी घेऊन यायचे. आणीबाणीमुळे भरडल्या गेल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. याचाच परिणाम तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांचे निकटवतीय तथा माजी महसूल मंत्री माणिकराव दादा पालोदकर यांचा पराभव करत जालना जिल्ह्याचा खासदार होण्याचा मान दानवेंनी मिळवला.

त्याकाळी भाजपसारख्या पक्षाचं प्राबल्य नसताना गावोगाव फिरून त्यांनी भाजप उभी केली.

पुन्हा १९८९ साली भाजपाकडुन त्यांनी निवडणुक लढवून बाळासाहेब पवार यांना पराभूत करून ते जालना लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा खासदार झाले. लोकसभेमध्ये खासदार पदाची संस्कृतमधून शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील पहिले खासदार होते. संस्कृतमधून शपथ घेतल्यामुळे भारताचे तात्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी त्यांचा सत्कार केला होता.

पुढं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या भागात भाजपसारखा पक्ष जोमाने उभा करत १९९० साली मतदारसंघ पिंजून काढत रावसाहेब दानवे यांना भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार करून खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. दोनवेळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहून जिल्ह्यात भाजपाचा पाया मजबुत केला.

पण पुढे याच रावसाहेब दानवेंच्या विरोधात पुंडलिकराव दानवे उभे ठाकले होते. 

२००३ साली त्यावेळी भोकरदन मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपकडून खासदार राहिलेले पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले आणि निवडून आले. खरंतर ही लढत अप्रत्यक्षपणे चंद्रकांत दानवे यांचे वडील माजी खासदार पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होती. तेंव्हापासूनच दोन्ही दानवे राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.

पुढं २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यानची त्यांच्या बद्दलची एक आठवण सर्वांच्या कायम लक्षात राहील अशी आहे. पुंडलिकराव दानवे आपला मुलगा चंद्रकात दानवे यांच्यासाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होते. प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सभा घेतली. त्यावेळी नव्वदी उलटलेले पुंडलिकराव व्यासपीठावर उपस्थित होते. 

भाषण संपल्यावर पवारांनी मुद्दाम पुंडलिकरावांना बोलावून स्वतः जवळ उभ केल आणि त्यांना उद्देशून पुंडलिकराव आपण म्हातारे झालो आहोत का ? असा प्रश्न विचारला. त्यावर पुंडलिकरावांनीही उत्तर दिलं

अजिबात नाही, माझं वय ९२ वर्ष असलं म्हणून काय झालं ? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालना लोकसभेतून रावसाहेब दानवेंविरोधात लढेन. ही गुरु-शिष्याची नाही तर राम रावणाची लढाई होईल.

संघर्ष काय आणि कसा असावा याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पुंडलिक हरि दानवे. आणीबाणीच्या काळातील तुरंग वास असो, राजकारणातील चढ उतार असो त्यांनी त्यांच्या तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.

हे हि वाच भिडू

  •  
Leave A Reply

Your email address will not be published.