वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या या पुणेकर भिडूचे पराक्रम ऐकून तुमचे पाय दुखायला लागतील…

पुण्यातली लोकं अशी, पुण्यातली लोकं तशी अशा लय गावगप्पा तुम्ही ऐकल्या असतील. पण पुणे आणि पुणेकर या गोष्टी किती भारी आहेत, हे पुण्यात राहिल्याशिवाय समजत नसतंय. इकडं हजार तऱ्हा असलेले हजार भिडू भेटू शकतात. कोण कसा दिसतो आणि कसा राहतो यावरुन तर चुकूनही जज करु नका. कारण पेठांमधले बोळ, उंचच उंच टॉवर्स किंवा अगदी आयटी पार्क आणि कॉलेजं इथं कुठंही तुम्हाला खतरनाक कार्यकर्ते सापडू शकतात.

आम्हाला पण एक सापडला.. गल्ली बोळात नाही, तर पुणे विद्यापीठात. त्यात पण खुंखार विषय म्हणजे, हा कार्यकर्ता वर्गात बसून अभ्यास करत नव्हता, तर विद्यापीठाच्या प्रागंणात धावत होता. आता तुम्ही म्हणाल, भिडू तो एवढा भारी एरिया आहे, कुणालाही पळायची इच्छा होईल.

पण शेठ या कार्यकर्त्याचा विषय डीप आहे… हा धावत होता वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी. आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण साधा नाही, तर सलग ६० दिवस फुल मॅरेथॉन धावायचा. दिवसाला ४२.१९५ किलोमीटर न चुकता, चेष्टाय का?

हे पुणेकर भिडू आहेत आशिष कसोदेकर. त्यांचं वय ५० वर्ष असलं, तरी पराक्रम तरुण पोरांना लाजवतील असे आहेत. आपल्या पन्नासाव्या बड्डेला काहीतरी भारी करायचं म्हणून आशिष यांनी सलग ५० दिवस मॅरेथॉन पळायचा निर्णय घेतला. मग त्यांना वाटलं, हा तर पर्सनल रेकॉर्ड होईल. वर्ल्ड रेकॉर्ड होता ५९ दिवसांचा, म्हणून आशिष यांनी सलग ६० दिवस मॅरेथॉन पळायचं ठरवलं.

जागा ठरली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पुण्यातला माणूस असला भारी विषय करतोय म्हणल्यावर विद्यापीठानंही मदतीचा हात पुढे केला. तिकडं एक ५.३ किलोमीटरचा लूप ठरवून देण्यात आला आणि आशिष यांनी त्या लूपला रोज आठ फेऱ्या मारल्या. भारताच्या प्रजासत्ताक दिनी ते ६० वं मॅरेथॉन पळाले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी थाटात आपलं नाव नोंदवलं.

आता गोष्ट इथंच थांबत नाही, पुढचे किस्से वाचा-

हिमालयात विशेषत: लेह-लडाखमध्ये बाईक घेऊन जायचं हे आपल्यापैकी कितीतरी जणांचं स्वप्न असणार. आशिष पण लेह-लडाखला गेले, पण बाईक रायडींगला नाही तर पळायला. लेह-लडाखमध्ये ‘ला अल्ट्रा मॅरेथॉन’ नावाची स्पर्धा होते. कमी प्राणवायू, उंचावर धावणं अशा आव्हानांचा सामना करत पळणं हा काही सोपा विषय नाही. आशिष तिकडं पहिलं मॅरेथॉन १११ किलोमीटरचं पळाले, त्यानंतर दुसरं आव्हान होतं ३३३ किलोमीटरचं. हे दुसरं मॅरेथॉन पळताना एक जबरदस्त किस्सा घडला.

तो जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं थेट आशिष यांच्याशीच संपर्क साधला. त्यांनी सांगितलेला किस्सा ऐकून अंगावर काटा येईल, ”३३३ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये मी धावत होतो. शेवटचा पास होता, मी तेव्हा सलग १६ तास काहीही सॉलिड फूड पोटात नव्हतं. त्यात ऑक्सिजनही कमी झाला होता. त्यामुळं माझ्या मेंदूवर प्रेशर येत गेलं आणि भ्रम निर्माण झाला. मला असं वाटत होतं की मी रेस आधीच पूर्ण केलीये, हे लोक मला उगाच पळवतायत, मी पहिला भारतीय आहे म्हणून यांना काहीतरी स्पेशल करायचं असेल. त्यामुळं मी पळायला नकार देत होतो. पण एका कॉर्नरला मला संयोजक दिसले, फिनीशचा फ्लॅग दिसला आणि मी पळालो. ती रेस फिनिश केली हा अत्यंत भावनिक क्षण होता. फिनिशनंतर मला ऑक्सिजन लावण्यात आला आणि डॉक्टरनं सांगितलं की, आणखी काही वेळ मेंदूवर प्रेशर येत राहिलं असतं, तर कायमचं अपंगत्व आलं असतं.”

आता एवढं झाल्यावर आपण जरा घाबरलो असतो, पण आशिष यांनी फुल्ल तयारी केली आणि ते ५५५ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये धावले आणि विशेष म्हणजे तिथं त्यांना कोणताही त्रास झाला नाही.

हे वाचून दमला असाल, तर एक दीर्घ श्वास घ्या, कारण अजून किस्से बाकी आहेत…

११/११/२०११ तारखेला आशिष यांनी सलग २२ तास सायकल चालवत पुण्यावरुन गोवा गाठलं. १२/१२/२०१२ ला सलग २३ तास चालत त्यांनी पुणे ते पाचगणी असा प्रवास केला. पुढच्याच वर्षी ११/१२/२०१३ ला पुणे-मदुराई-पुणे असा सलग ३६ तासांचा प्रवास बाईकवरुन केला.

आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी सलग ६० दिवस ४२ किलोमीटर पळायचं म्हणजे काय खायचं काम नाही. पण ते करण्यासाठी नीट खावंही लागतं. आशिष सांगतात, ”खाण्यापासून झोपेपर्यंत मी प्रत्येक गोष्टीचं वेळापत्रक बनवलं होतं. धावण्याची तयारी जितकी महत्त्वाची होती, तितकीच विश्रांतीही. शिस्त आणि माझ्या टीमनं दिलेल्या साथीमुळं मी हा विक्रम करु शकलो.”

आता आम्हाला वाटलं की एवढं करुन तरी आशिषना दम लागला असेल, पण गडी काय ऐकायला तयार नाही. अमेरिकेत एक बॅडवॉटर नावाची फूट रेस होते, ज्यात तुम्हाला ५० डिग्री तापमानात २१७ किलोमीटर अंतर पार करायचं असतंय, या रेसचं वर्णन जगातली सगळ्यात कठीण फूट रेस असं केलं जातं. यात समुद्रसपाटीपासून सुरुवात करायची आणि उंचावरचं शिखर गाठायचं असला डेंजर कार्यक्रम असतोय. ती रेस हे आशिष यांचं पुढचं टार्गेट आहे. 

नाद नाहीच, इथं नुसता विचार करुनच आपले पाय दुखायला लागलेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.