एकदा आपल्या पुण्यालाही भारताची राजधानी बनवण्याचा विचार करण्यात आला होता…

भारताच्या इतिहासात राजधान्यांचा मोठा भाग आहे. इतिहासात बघितलं तर अनेक घराणे आले आणि गेले ज्यांनी भारतावर राज्य केलं. मात्र या सगळ्यांच्या काळात राजधानीचं ठिकाण अनेकदा सातत्याने एकच राहिलेलं आढळतं. ते म्हणजे दिल्ली. आजही भारताची राजधानी म्हणून दिल्लीनं तिचं बिरुद जपून ठेवलेलं दिसतं.

दिल्ली काबीज करण्यासाठी तर मोठमोठ्या लढाया झालेल्या आहेत. आणि आजही राजकीय लढाया सुरूच आहेत. मात्र यात एक काळ असा देखील दिसतो जेव्हा दिल्लीला तिचा राजधानीचा ताज सोडावा लागला होता. हा काळ म्हणजे ‘ब्रिटिश राजवट’. ब्रिटिशांनी तेव्हा त्यांची राजधानी कोलकात्याला हलवली होती. त्या निर्णयाला अनेक राजकीय आणि आर्थिक संदर्भ होते.

मात्र या दरम्यान एकदा असंही झालं होतं जेव्हा ब्रिटिशांनी हेच राजधानीचं मुकुट आपल्या पुण्याच्या डोक्यावर सजवण्याची तयारी केली होती…

१८६४ मध्ये भारताचे नवे व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड जॉन लॉरेन्स यांनी पदभार सांभाळला होता. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उन्हाळ्याचे दिवस थंडगार ठिकाणी घालवणं गरजेचं होतं. त्यानुसार त्यांना परवानगी देखील देण्यात आली होती. म्हणून तत्कालीन राजधानी कोलकाता इथे काही महिने घालवल्यानंतर, ते शिमल्याला रवाना झाले.

त्यांच्या पाठोपाठ जवळपास ४८४ कर्मचारी तिथे गेले होते, ज्यात कार्यकारी मंडळाच्या वरिष्ठ सदस्यांचा समावेश होता. तब्बल ४ लाख रुपये खर्च करून कोलकात्यापासून सुमारे १२०० मैल दूर असलेल्या हिमालयीन हिल स्टेशनवर स्थलांतर करण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र नंतर हे दरवर्षीचं प्रकरण बनलं. कारण लॉरेन्स दरवर्षी सहा महिन्यांसाठी सरकारला शिमल्याला हलवू लागले होते. त्यांचं म्हणणं होतं, कोलकात्यात पाच दिवसांत होणारं काम ते शिमल्यात एका दिवसात करायचे.

नंतर तर शिमला ‘उन्हाळी राजधानी’ बनली.

पण याही आधी एकदा असं झालं होतं जेव्हा ब्रिटिशांना तात्काळ त्यांची राजधानी कोलकात्यावरून हलवण्याची गरज समोर येऊन ठाकली होती.

यामागे कारण होतं १८५७ चा उठाव…

भारतातील या उठावाबद्दल कुणाला माहित नाही! भारताच्या इतिहासाने अनेक क्रांतिकारक लढायांमध्ये या उठावाचं नाव नमूद केलाय. या उठावाने अनेक शूरवीर भारताला दिलेच शिवाय भारताच्या एकीचे अनेक किस्से याच उठावात दिसले होते. इतक्या प्रभावीपणे ब्रिटिशांविरुद्ध ही लढत हिंदुस्थानी जनतेने दिली होती, की ब्रिटिशांवर सळो की पळोची परिस्थिती आली होती. मात्र ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे त्यांना कसातरी यात विजय मिळवण्यात यश आलं.

याच उठावाचा अजून एक परिणाम म्हणजे राजधानी बदलण्याचा विचार.

या उठावाचा आघात कमी झाला तेव्हा कोलकात्यापेक्षा अधिक मध्यवर्ती राजधानीची गरज व्यक्त केली गेली होती. कारण कोलकाता हे पंजाब आणि वायव्य सरहद्दीपासून भारतातील सर्वात दूरचं ठिकाण होतं. शिवाय तिथे रशियन घुसखोरी साम्राज्याला धोका ठरत होती. म्हणून…

अधिक मध्यवर्ती स्थान राजधानीसाठी शोधलं तर ब्रिटिश सरकारला देशाच्या कोणत्याही भागात उठावाच्या विरोधात जलद कारवाई करण्यास सक्षम करेल, असं मत तयार झालं होतं.

