हर्बल तंबाखू काय सापडली नाही, पण या कंपनीनं मार्केटमध्ये हर्बल सिगारेट आणलीये…

तुम्ही कुठलाही पिक्चर बघायला थिएटरमध्ये जा, पिक्चर सुरू व्हायच्या आधी जाहिराती लागतात. दुसऱ्या कुठल्या तरी पिक्चरचा ट्रेलर लागतो, त्या थिएटरची जाहिरात लागते. काही सरकारी जाहिरातीही असतात, त्यातलीच एक फेमस जाहिरात म्हणजे मुकेशची.

लोकांनी धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करणं थांबवावं, या उद्देशानं नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ टोबॅको इरॅडिकेशन या संस्थेनं थिएटरमध्ये कॅन्सरग्रस्त मुकेशचं मनोगत आणि स्पंज दाबून छातीत घुसलेलं टार दाखवणारी जाहिरात दाखवायला सुरुवात केली.

जहिरातीत दिसणारा मुकेश हराने हा अभिनेता नव्हता, तर व्हायच्या विशीत कॅन्सरनं आजारी असणारा मुलगा होता. अवघ्या २४ व्या वर्षी मुकेशनं जगाला अलविदा केलं, मात्र जाहिरातीतला त्याचा आशाहीन चेहरा आणि दर्दनाक मनोगत आजही आपल्या लक्षात आहे.

पण काही लोक मुकेश स्क्रीनवर दिसला की उगाच पाचकळ विनोद मारतात, काही जण एकदम दु:खी चेहरे करतात आणि बाहेर जाऊन सिगरेट पितात. थोडक्यात काय, तर तंबाखूच्या व्यसनापायी जीव गेलेल्या माणसाचं मनोगत ऐकूनही लोकं सिगारेट, तंबाखू सोडण्याचं काय मनावर घेत नाही.

आता मध्ये राजकीय वादावादीत हर्बल तंबाखू हा नवीनच ट्रेंड मार्केटमध्ये आला. पण चार-पाच पान टपऱ्यांवर मामा जरा हर्बल तंबाखू द्या म्हणल्यावर टपरीवाल्यांनी लय घाण लूक दिला. त्यामुळं हर्बल तंबाखूचं नेमकं गणित आणि मार्केटमधलं नाव काय आम्हाला घावलं नाय.

हर्बल सिगारेट

मग असंच एक दिवस मोबाईलवर उंडगेगिरी करताना आम्हाला, हर्बल सिगारेट नावाचा नवीन विषय मार्केटमध्ये आलाय हे समजलं. आता आपल्याला काय धुराचा नाद नाही, पण पिणाऱ्यांची काळजी म्हणून विषय जरा डिटेलमध्ये पाहिला.

मारुक हर्बल स्मोक्स असं त्या ब्रँडचं नाव. त्यात पाकिटावर खाली लिहिलेलं नो निकोटीन, नो केमिकल्स, नो स्मेल. आमची काळजी जरा उचंबळून आली म्हणून आम्ही एकदम डिटेलमध्ये माहिती घेतली. तर हे हर्बल स्मोक्स बनवलेत पुण्यातल्या ‘अनंतवेद रिसर्च लॅब्स’ नावाच्या कंपनीनं. मग आम्ही त्यांच्याबद्दल जरा माहिती काढली..

पानटपरीवाल्यांना विचारुन नाय, तर इंटरनेटवरुन.

डॉ. राजस नित्सुरे हे हर्बल स्मोक्समध्ये संशोधन करणाऱ्या नित्सुरे यांच्या तिसऱ्या पिढीचे सदस्य आहेत. अनंत नित्सुरे यांनी १९६० साली आयुर्वेदात लिहिलेल्या संदर्भाच्या आधारे नैसर्गिक गोष्टींच्या धुराचा वापर करुन उपचार करण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर, उदय नित्सुरे यांनीही हर्बल स्मोक्ससाठीच्या संशोधनात हातभार लावला, १९९६ मध्ये हर्बल स्मोक्सच्या उत्पादनाची नोंदणी झाली. पुढे २००० मध्ये राजस नित्सुरे हे सुद्धा या व्यवसायात उतरले. जवळपास १० वर्ष संशोधन करुन त्यांनी माहिती गोळा केली आणि २०१५ मध्ये पेटंट दाखल केले.

पुढं २०२० मध्ये आणखी जास्त संशोधन करुन बनवलेल्या त्यांच्या उत्पादनांना पेटंट मिळालं आणि त्यांच्या मारुक हर्बल स्मोक्स सिगरेट मार्केटमध्ये आल्या.

आता सिगारेट पिणाऱ्यांचे वेगवेगळे ब्रॅण्ड्स आणि फ्लेवर असतात, तसे यांनी पण वेगवेगळे फ्लेवर्स आणलेत, ज्यांची नावं आहेत मेडिटेशन्स, वॉटरफॉल्स आणि फॉरेस्ट ट्रेल्स. या कंपनीनं असाही दावा केलाय, की ‘हे हर्बल स्मोक्स आयुर्वेदातील पद्धतींनुसार बनवले आहेत. यानं शरीराला काहीही अपाय होत नाही.

सिगारेटचं व्यसन असणाऱ्या व्यक्ती हर्बल स्मोक्स सिगरेटचा वापर करुन तंबाखूचं सेवन टाळू शकतात. सोबतच आमचे काही फ्लेवर्स हे कफ कमी करण्यात उपयुक्त आहेत. हर्बल स्मोक्स सिगारेट्समुळे श्वसनाचे विकारही बरे होऊ शकतात.’

आयुर्वेदिक मेडिकल आणि पान टपऱ्यांवर हे हर्बल स्मोक्स मिळावेत म्हणून कंपनीचे प्रयत्नही सुरू आहेत. थोडक्यात काय, तर कंपनीच्या दाव्यानुसार ही अशी सिगारेट आहे जी तुमचं धूम्रपान तर सोडवेलच, पण तुमचं आरोग्यही सुधारेल आणि सिगारेट सुटली नाही, तरी तुमची मुकेशसारखी दुर्दैवी अवस्था होण्याची शक्यताही कमी होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.