पुण्यात बस सुरु झाली तेव्हा एकही प्रवासी मिळणार नाही म्हणून पैजा लागल्या होत्या..

पुण्याची प्रत्येक गोष्ट स्पेशल असते. ती तशी नसली तरी पुणेकर ती स्पेशल बनवतात. लोणी धपाटे कुठले आहे ही महत्वाची गोष्ट नाही. ते पुण्यात विकले जात असले तर ते पुणे स्पेशल. पुण्यातल्या लोकांना पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रूप. जुन्या गोष्टीचं तर फार.

अजूनही कित्येकांची तिरडी प्रत्यक्षात वैकुंठाला जाणार असली तरी बोलताना गोवरया ओंकारेश्वरलाच जातात. आपल्या देशात फार कमी शहराबद्दल एवढ विपुल लिखाण झालं असेल. त्यात पुणे अग्रेसर आहे.

पुण्याबद्दल प्रवासवर्णन, इतिहास आणि स्मरणरंजन या प्रकारचं खूप लिहून झालंय. जुने लेखक श्री ज जोशी यांनी पुण्याबद्दल खूप छान लिहिलंय.

आठवणी वजा लिखाणात त्यांनी जुन्या पुण्याचं चित्र उभं केलंय. त्यातल्या पुण्यातल्या बसच्या लेखाची आजही गंमत वाटते. टांगेवाल्यांची सवय असलेल्या पुण्यात जेंव्हा बस येणार हे नक्की झालं तेंव्हा गोंधळ उडाला होता. लोक कौतुकाने बस या एकाच विषयावर बोलत होते. त्याकाळच्या म्हाताऱ्या लोकांनी पुण्यात बस सुरु झाली तर तिला एकही गिर्हाईक मिळणार नाही अशा पैजा लावल्या होत्या.

खुद्द श्री ज जोशी यांचे वडील म्हणाले होते,

बस सुरु करायला म्युनिसिपालटीला वेडबिड लागलंय का? बसमधून फिरायला इथं कोण मामलतदार लागून राहिलेत? मंडईत किंवा तुळशीबागेत जायला बस लागावी इतकी शेणामेणाची माणसं आम्ही नाहीत.

पुण्याची पीएमटी पुढे कशी होणार आहे किंवा पुणे किती वाढणार आहे याची कल्पना नसलेले लोक होते. त्यामुळे खूप लोकांना शंका होती की बसमध्ये कुणीच बसणार नाही. मंडईत भाजीला जाणे, तुळशीबाग, बेलबाग फिरणे किंवा फार झालं तर नव्या पुलावर जाऊन भेळ खाणे आणि अतीच गोष्ट म्हणजे लाकडी पूल ओलांडून जिमखान्यावर श्रीमंत लोकांना भेटणे. या गोष्टीला बसची गरजच नव्हती त्याकाळी.

तरी बस सुरु झाली. बस येणार हे पहायला लोकांनी गर्दी केली होती. लोक बस येणार, जवळ आली अशी जोरजोरात कॉमेंट्री करत होते.

खरोखरच जेंव्हा लाल रंगाची बस आली तेंव्हा धक्काबुक्की करत लोक बसमध्ये चढले. रांग लावणे वगैरे प्रकार नव्हताच. मुंबईची बस पाहिलेल्या माणसांना पुण्याची बस खेळण्याप्रमाणे वाटली. उंच माणूस उभा राहिला तर त्याचा डोकं टपाला लागायचं त्या बसमध्ये. श्री ज जोशी म्हणतात की तरीही आम्हाला आमच्या बसचं कौतुक होतं.

हे सांगताना ते लिहितात की, कौतुक करण्याचा एक स्वतंत्र अवयवच पुणेकराला असतो.

