चिं. वि. जोशींनी पानशेतच्या पुराबद्दल जे लिहून ठेवलय तसं लिहणं कोणालाच जमणार नाही

चिं.वि.जोशी एक जबरदस्त ह्युमर असणारे लेखक. त्यांच घरबशे आणि पळपुटे अस एक पुस्तक आहे. या पुस्तकात पाण्याची पातळी नावाचा लेख आहे. हा लेख पुण्यात आलेल्या पानशेतच्या पुरावर लिहलेला आहे. आजच्याच दिवशी पानशेतचं धरण फुटून पुण्यात हाहाकार माजला होता. त्या निमित्ताने हा लेख..

चिं.वि जोशी लिहतात, 

पानशेतचे मातीचे धरण १२ जूलैला फुटले, व तो प्रचंड जलप्रवाह फुत्कारत फणा आपटत वाटेत जे सापडेल त्याचा घास घेत पुण्याकडे धावत सुटला. या लोंढ्याला पुण्यनगरीच्या दाट वस्तीतून मज्जा बघत जाण्याची संधी मिळाली.

एका बाजूला पुलाची वाडी, भांबुर्डा, तोफखाना आशानगर तर दूसऱ्या बाजूला नारायण, शनवार, कसबा आदी पेठा त्यातील घरे झोपड्या या पाणलोटाने भूईसपाट केल्या.

पाणी समपातळी राखण्याचा प्रयास करते या न्यायाने सर्व लहानथोरांना या लोंढ्याने एकाच पातळीवर आणून सोडले. जीव वाचवण्याकरिता सर्व धर्माचे, जातीचे, व भाषांचे अबालवृद्ध स्त्रीपुरूष संरक्षित अशा उंच जागेचा आश्रय करीत होते. केवळ माणसेच काय पण साप, आणि घुशी देखील माणसांना चिकटून बसलेली दिसत होती. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी सर्व धर्मास आणि जातीस मुक्त प्रवेशाच्या पाट्या जशा हॉटेलवर लावल्या आहेत तशा कोणाच्या घरावर नसूनही पुरग्रस्त भागातील सर्व घरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळत होता.

पूर ओसरल्यानंतरही ही समपातळी कायमच राहिलेली दिसली. श्रीमंत, दरिद्री, घरंदाज झोपडीवाले सर्व एकाच निर्वासिताच्या अवस्थेला पोहचले. 

पाण्याने पाणी दाखवले..!!! 

पुण्याच्या पश्चिमेस सुमारे १० कौसांवर पानशेतचे प्रचंड धरण बांधून तयार होत होते. पुत्रदर्शनाची घाई झालेली बाई ज्या प्रमाणे ‘सिझरिन’ शस्त्रक्रिया करुन घेवून नैसर्गिक वेळेच्या आधी महिनाभर मातृपदाची प्राप्ती करून घेते, त्याप्रमाणे १९६२ तयार व्हायचे धरण वर्षभर अगोदर पुर्ण करण्याची घाई त्यांच्या पुरस्कर्त्यांना झाली होती. सकाळपासून त्यांच्या मातेरी बांधाला पाझर फुटला.

धरण अधिकारी बावरले त्यांनी लष्करी मदत मिळवून सर्व उपलब्ध साधनांनी भिंती बळकट करणाचा प्रयत्न चालिवला. पण पाण्याने आपले पाणी दाखवलेच. भिंत फोडून दिनांक १२ ला सकाळी पाण्याचा प्रचंड लोंढा, पानशेत धरण सोडून मुठा नदीच्या पात्रातून निघाला.

वाटेतल्या खेड्यापाड्यातील घरे व झोपड्या ह्यांना आतल्या माणसासकट गोराढोरासकट कोंबड्याबकऱ्या सकट गिळंकृत करून तो झपाट्याने. खडकवासल्याच्या धरणात शिरला.

धरणांच्या भिंतींना तडा जाईल इतका मोठ्ठा धक्का देवून तो लोंढा खडकवासल्याच्या तटावरून उडी मारून पुन्हा मुठेच्या पात्रातून धावत सुटला. पाच सहा मैलापर्यन्त त्याला तृप्ती वाटण्याइतके भक्ष्य मिळाले नाही परंतु पुणे शहराच्या नैऋत्य कोपऱ्यापासून बांधलेली घरे, कारखाने, जागोजाग उभ्या असलेल्या मालमोटारी असे मौल्यवान भक्ष्य त्याला मिळाले. कोथरूड गाव संपता संपता आयुर्वेद रसशाळा त्याला सापडली.

रसशाळेची इमारत मजबूत असल्याने ती लोंढ्याला पचवता आली नाही. तरी तेथे तयार होत असलेला पिंपभर चवनप्राश भक्षण करून त्याला ययाती सारखे यौवन प्राप्त झाले. दूसरी नाना प्रकारची आयुर्वेदिक औषधे चाखून त्याला चांगलाच माज चढला आणि दुप्पट सामर्थ्याने एम ए  सोसायटीच्या कॉलेजवर त्याने हल्ला चढिवला. आणि निम्म्या पुण्यावर ‘आरिष्ट’ आणून सर्वांनाच आसवं गाळावयास लावली.

