पुण्यातील त्या एका वादानं उत्तरप्रदेशातील राजकारण कायमचं बदलून टाकलं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारतात दलित आंदोलनामध्ये दुसरं मोठं नाव कोणाचं मानलं जातं असेलं तर ते कांशीराम यांचचं.
बहुजन नायक, साहेब अशा विविध नावांनी देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या कांशीराम यांनी १९८४ मध्ये एका नव्या आंदोलनाची सुरुवात केली आणि त्याला नाव दिलं ‘बहुजन समाजवादी पक्ष’. हा तोचं पक्ष होता ज्याने पुढे जावून चार वेळा भारताचं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये आपलं सरकार स्थापन केलं होतं. त्यातुन तिथलं राजकारण आणि समाजकारण कायमचं बदलून ठेवलं. सोबतचं देशातील इतर राज्यांमध्ये आणि केंद्रातील सरकारमध्ये देखील महत्वाची भुमिका पार पाडली होती.
पण अशा या देशभर आपली छाप सोडणाऱ्या पक्षाची स्थापना होण्यामागचा इतिहास मात्र मोठा रंजक आहे, आणि या इतिहासाची सुरुवात होण्यासाठी कारण ठरलं होतं पुण्यातील एक वाद…
पंजाबच्या रोपड जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या कांशीराम यांना आपलं बीएससीचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर १९५७ मध्ये पहिली सरकारी नोकरी मिळाली सर्वे ऑफ इंडियामध्ये. पण इथं त्यांनी बॉन्ड साइन करण्यासाठी नकार दिला आणि ती नोकरी त्यांना हातची गमवावी लागली. पण त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९५८ मध्ये त्यांना पुण्याच्या एक्सप्लोसिव रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली.
पुण्यात आल्यानंतर कांशीराम या सांस्कृतीक शहराच्या अक्षरशः प्रेमात पडले. सोबतचं ते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या लिखानाच्या संपर्कात आले. या सगळ्यासोबतं त्यांना इथं वर्णव्यवस्थेला देखील सामोरं जावं लागलं. त्यातुनचं त्यांच्या कार्याला हळूहळू सुरुवात झाली.
कांशीराम यांच्या सोबतं तिथं राजस्थानच्या जयपूरचे निवासी असलेले दीनाभाना हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. ते या ठिकाणी एससी अॅन्ड एसटी वेलफेअर असोसिएशनशी संबंधित होते.
त्यावेळी इथल्या प्रशासानानं अचानक एक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सुट्टी रद्द केली. त्यावरुन दीनाभाना यांचा आपल्या वरिष्ठासोबत वाद झाला. याच कारणावरुन त्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं.
दिनाभाना यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील डी. के. खापर्डे यांना देखील त्यावेळी निलंबित करण्यात आलं. ते महार जातीचे होते. कांशीराम यांना जेव्हा हा सगळा प्रकार समजला तेव्हा ते म्हणाले की,
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी न देणाऱ्यांची जोपर्यंत मी सुट्टी करत नाही तोपर्यंत मी शांतपणे बसू शकत नाही.’
याच सिंहगर्जनेसोबत कांशीराम वंचितांसाठीच्या संघर्षात उतरले. त्यामुळे त्यांना देखील निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी थेट त्या अधिकाऱ्याला मारहाण केली ज्यांनी त्यांना निलंबित केलं होतं. मात्र त्यानंतर दीनाभाना यांना पुन्हा कामावर घेतलं. त्यांची बदली दिल्लीमध्ये करण्यात आली.
पण कांशीराम यांनी विचार केला की, जर आपल्यासारख्या अधिकाऱ्यांवर असा अन्याय होत असेल तर देशातील दलित आणि मागासवर्गीयांवर किती होत असेल. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि दीनाभाना, डी. के. खापर्डे आणि कांशीराम या तिघांनी एकत्र येत दलित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्वात मोठी संघटना असलेल्या बामसेफची स्थापना केली.
६ डिसेंबर १९७३ साली अशी संघटना स्थापन करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर ६ डिसेंबर १९७८ साली राष्ट्रपती भवनच्या समोर असलेल्या बोट क्लब मैदानावर या संघटनेची औपचारिक स्थापन करण्यात आली. या संघटनेला ‘बर्थ ऑफ बामसेफ’ असं नाव देण्यात आलं. बामसेफच्या बॅनरखाली कांशीराम आणि त्यांच्या साथीदारांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला.
