पडले तरी चर्चेत राहिले…हेमंत रासनेंची राजकीय ताकद सांगते पुन्हा २०२४ फिक्स !
आजच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल म्हणजे सर्व राज्याच्या इंटरेस्टचा विषय. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूका लागल्या, निकाल लागला आणि कसबा काँग्रेसच्या हातात गेला..
कसबा पेठ हा तर भाजपचा बालेकिल्ला. १९९५ पासून सलग ५ टर्म गिरीश बापट या मतदारसंघाचे आमदार होते, त्यांची खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर माजी महापौर मुक्ता टिळक कसब्याच्या आमदार झाल्या.
मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी गेल्या ३० वर्षांचा कसब्याचा इतिहासच बदलून टाकला.
भाजपच्या कसब्यातून कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झालेत. ते ही ११,०४० हजारांच्या फरकाने…जिकडे तिकडे धंगेकरांची चर्चा आहे मात्र हेमंत रासनेंचा पराभव झाला असला तरी रासने निवडणुकीच्या मैदानात अगदी उमेदवारी मिळवण्यापासून चर्चेत होते आणि आजही आहेत.
जेंव्हा विषय भाजपमधून उमेदवारी कुणाला द्यायची होता तेंव्हा चर्चेत अनेक नावं होती. टिळक कुटुंबातली दोन नावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अशी ओळख असणारे धीरज घाटे, गणेश बिडकर इत्यादी मात्र या सर्वांना पिछाडीवर टाकत उमेदवारीची माळ रासने यांच्या गळ्यात पडलीये.
भले आज हेमंत रासने ११ हजारांच्या मतांनी पडले असले तरी त्यांची राजकीय ताकद पाहिल्यास लक्षात येतं कि येत्या २०२४ साठीच्या विधानसभा निवडणुकीसाठी पून्हा एकदा त्यांच्या उमेदवारी पक्की होऊ शकतेच.
त्यामुळे रासने यांच्या राजकीय ताकदीची माहिती असायला हवी.
तर २००२ मध्ये रासने पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकांमध्येही त्यांनी यश मिळवलं. त्यांच्या प्रभागातला शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ हे भाग आहेत. जुने वाडे, ट्रॅफिकची समस्या आणि पाणीपुरवठा या स्थानिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेमुळे रासने कायम चर्चेत राहीले.
मात्र त्यांनी आपला होल्ड प्रस्थापित केला, तो पुण्याच्या महानगरपालिकेवर. महानगर पालिकेची आर्थिक तिजोरी म्हणजेच स्थायी समिती. २०१९ मध्ये रासने पहिल्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पुणे महानगर पालिकेत कुठल्याच नगरसेवकाला स्थायी समितीच्या अध्यक्षपदी दोनदा संधी मिळाली नव्हती, मात्र हेमंत रासने यांनी सलग चार टर्म स्थायी समितीचं अध्यक्ष भूषवलं.
त्यामुळे स्थायी समितीवर आणि पर्यायानं पुणे महानगरपालिकेवर त्यांचा होल्ड कायम राहिला.
विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट कसबा पेठेचे माजी आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचा प्रभाग कसबा पेठ मतदार संघात येतो, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांचाही प्रभाग कसबा मतदारसंघात आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून संधी मिळालेल्या हेमंत रासने यांचाही. एवढी सगळी ताकद भाजप एकाच मतदारसंघात लावत असल्यानं पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चा होऊ लागल्या, त्यातून इतरांचे पत्ते कट झाले मात्र हेमंत रासने यांचं पद पक्षाच्या हायकमांडकडून कायम ठेवण्यात आलं.
स्थानिक राजकारणातही हेमंत रासने यांचा दबदबा आहे, याचं कारण म्हणजे त्यांचा प्रभाग येतो शनिवार आणि सदाशिव पेठेत. या दोन्ही पेठामध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अधिक आहे, जे भाजपचे पारंपारिक मतदारही आहेत. पूर्ण कसबा पेठ मतदारसंघाचंच बोलायचं झालं, तर इथंही ब्राह्मण टक्का आणि भाजपचे पारंपारिक मतदार मोठ्या संख्येनं आहेत, ज्याचा रासनेंना आजच्या निवडणुकीत फायदा झाला नाही मात्र येत्या काळात इथं त्यांनी जोर लावला तर साहजिकच पुढच्या निवडणुकीत त्याचा फायदा रासनेंना होऊ शकतो.
रासने यांची ताकद तगडी असण्याचं कारण म्हणजे पुण्यातली गणेशोत्सव मंडळं
पुण्यात येणारे मोठे राजकीय नेते किंवा उच्चपदस्थ हे हमखास दगडूशेठ गणपतीला भेट देतात. या ट्रस्टला वर्षाकाठी काही कोटी रुपये दानातून मिळतात. हेमंत रासने हे दगडूशेठ गणपती ट्रस्टचे ट्रस्टी आहेत, वेगवेगळ्या पदांवर कामही केलं आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांपासून राज्यातले नेतेही पुण्यात आल्यावर दगडूशेठ गणपतीला भेट देतात त्यावेळी साहजिकच हेमंत रासने यांचा त्यांच्याशी थेट संबंध येतो. त्यामुळं सगळ्याच नेत्यांशी चांगले संबंध ठेवणं त्यांना जमत असल्याची चर्चा असते.
सोबतच पुण्यात मोठ्या संख्येनं असलेल्या गणेशोत्सव मंडळांमध्येही रासने यांची उठबस आहे, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे.
सोबतच दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टनं स्थापन केलेल्या सुवर्णयुग सहकारी बँकेचेही ते अध्यक्ष आहेत. जवळपास २००९ पासून ते या बँकेच्या संचालक मंडळाचा भाग आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार या बँकेच्या २२ शाखा, १३३५ कोटींचा व्यवसाय आणि ८०९ कोटींच्या ठेवी आहेत.
२०१९ पासून हेमंत रासने हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आहेत, महापालिकेची मुदत संपल्यानंतरही स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे रहावं यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती.
त्यांच्याच कार्यकाळात पुण्यात मेट्रो सुरू झाली, लॉकडाऊनच्या काळातही पुणे महानगरपालीकेनं विक्रमी महसूल मिळवला, नवे रस्ते आणि उड्डाणपूलही उभे राहिले.
या सगळ्या विकासकामांच्या जोरावर कसब्यासाठी पुढील निवडणुकीसाठी हेमंत रासने हे आजपासूनच सुरुवात करतील हे मात्र नक्की.
हे ही वाच भिडू:
- चर्चा १० वर्ष आणि काम ५ वर्षांत, असा झाला पुणे मेट्रोचा प्रवास
- बँगलोर नंतर ‘आयटी हब’ होण्याचा चान्स पुणे घालवतंय का ?
- काँग्रेसचा गड असणारं पुणे, भाजपचा बालेकिल्ला कसं बनत गेलं..?