एम ए सो च्या प्राध्यापकांना लोंढ्यांची पुस्तकप्रियता आणि शास्त्रीय ज्ञानलालसा माहित असल्याने त्यांनी तळमजल्यावरून ग्रंथालयातले ग्रॅंथ आणि प्रयोगशाळेतील उपकरणे माडीवर हलवली होती. यामुळेच पोट न भरलेल्या लोंढ्याने आपले हातपाय पसरून मुठेच्या तिरावरील दफनभूमी आणि दहनभूमी यांना पोटात घेतले. रसशाळेजवळच्या ठेंगण्या पुलावर लोंढ्याला ठेच लागली.

म्हणून गर्जना करीत तो पुढे निघाला नाही. तोच लकडी पुलाने त्याला अडथळा केला. असल्या अडथळ्याला तो थोडीच भिक घालणार, कमानीतून त्याने आपले पाय पलीकडे खुपसले. आणि पुलावर उभ्या असलेल्या शेकडो बघ्या लोकांची दाणादाण उडवून तो पलीकडे पुण्याच्या भरवस्तीत शिरला. 

नवे नामधारी लकडीपुलं…!!!

लकडीपूल नावाचाच ‘लकडी’ राहिला आहे. आत्ता तो दगड, चुना, सिमेंट, वाळू आणि लोखंडाचा झाला आहे. त्याच्या बांधकामात काडी इतकी ‘लकडी’ वापरलेली नाही. लोंढ्याच्या प्रचंड देहाखाली तो इतका चेपला गेला की त्याच्यावर एखादी प्रचंड मालमोटार उभी असती तर तिचा टप दिसला नसता.

या नामधारी लकडी पुलाच्या अदृश्य होण्यामुळे वेगळ्या डिझाईनचे लकडी पुल पुरात सापडलेल्या स्त्री पुरूषांना नेण्यासाठी सुरक्षित ठिकाणी उभारले गेले.

डळमळीत घर आणि जवळचे मजबूत घर यांच्यामध्ये एकमार्गी दळणवळण ठेवण्यासाठी एका घराच्या सज्जापासून दुसऱ्या घराच्या सज्जापर्यन्त दोर बांधून व दोराला शिड्या वासे वाहत आलेले लाकूड सामान बांधून हे झुलते पुल केले होते.

अनाथ हिंदू महिलाश्रमापासून डॉ. खाडिलकरांच्या दवाखान्यापर्यन्त असाच एक झुलता लकडी पुल तयार होवून धोक्यात पडलेल्या महिलांना सुरक्षित स्थळी पोहचवले गेले. हे आत्ता सर्वश्रूत आहेच.

लोंढा थोडासा पुढे गेल्यावर त्याला सिताफळ बाग हि नवी डौलदार वसाहत गिंळकृत करायवयास मिळाली. ज्या घरांना माड्या नव्हत्या त्यांची दगडी छपरे लोंढ्याने खोडून काढली. आणि शनिवार पेठेतील कित्येक ऐतिहासिक वाडे जमिनदोस्त केले.

औंकारेश्वराचे दर्शन घेण्याचे लोंढ्याच्या मनात होते. 

वातविकार झाल्यामुळे ज्याला जागेचे हलवत नव्हते असा एक धनिक गृहस्थ आपल्या ट्रंकाची रास करून हातात किल्ल्या घेवून पाणी उतरण्याची वाट बघत बसला होता. पाण्याकडे बघवत नसल्याने त्याने डोळे घट्ट मिटून धरले होते. लोंढ्याला वाटले हेच भगवान औंकारेश्वर त्याने ट्रंकासह त्यांना मिठी मारली आणि हे तथागत औंकारेश्वर आपल्या ट्रंकासह अंतर्धान पावले. 

लोंढ्याच्या चुकीच्या समजूतीमुळे खऱ्या औंकारेश्वराचा बचाव झाला. परंतु त्याच्या नंदी महाराजांना मात्र थप्पड बसली. कित्येक खंडी वजनाचा नंदी जागेवरून सरकून वीस हात अंतरावर कोलमडून पडला.

अष्टभूजेंची नानाविध रुपे.. 

समोरील बाजूला कॉंग्रेस भवन आहे, तथापी आपल्या जन्मदात्यांच्या भवनाला आपण का धक्का लावावा असा विचार करून तेथील रस्त्यावर मात्र खोल खड्डा खणून लोंढा आणखी पुढे गेला. आत्ता त्याच्या डाव्या हाताला पुणे पाच व उजव्या हाताला शनिवार पेठ होती.

अष्टभूजा देवींचे दर्शन घ्यावे असे मनात आल्याने लोंढा तिच्या देवळाकडे धावला. जिचे घर पडले अशी एक लेकरूवाळी महिला डोक्यावर हंडा आणि हातात लहान मुल लाटणे कपड्यांची बादली पिशवी खराटा आणि कंदिल असे विविध पदार्थ पतिव्रत्येच्या सामर्थ्याने घेवून चालली होती.

