सलमान ज्या 3 गोष्टी कधीच विसरू शकत नाही त्यावरच पुण्याच्या कंपनीने गेम आणलीय…

समजा, फक्त समजायच आहे बर. सलमान खानला भूतकाळातल आठवायचं बंद झाल तर तो जवळपास सगळ्या गोष्टी विसरेल. पण भावा सलमान खान ३ गोष्टी मात्र काही झालं तरी विसरायचा नाही. यातील पहिली गोष्ट म्हणजे ऐश्वर्या रॉयसोबतच जगजाहीर वाद, दुसरी गोष्ट म्हणजे काळवीट शिकार आणि तिसरी म्हणजे २००२ मधील हिट अँड रनची केस.

आता या सगळ्या घटनांची कारण आणि परिणाम, त्या केसचा निकाल याचा अभ्यास हा काय आपला आजचा विषय नाही. तर विषय आहे या ३ गोष्टी म्हणजे सलमानसाठी अत्यंत दुःखद आठवणी मानल्या जातात. पण पुण्याच्या एका कंपनीने भावाच्या या ३ आठवणींवर एक गेम आणलीय. पुण्याच्या पॅरोडी स्टुडिओज नावाच्या कंपनीने ही गेम आणलीय. नाव आहे,

सेलमोन भोई

या गेमचं जे इंटरफेस आहे ते अभिनेता सलमान खान आणि त्याच्या आयुष्याशी निगडित असल्याचं स्पष्टपणे दिसून येते. गेमच्या स्टोरीलाईन नुसार या गेममधील मुख्य पत्राच अर्थात लीड कॅरॅक्टरचं नाव आहे ‘सेलमोन भोई’. गेमच डिस्क्रिप्शन पण कंपनीने सलमानच्या भूतकाळातील निगडित घटनांशी संबंधित दिलं असल्याचं दिसून येते.

जेव्हा गेमची सुरुवात होते तेव्हा हे कॅरॅक्टर आधी ‘ऐश’ नावाची दारू पितो. त्यानंतर रात्री गाडी चालवतो. गेमचे तीन स्टेज आहेत. मात्र गेमची सुरुवात एका डिस्क्लेमर सोबत होती. ते म्हणजे,

‘या गेमचे प्रेझेंटेशन केवळ काल्पनिक आहे’

गेमची पहिली स्टेज आहे ग्रीन लेवल. यात सेलमोन भोई कोणत्या तरी पार्कसारख्या जागेवर हरीण आणि एलियंसवर (जे सामान्य माणसांसारखे दिसतात) गाडी चढवून मारतो.

दुसरी स्टेज आयस लेवल. यात सेलमोन भोई कोणत्या तरी बर्फाळ जागेवर पोलर बियर सारख्या कॅरॅक्टरला मारतो.

तर तिसरी स्टेज आहे डेजर्ट लेवल. या स्टेजमध्ये वाळवंटातील जागेवर कॅरॅक्टर उंट आणि विंचवांवर गाडी चढवून मारतो.

आता हे सगळं वाचल्यानंतर कोणच्या मनात काहीच शंका नाही कि हि गेम सलमान खानशी संबंधित आहे. अगदी न्यायालयाने देखील हे मान्य केलं आहे. गेममधील गोष्टी काळवीट शिकार प्रकरण, २००२ मधील हिट अँड रन केस आणि ऐश्वर्या रॉयसोबत त्याचे झालेले वाद या घटनांची स्पष्ट आठवण करून देतात.

मागच्या काही दिवसांपासून हि गेम तरुणाईमध्ये चांगलीच फेमस होतं आहे. त्यामुळे गेमला ४.७ स्टार्सचं रेटिंग देखील मिळालं आहे. जवळपास १० हजार जणांनी हि गेम आतापर्यंत डाउनलोड केलीय.

याच सगळ्यामुळे वैतागून जात सलमान खानाने मुंबईच्या सिव्हिल कोर्टात केस दाखल केलेली.

या सगळ्या साधर्म्यामुळे सलमान खानाने पुण्याच्या पॅरोडी स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर्स, गुगल LLC आणि गुगल इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्याविरोधात मुंबईच्या सिव्हिल कोर्टात केस दाखल केली होती आणि लवकरात लवकर या गेमवर बंदी आणावी अशी देखील मागणी केली होती.

सलमान खानाने आपल्या कायदेशीर सल्लागारांमार्फत न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हंटले आहे कि,

सलमान खानचे चाहते त्याला सलमान भाई म्हणतात आणि या गेमचं नाव देखील काहीस साधर्म्य असणारं असल्याने सलमानची प्रतिष्ठा मलीन होत आहे. सोबतच हा गेम बनवणाऱ्या कंपनीने सलमान खानची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळेच या गेमवर लवकरात लवकर बंदी आणावी.

सलमान खानच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायाधीश केएम जयस्वाल यांनी या गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

या गेमची रचना आणि त्यातील अनेक गोष्टी या सलमान खानशी संबधीत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. शिवाय हा गेम बनवणाऱ्या कंपनीने सलमान खानची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे कोर्टाने या गेमची निर्मिती करणारी कंपनी पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला गुगुल प्ले स्टोर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून हा गेम त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

सोबतच कंपनीच्या डायरेक्टर्सना सलमानशी संबंधित कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य किंवा त्रास होईल अश्या कृतीवर बंदी घातली आहे. तर हा गेम काल्पनिक असल्याचा दावा गेमिंग कंपनीने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर होणार आहे. आता २० तारखेला कंपनी काय सांगणार आणि सलमान खान काय दावा करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.