राजधानी बद्दलण्यावर जरी एकमत झालं असलं तर ती कुठे असावी, यावर अनेक मतमतांतरे होती. प्रत्येकाने त्यासाठी नावं सुचवण्यास सुरुवात केली होती.

चार्ल्स कॅनिंगने राजधानी मध्य भारतात हलवण्याची कल्पना दिली. जॉर्ज ओट्टो ट्रेव्हेलियनने जबलपूरला, चार्ल्स वुडने दार्जिलिंगला, तर इतरांनी भारताच्या राजधानीसाठी अलाहाबाद, आग्रा आणि दिल्ली अशी ठिकाणं सुचवली. अशात महाराष्ट्राच्या मुंबईचं देखील नाव देण्यात आलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर अनेकांचं एकमत होतं.

त्यात उडी घेतली लॉरेन्स यांनी. त्यावेळी शिमला ‘उन्हाळी राजधानी’ झाली नव्हती. तेव्हा लॉरेन्स यांनी सुचवलं होतं, सरकार कोलकात्यापासून पूर्णपणे हलवण्याऐवजी, शिमल्याला उन्हाळी राजधानी केलं तर समस्येचं निराकरण होईल. त्यानुसार त्यांनी १८६४ मध्ये इंडिया ऑफिसच्या चार्ल्स वुड यांना पत्र देखील लिहिलं होतं.

 लॉरेन्स यांनी याच पत्रात त्यांच्या पहिल्या उपायला पर्याय म्हणून पुण्याचं नाव सुचवलं होतं.

त्यांनी पात्रात लिहिलं होतं… “भारताची कायमची राजधानी पुण्याला हलवण्यात यावी. पूना (तेव्हा पूना असं नाव होतं) हे ठिकाण जास्त फायदेशीर आहे. कारण व्यावहारिकदृष्ट्या ते समुद्र किनाऱ्याच्याही जवळ आहे. म्हणजे ते समुद्रापासून फक्त ८० मैल दूर आहे आणि बॉम्बेशी (मुंबई) रेल्वेने जोडलेले देखील आहे”.

मात्र लगेच त्याला जोडून लॉरेन्स यांनी पुण्याला राजधानी बनवण्याचे तोटे देखील सांगितले होते.

“राजधानीसाठी पूना व्यावहारिकरित्या पूर्णतः योग्य ठिकाण असलं तरी मी त्याच्या विरुद्ध आहे. कारण पूना जरी इंग्लंडशी संवाद साधण्यासाठी सुयोग्य असं स्थान असलं तरी भारताच्या बाबतीत बघितलं तर ते अगदी कोपऱ्यात आहे. म्हणून अप्पर इंडियाशी संपर्क तोडला जाईल. ज्याने ब्रिटिश गव्हर्नर-जनरल देखील हिंदुस्थानला अज्ञात राहतील”, असं त्यांनी लिहिलं होतं.

यानंतर परत त्यांनी शिमल्याला ‘उन्हाळी राजधानी’ बनवण्याबद्दल लिहिलं होतं.

“असा गव्हर्नर-जनरल जो अर्धा वर्ष कोलकात्यात आणि अर्धा वर्ष शिमला इथे होता, तो अजून प्रभावीपणे हिंदुस्थानात आणि आपल्या चीफ ठिकानांवरही ओळखला जाईल. कोलकाता ते शिमला अशा प्रवासाने आम्ही दोन ठिकाणांना जोडणारी लष्करी ठाण्यांची साखळी तयार केली आहे. शिवाय संपूर्ण देशालाही एकत्र मुठीत धरलं आहे,” असा युक्तिवाद लॉरेन्स यांनी केला होता.

WhatsApp Image 2022 03 20 at 9.59.52 AM

त्यांच्या या युक्तिवादात शिमल्यावर दिलेल्या भरामुळे नंतर पहिला पर्याय निवडला गेला ज्याने ब्रिटिशांना ‘उन्हाळी राजधानी’ मिळाली. मात्र याच निर्णयाने योग्य असूनही राजधानीचा ताज पुण्याच्या समोरून निघून गेला होता. एकंदरीत पुण्यासोबत काय झालं हे तुम्हाला मुन्ना भैयाच्या फेमस डायलॉगवरून अगदी सटीकपणे कळेल…

“बहुत तकलीफ होती है जब आप योग्य हो और लोग आपकी योग्यता न पहचाने”

असाच सिन झाला होता!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.