पुण्यातल्या एका चौकामुळं भारताची जर्मनीशी घट्ट सोयरीक झाली…

अँजेला मार्केल या जर्मनीच्या पंतप्रधान बाईंनी मोदीजींचा हात हातात नाय घेतला म्हणून आमच्या पोरांनी धुराळा उडवला. त्यातही जर्मनी भारताच्या हितसंबंधांच्या विरोधात बोलते, सीरियातून येणाऱ्या मायग्रंट्स लोकांना फूस लावते म्हणून बरीच आदळआपट झाली होती.

पण पुण्यानं इतिहासापासून जर्मनीच्या पदराशी आपली गाठ बांधून ठेवली आहे.

भारत देशाचे नसतील एवढं हे हृदयीचे ते हृदयी बंध पुण्यानं जर्मनीशी विणून ठेवलेत.

कागदोपत्री याचा सगळ्यात जुना पुरावा सापडतो तो १९१३ साली. पांडुरंग दामोदर गुणे यांच्यापासून हा इतिहास सुरु होतो असा किमान पुरावा आहे.

जर्मनीच्या लोकांना भारताच्या संस्कृतीची प्रचंड ओढ होती. त्यामुळे भारतविद्येचा अभ्यास करायला अनेक तज्ज्ञ लोक भारतात येत. पुण्याचे तेव्हा धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे होते. दख्खन भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख होती. म्हणून या तज्ज्ञांनी पुण्यात येऊन संशोधन करायला सुरुवात केली.

याच काळात डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय लोकांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित केले. जर्मनीतील डॉ. ब्रुगमन आणि डॉ. किंडिशे या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते.

म्हणून या दोघांच्या निर्देशाने जर्मन आणि मराठी विद्यार्थ्यांची देवाणघेवाण सुरु झाली. तिथल्या  तुलनात्मक भाषाशास्त्र विषयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लाइपजिग विद्यापीठात मराठी विद्यार्थी जाऊ शकतील अशी तरतूद झाली.

यानुसारच पांडुरंग दामोदर गुणे हे १९१३ साली आपल्या पीएचडीसाठी जर्मनीत गेले. त्यांनी तेथे अध्ययन आणि संशोधन करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

या काळात त्यांनी जर्मनीत अनेक लोकांशी मराठी भाषेची नाळ जोडून दिली. त्याच्यानंतर अनेक मराठी पोरं जर्मनीत जाऊन आणि जर्मन माणसं मराठी शिकू लागली.

त्या काळातील आपल्या जर्मनीच्या वास्तव्यातील गुणे यांचा पत्रव्यवहार ‘माझा युरोपातील प्रवास’ या नावाने छापला गेला होता. हे तेथून शिक्षण घेऊन ते पुण्यात परतले. 

या शिक्षणाचा आणि जर्मनीच्या अनेक विद्यापीठांचे अध्ययन करून त्यांनी या भेटीत काय मिळवलं याचा प्रत्यय त्यांनी पुढच्याच काही वर्षांत दिला.

१९१७ मध्ये पुण्यात भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट बनवण्यात त्यांचा मोठा हातभार होता. जर्मनीच्या तोडीचे संशोधन पुण्यात व्हावे असा त्यांचा प्रयत्न तेव्हाच यशस्वी झाला. याकामी अनेक जर्मन प्राध्यापकांनी त्यांना मदत केली होती.

१९१४ साली भारतात जर्मनीचे शिक्षण देणे सुरु झाले. याचे तेव्हाचे एकमेव केंद्र होते पुणे…!

इथल्या न्यू इंग्लिश शाळेत जर्मनीचे वर्ग भरत. दिल्लीहून काही इंग्रज अधिकाऱ्यांची मुले जर्मन शिक्षण्यासाठी पुण्यात येत.

आज दिल्लीतील जेएनयु हे परदेशी भाषा शिकण्यासाठी महत्त्वाचे केंद्र झाले आहे. पण त्याची स्थापना झाली नव्हती तेव्हापासून पुणेकर जर्मन भाषेचे धडे गिरवत होते. २०१४ साली याच्या शंभरीनिमित्त जर्मन सरकारने पुण्यात मोठ्ठा जंगी कार्यक्रम आयोजित केला होता.

एव्हाना पुण्याला भेट देणाऱ्या जर्मन लोकांची संख्या वाढली होती. न्यू इंग्लिश शाळेत जर्मनीचे वर्ग सुरु झाल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १९१५ ला पुण्यानं जर्मनप्रेमाची अजून मोठी साक्ष उभारली.

