गेल्या तीन पिढ्या गणपती बाप्पाला सुबक आणि सुंदर बनविण्याचे काम मुकेरकर परिवार करत आहे.

काही अवधीतच यंदाच्या गणशोत्सवास सुरवात होईल. महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा सण म्हणजे गणेशोस्तव. त्यातल्या त्यात पुणे शहर म्हणजे गणेशोत्सवाचे उगमस्थान. पुण्यातल्या प्रत्येक चौकात, गल्ली बोळात तुम्हाला बाप्पाचे कार्यकर्ते पहायला मिळतात. जे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही ते पुण्यात बघायला मिळते. तर आज अश्याच एका कुटुंबाला भेटूया ज्यांच्या तीनही पिढ्या गणपती बाप्पा रांगवण्याचे काम करत आहेत.

पुण्यातील पेठ भागात तुम्ही फिरत असाल तर तिथल्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की फेमस गणपती रंगविणारे कोण ? तर तो थेट तुम्हाला मुकेरकरांकडे नेऊन सोडेल. 

गणेश पेठेतील ढोर गल्लीमध्ये मुकेरकरांचे घर आहे. तसे मुकेरकर मुळचे तुळजापुरचे. तुळजापुरला श्रीधर मुकेरकर हे शाळेत चित्रकलेचे शिक्षक म्हणून कामास होते. पुढे जाऊन त्यांना पुण्यातील मुलीचे लग्नाचे स्थळ आले व ते लग्न करून पुण्यामधेच स्थायिक झाले. 

१९६७ साली त्यांनी दगडुशेठ गणपती जवळ पेंटिंगचे दुकान काढले. त्याकाळी बॅनर वैगरे असला प्रकार नसल्याने बोर्डावर पेंटच्या सहाय्याने पेंटिंग, अक्षर, चिन्हे हे काढली जायची. दगडूशेठ गणपती जवळ दुकान काढल्याने श्रीधर मुकेरकर यांची तिथल्या ट्रस्टींसोबत ओळख झाली. एकदा असेच बोलता बोलता दगडुशेठ गणपतीचे ट्रस्टी श्रीधर मुकेरकर यांना म्हंटले की, 

“तुम्ही यंदा गणपती बाप्पा रंगवाल का?”

श्रीधर मुकेरकरांनी तो विडा उचलला. ट्रस्टी लोकांना तो रंगवलेला दगडुशेठ गणपती इतका आवडला की, तेव्हा पासुन  मुकेरकर आणि दगडुशेठ जी प्रथा पडली ती आजतागायत सुरु आहे. 

फक्त दगडुशेठ गणपती नाहीच तर पुण्यातील बरेच नामंकित गणपती हे मुकेरकर यांच्याकडे रंगवायला असतात. उदा. गरुड गणपती, निंबाळकर तालीम गणपती, राजाराम मंडळ इ. 

पुर्वी गणपती रंगवताना गणपतीची सोंड ही फक्त एक सरळ लाईन काढून दाखवली जायची. पण पेशानेच चित्रकार असलेल्या श्रीधर मुकेरकर यांनी गणपतीच्या सोंडेवर वेगवेगळे नक्षीकाम करण्यास सुरवात  केली. तसेच गणपतीचे गंध हे वेगवेगळ्या छटेत व रुपात रंगवण्यास सुरवात केली. आणि अल्पावधीतच मुकेरकर आर्ट्स हे पुण्यात प्रसिद्ध झाले. 

आता श्रीधर मुकेरकर यांचे नातू अनुपम मुकेरकर हे हा व्यवसाय पाहतात. तसे त्यांचे संपुर्ण कुटुंबच ह्या व्यवसायात आहे. सर्वांनी आपआपली कामे वाटुन घेतलेली आहेत. अनुपम हे अजोबांसारखेच सोंड रंगविण्याचे व नक्षीकाम करण्याचे काम पाहतात तर अनुपमची आई हे गणपती मुर्तीचे शरीर रंगविण्याचे आणि वडील गणपतीचे धोतर रंगविण्याचे काम पाहतात.

जेव्हा आम्ही अनुपम मुकेरकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितल की,

“डोळ्यांची पेंटिंग हा सर्वात आव्हानात्मक भाग आहे. भुवया,डोळ्याची सावली आणि बुबुळ काळजीपूर्वक रंगवाव्या लागतात त्यामुळेच मुर्तीत जिवंतपणा येतो. जर ते काळजीपूर्वक रंगवले गेले नाही तर मूर्ती व्यर्थ आहे. आणि पुढील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सोंडेची नक्षी.आमच्या मनात कोणतीही नक्षी निश्चित नसती. प्रत्येक मुर्ती रंगवताना जसे हात मार्गदर्शन करतील तशीच नक्षी तयार आम्ही करतो.”

मुकेरकर परिवार असा दावा करतात की, त्यांनी रंगवलेल्या मुर्ती व त्यांच्या शरीराचा रंग ही त्यांची खासियत आहे. तुम्हाला पुण्यात कुठेही ते जो वापरतात तो प्राइमर सापडणार नाही. याच कारणांमुळे दरवर्षी १०० हुन आधिक मंडळ मुकेरकर यांच्याकडून गणपती रंगवुन घेतात. फक्त पुण्यातून नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातून मुकेरकर यांच्याकडे गणपती रंगवायला येतात.

यंदा तर त्यांनी एक गणपती बाप्पा थेट थायलंडला रंगवुन पाठवला आहे.

  • कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.