पुण्याच्या त्या सुरुवातीच्या बसमध्ये एक प्रकारचा घरगुतीपणा होता असं लेखक म्हणतात. म्हणजे कंडक्टर ओळखीचा असणे. त्याने वर्गात असलेल्या मालती पटवर्धनचं लग्न झालं आणि तिचा नवरा किंचित चकना आहे असं सांगणे. हे सगळं बसमध्ये बसल्या बसल्या कळायचं. कंडक्टर या सगळ्या गोष्टी सांगायचा. वासू गाडगीळ दिल्लीत गेलाय, त्याची बायको मात्र फटाकडी आहे इथपासून ते दिवे मास्तरला आता मुळीच दिसत नाही इथपर्यंत.

त्याकाळी पुण्यात बसचे दोनच मार्ग होते. सात आणि सहा. सात हा ब्राम्हणी आणि सहा बहुजनसमाजवादी.

मंडईतलं सहा नंबरमध्ये दिसत तर कॉलेजतरूंनी सातमध्ये. मुलांना कॉलेजमध्ये मुलींशी बोलायची सोय नव्हती. मुली लांबूनच दिसायच्या त्यामुळे त्यांच्या पदराचा वारा सुद्धा अंगाला लागायची सोय नव्हती. पण बस मुळे मुलांना मुली जवळून दिसायला लागल्या. शेजारी उभं राहून प्रवास करायला मिळू लागला. ही बसने घडवलेली मोठी क्रांती होती.

पुढे डबल डेक बस सुरु झाली. त्यावेळची एका कंडक्टरची प्रतिक्रिया लेखकाने नोंदवली आहे.कंडक्टर म्हणाला,

डबल डेकची काही जरूर नव्हती. हौस म्हणून ती घेतली आहे इतकच.

अहो पुणे हे शहर आहे का? नुसती माणसांची संख्या वाढली म्हणजे शहर होत नाही.पुणे खर म्हणजे खेडच आहे. इथले रस्ते बघा. इथल्या माणसांच्या चालण्याच्या पद्धती बघा.’ कंडक्टरच्या या बोलण्याचा लेखकाला राग आला होता आणी त्याने वाद घातला.

पण आजही ट्राफिकची समस्या बघितली की तो कंडक्टर चुकीचं बोलला होता असं वाटत नाही. आज पुण्यात बसचे कितीतरी मार्ग आहेत. पण एकेकाळी याच पुण्यात बसमध्ये लोक बसणारच नाहीत असा लोकांना विश्वास होता हे वाचून आश्चर्य वाटतं.

त्याआधी पुण्यात फक्त टांगे होते. तो घोड्याच्या शेणा मुताचा वास लोकांच्या ओळखीचा होता. एखादा टांगा गल्लीत आला की अख्खी गल्ली हादरून जायची. घोड्याच्या टापांचा आवाज, टांग्याच्या चाकांचा आवाज आणी टांगेवाल्याचा हाईक असा रागातला आवाज.

या आवाजाची सरमिसळ त्याकाळच्या लोकांच्या डोक्यात घट्ट होती. त्यात एक ताल होता. लय होती. बसने ते सगळं विसरायला लावलं.

काळ किती बदललाय. त्याकाळी नूतन मराठीच्या विद्यार्थ्याला हुजुरपागेतल्या मुली म्हणजे विश्वसुंदरी वाटायच्या. आणि त्यांच्याकडे बघून कुठल्या कवितेच्या ओळी मनात यायच्या? ‘ हे मंड मंडे पद सुंदर कुंददन्ती. चाले जसा मंड धुरंधर इंद्रदन्ती.’ आज एफसी रोडने सगळं बदलून टाकलंय. भाषा, प्रेम, कपडे सगळं. तरीही श्री. ज. जोशींसारख्या लेखकाचं लिखाण वाचलं की पुन्हा आपल्या आपल्या आठवणीत आपण रमायला लागतो.

अचानक पीएमटी समोरून जाते. आपण आता मात्र वेगळ्याच कारणाने पीएमटीत बसणार नाही म्हणतो.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.