फर्ग्युसन कॉलेजात त्या वर्षी जर्मन भाषेत बॅचलर पदवी म्हणजे बीएचा अभ्यासक्रम सुरु झाला. १९२४ साली याचाच पुढचा भाग म्हणून फर्ग्युसन कॉलेजात मास्टर्स पदवी घेण्यासाठी जर्मन भाषा उपलब्ध झाली.

अशीच गोष्ट तुकाराम गणू चौधरी यांचीही होती.

हा सामान्य घरातील मुलगा. पण १९२२ साली आपल्या दोन मित्रांबरोबर जर्मनीमध्ये तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्यांनी जर्मनी गाठली. साडेतीन वर्षात तिथल्या माणसांनी त्यांना आईवडिलांसारखा जीव लावला.

जर्मनीत हिटलरची सत्ता आली तेव्हा पुण्यातील बऱ्याच मंडळींनी त्याला पाठिंबा दिला होता.

पण पुण्याच्या जर्मन प्रेमाची साक्ष देणारं ठिकाण आणि मोठं स्मारक पुण्यातच आहे.

ते म्हणजे पुणे विद्यापीठ रस्त्यावर असणारा ब्रेमन चौक!

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स संस्थेनं जगातल्या अनेक शहरांशी आपले संबंध बनवले होता. त्या काळी जर्मनीचे दोन तुकडे पडले होते – पूर्व आणि पश्चिम. पुण्यातल्या लोकांची दोन्ही भागात ये-जा असायची. पश्चिम जर्मनीमधील ब्रेमन हे शहर पुण्याचाच जर्मन अवतार.

१९७६ साली ‘तेरे देस होम्स’ या ब्रेमेन शहरातील लोकांनी पुण्यातील अपंग मुलांवर इलाज करायला सुरुवात केली.

KEM हॉस्पिटल हे त्याचे केंद्र होते. पुणे शहर आणि आजूबाजूच्या गावांमधल्या अनेक पोरांवर याद्वारे इलाज करण्यात आला.

या गटाने पुणे जिल्ह्याच्या काही गावांमध्ये बायोगॅस केंद्रे उभारली. काही विद्यार्थ्यांसाठी एक्सचेंज प्रोग्रॅम सुरु केले. यातून त्यांचा पुण्याशी संबंध वाढत गेला. पुणे आणि ब्रेमेन यांच्यात बहिणी-बहिणी म्हणजे सिस्टर सिटी करार झाले.

म्हणूनच या मैत्री आणि सौहार्दाचे स्मारक म्हणून “पुणे-ब्रेमेन मैत्री चौक” असे नाव या चौकाला देण्यात आले.

इथं त्यासाठी एक सुंदर स्मारकही उभारण्यात आले. नुकतेच या स्मारकाचे नूतनीकरणही झाले आहे. या शहरात प्रसिद्ध असणारी ‘चार संगीतकारांची’ गोष्ट या चौकात दाखवली आहे.

‘ब्रेमेनचे संगीतकार’ ही गोष्ट जर्मन आज्ज्या आपल्या नातवंडांना सांगतात. कोंबडा, मांजर, कुत्रा आणि गाढव यांना निवांत जिंदगी जगण्यासाठी ब्रेमेनला जायचं असतं. त्यांनी मिळून कसा दंगा केला असं या गोष्टीचं स्वरूप आहे.

ग्रिम बंधूनी १८१९ मध्ये ही गोष्ट पहिल्यांदा छापली होती. खरं म्हणजे हे स्मारक त्या चौघांनी कोणतं वाद्य वाजवलं  याची कविकल्पना आहे. या चौघांनाच ते वाद्य वाजवता येईल अशी ही कल्पना आहे. पुण्यात आलेली जर्मन माणसं आवर्जून या जागी भेट देत असतात.

पिंपरी-चिंचवड, पुणे आणि ब्रेमेन शहरांनी मिळून अनेक विकासकामे सोबत करण्यासाठी १९९८ च्या ऑगस्टमध्ये एक करार केला आहे. त्यांचा स्नेह अजून टिकून आहे.

म्हणूनच मॅक्स म्युलर भवन ही Goethe Institut संस्थेची इमारत पुण्यातच आहे. दक्षिण आशिया भागात जर्मन भाषा आणि संस्कृती पसरवण्याचं काम ही संस्था करते. पण तिचा सगळा कारभार पुण्यातूनच चालतो.

डॉ. वसंत शिरवईकर यांनी ज्ञानेश्वरीचे जर्मन भाषेत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. अनेक जर्मन-मराठी कवी यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. भारतात येऊन वारी करणारे आणि विठोबा, म्स्कोबा आणि खंडोबा यांच्यावर संशोधन करणारे गुंथर सोंथायमर हे सुद्धा जर्मनीचेच होते. आयुष्याची कित्येक वर्षे त्यांनी पुण्यात घालवली.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.