म्हणून पोलिसांच्या वतीने लहान मुलांच्या अपहरणाची जाहीर वाच्यता करण्यात येत नाही

रोज समाजात वावरताना कुठे ना कुठे गुन्हा घडल्याच्या घटना आपल्या कानी पडत असतात. या गुन्ह्यातील ‘अपहरण’ हा मुद्दा असतोच. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अपहरण केलं जातं. नुकतंच अशीच अपहरणाची घटना पुण्यात घडली. या घटनेनं राज्यभरात धुमाकूळ घातला. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर या अपहरण प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

११ जानेवारी २०२२ ला पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण या ४ वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं. एका दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने अपहरण केलं होतं, असं सांगण्यात येत होतं. साधारण ९.४० च्या सुमारास अपहरणाची घटना घडली होती. अपहरण झालं तेव्हा त्या लहान मुलासोबत एक साधारण १२-१३ वर्षाचा मुलगा होता. त्याने घरी जाऊन घटना सांगितली आणि मग त्या मुलाच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली, असं तिथेच असलेल्या टपरीवरीवाल्याने सांगितलं.

घटनेनंतर मुलाच्या वडिलांना यासंदर्भात सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. स्वर्णवचे फोटो आणि त्याची माहिती अनेक राजकारण्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली होती, अनेक व्हॉट्सअप ग्रूपवर देखील त्या मुलाची माहिती पाठवली जात होती. काही सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये एक व्यक्ती त्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असल्याचं दिसलं होतं. परंतु ती व्यक्ती पुढे कुठे गेली? याबाबतची माहिती मिळू शकलेली नव्हती.

आठ दिवस उलटूनही खंडणीचा किंवा इतर मागणीसाठी अपहरणकर्त्याचा फोन न आल्याने या घटनेचं गूढ अधिक वाढलं होतं. सुमारे ३०० ते ३५० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या चिमुकल्याचा शोध घेत होते. अखेर आज १९ जानेवारी २०२२ ला हा मुलगा पोलिसांना वाकड जवळील पुनावळे इथे सापडला आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

आठ दिवस खूप गुप्तता पाळून हा तपास चालू होता. तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला की, 

अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या वतीने जाहीर वाच्यता का करण्यात येत नाही? त्याचंच उत्तर जाणून घेऊया…

तीन-चार प्रकारे अपहरण हे होत असतं. एक म्हणजे खंडणीसाठी, दुसरं एखाद्याचा बदला घेण्यासाठी,  तिसरं म्हणजे एखाद्याकडे मूल नसेल तर आणि चौथं म्हणजे मुलांना भीक मागण्यासाठी वापरण्यासाठी. सिग्नल, धार्मिक स्थळं, वेगवेगळ्या राज्यांत स्टेशनवर भीक मागण्यासाठी या मुलांना पाठवलं जातं. अशावेळी जर अपहरणकर्त्याला कळलं की, पोलीस तपास करताय तर कधीकधी तो पॅनिक होऊ शकतो. पोलीस माझ्यापर्यंत पोहोचतील, लोकांना कळेल अशा विचारांनी तो गोंधळून जातो. 

अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये अपहरणकर्ता किडनॅप केलेल्या मुलाचं काही बरं-वाईट करण्याची शक्यता असते. पोलिसांच्या तावडीत सापडण्याआधी त्या मुलाला मारून टाकणे, त्याला कुठेतरी फेकून देणे, काही तरी इजा करणे अशा मार्गांचा अवलंब किडनॅपर करू शकतो. याचमुळे अशा केसेसमध्ये गोपनीयता बाळगणं खूप आवश्यक असतं. जेणेकरून पोलीस त्यांचं काम नीट करू शकतात आणि मुलही  सुरक्षित राहतं.

दरम्यान, पोलीस त्यांचं काम  करत असतात. झोपडपट्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन असेल, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कुणी नवीन पोरं आली आहेत का? याची महिती गोळा करणे, सिग्नल, सार्वजनिक ठिकाणं जसं की बस स्थानक, रेल्वे स्टेशन चेक करणं, कुणी नवीन भीक मागायला आलं आहे का? पकडून आणलं गेलं आहे का? अशी माहिती घेतली जाते. 

अशा अनेक केसेस आधी झाल्या आहे ज्यात अपहरणाची रिपोर्टींग झाल्याने मुल मृत अवस्थेत सापडलं आहे. म्हणूनच असे  संभाविक धोके टाळण्यासाठी अशा घटनांमध्ये गोपनीयता राखणं अत्यंत आवश्यक असतं, असे पोलिसांचं म्हणणं आहे. 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.