बामसेफच्या माध्यमातुन कांशीराम यांनी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दलित कर्मचाऱ्यांचं एक मजबूत संघटन उभं केलं. तेव्हा त्यांनी समाजाला सांगितलं होतं की, ‘त्यांना जर स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल तर मनुवादी समाज व्यवस्था मोडून काढली पाहिजे.’
बरेच अधिकारी आणि कर्मचारी ही संघटना चालवण्यासाठी आपल्या पगाराचा बहुतांश हिस्सा देत होते. बामसेफच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचे काम सुरु होतं. याच बामसेफमध्ये असताना तत्कालिन आरोग्यमंत्री राजनारायण यांना त्यांच्याच सभेमध्ये दलित प्रश्नी सगळ्यांसमोर उत्तर देवून मायावती प्रकाश झोतात आल्या होत्या. त्यानंतर मायावती कांशीराम यांच्या संपर्कात आल्या.
यानंतर सामान्य बहुजनांचे संघटन करण्यासाठी कांशीराम यांनी १९८१ मध्ये डीएस-4 ची अर्थात (दलित शोषित समाज संघर्ष समिती) स्थापना केली. याचा नारा होता ‘ठाकूर, ब्राम्हण, बनिया छोड, बाकी सब है डीएस-४’. हे एक राजकीय व्यासपीठ नव्हतं. मात्र या माध्यमातून कांशीराम यांनी फक्त दलित नाही तर अल्पसंख्यांकांना देखील एकत्र करण्यास सुरुवात केली होती.
डीएस- 4च्या माध्यमातूनच त्यांनी जनसंपर्क अभियान सुरु केलं. सायकल मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सात राज्यांमध्ये जवळपास ३ हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला. यामाध्यमातून ते दलित आणि मागासवर्गीय लोकांना एकत्र आणत होते.
बहुजन समाजवादी पक्षाची स्थापना
या दोन संघटनांच्या स्थापनांनंतर कांशीराम इथचं थांबले नाहीत. १९८४ साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की,
‘राजकीय सत्ता अशी चावी आहे ज्या माध्यमातून सर्व टाळे खोलू शकतो.’
त्यामुळे त्यांनी मायावतींना सोबत घेत बहुजन समाजवादी पक्षाची स्थापना केली. आणि प्रत्यक्ष निवडणूकीच्या राजकारणात उतरायला सुरुवात केली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभुतीच्या लाटेत बसपच्या हातात काहीही लागलं नाही. पण कांशीराम कार्यकर्त्यांना सतत सांगत असतं,
“पहला चुनाव हारने के लिए, दूसरा चुनाव हरवाने के लिए. और फिर तीसरे चुनाव से जीत मिलनी शुरू हो जाती है”
याच तत्वानुसार पुढे राजीव गांधी यांच्या काळात झालेल्या पश्चिम उत्तरप्रदेशमधील पोटनिवडणूकांमध्ये कांशीराम यांनी मायावतींना उतरवलं. एकदा बिजनोर, एकदा हरिद्वार. पण सलग तीन पराभव झाल्यानंतर १९८९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये बसपाचं खात उघडलं. मायावती लोकसभेत पोहोचल्या.
यानंतरच्या काळात बसपानं मागं वळून बघितलं नाही. पुढे उत्तप्रदेशच्या सरकारमध्ये सहभागी आणि त्यानंतर चार वेळा स्वतः सरकार स्थापन केलं. केंद्रातील सरकारमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. अशा प्रकारे पुण्यातील एका वादानं देशातील सर्वात मोठ्या राज्यातील राजकीय गणित बदलून टाकली.
हे ही वाच भिडू.
- युपी सोडा मायावती पंजाब जिंकायची तयारी करतायत..
- या बाहुबलीची दहशत ठेचून काढली आणि युपीमध्ये आदित्यनाथांचा योगीराज सुरु झाला..
- वाजपेयींना हे दोन नकार ऐकून घ्यावे लागले, नाही तर आज भाजपची इमेज वेगळी असती..