लोंढ्याने तिच्या पायाशी नम्रपणे लोळण घेतली. पण तिला त्याची भिती वाटून सगळ्या लटांम्बरासह तिने पळ काढिला. खरी अष्टभूजा देवी लोंढ्याला सापडलीच नाही. या अष्टभूजा देवींची अनेक रुपे मात्र घरोघरी दिसू लागली. वीज पळाली, म्हणून गिरण्या बंद झाल्या व ते जाते ओढण्याची वेळ आली.

नळराज अप्रसन्न म्हणून ‘दमयंती’ला विहरीचे पाणी खेचावे लागले. 

घरात भरलेला चिखल ढकलण्यास खराटा सतत हाती वागवावा लागला. दोन हात कामाच्या रगाड्यापुढे कमी पडू लागल्याने घरोघरच्या गृहिणींना खरोखरीच अष्टभूजेची रुपे धारण करावी लागली. पुणे पाच या भागात हरिजन व बौंद्धजन यांची मोठी वस्ती पसरलेली होती. तिच्यातल्या झोपड्या रॉकेलच्या डब्ब्यांच्या पत्र्याच्या केलेल्या होत्या. ‘न हि संहरते ज्योत्स्नां चन्द्रश्चाण्डाल वेश्मनि’ या सुभाषितांत चंद्राचे जे वर्णन आहे ते या लोंढ्यालाही लागू पडते. त्याने उजव्या तिरावरील ब्रह्मवृदांवर जशी माया दाखवली तशी ह्या चुतूर्वणियांवर देखील कमी केले नाही.

 तेथून जवळच असलेल्या पत्र्याच्या वखारीतील धान्याचं धान्य लोंढ्याने फस्त करून टाकले उरलेल्य धान्याची हातभट्टी तयार होत होती. 

कसबा पेठेत अमृतेश्वराचे देवालय आहे त्याच्या मालकापैकी एक सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे गेली चाळीस वर्ष विस्तृत प्रमााणावर संशोधन करित आहेत. प्रथम ज्ञानकोशाच्या रचनेत ते सहकारी होते म्हणून त्यांच्या संशोधनांचा पाया ज्ञानकोशाने रचिला असे म्हणण्यास हरकत नाही.ज्ञानकोशे रचिला पाया आत्ता त्या कार्याचा कळस व्हायचा होता. 

म्हणून लोंढ्याने शास्त्रीबुवाचे निवासस्थान जे अमृतेश्वराचे आवार हल्ला चढिवला. प्रथम पाणी त्यांच्या जोत्यावर आले, तेव्हा ते छपरावर चढले तेथे पाणी पोहचले तेव्हा आपल्या सहकाऱ्यांसह ते मंदिराच्या छपरावर गेले. तेथून कळसाच्या खालच्या भागावर आणि क्रमाने अगदी कळसाच्या कलशापर्यन्त चढत गेले. 

सुदैवाने त्यावरून मात्र पाणी गेले नाही. अशा तऱ्हेने संशोधन कार्याचा शास्त्रीबुवांनी कळस गाठला. जवळच शिवकालापासूनचे शेख सल्लाचे दर्गे खोलातच आहे. जातीधर्मातील मुक्तप्रवेशाच्या आदेशानुसार हिंदू देवळाप्रमाणे या इस्लामी देवस्थानालाही लोंढ्याने कडकडून भेट दिली. तेथील नव्या पुलाला त्याने धक्का मारला नाही. पण जवळच्या असलेल्या शनिवार वाड्याच्या भिंतीला धडक मारण्यास कमी केले नाही. 

विंध्वसावर भावी यशोमंदीर 

यानंतर सोमवार पेठ लागली. मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराची जागा एखाद्या तलावासारखी करून टाकली. आत्ता वर्षभर याच जुन्या बाजारात लोंढे महाराजांनी लांबवलेल्या जिचा विकायास येतील. आणि पुरग्रस्तांना आपल्या स्वत:च्या मालकीच्या वस्तू विकत घ्याव्या लागतील. नुकत्याच एका संगीतप्रिय भगिनीला आपला वाहून दिलेला दिलरुबा परत मिळाला आणि तिला अपूर्व आनंद झाला.

आपल्या हरवलेल्या दिलरुब्याची किंमत साडेतीनशे रुपये होती असे तिने सांगितले म्हणतात. शेख सल्ल्याचा दर्ग्याच्या मुजावरांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असे त्याचे म्हणणे आहे. पुरात नष्ट झालेल्या चिजांची किंमत आपोआपच वाढत आहे हे दुःखात सुखच म्हणावयाचे

रविवार आणि सोमवार पेठांतून नेहमी एक लहानसा ओढा वाहत असतो. ड्रेनेजचे पाणी त्यात सोडून दिलेले असल्याने त्याला अतोनात घाण सुटलेली असते; यांच्याजवळ जाताच नाक दाबून धरवे लागते म्हणून त्याला लोक नाकझरी असें म्हणतात ! वास्तविक ते नागझरी म्हणजे नागमोडी गती असलेला प्रवाह असे आहे. नेहमी उडी मारून ओलांडता येणाऱ्या ह्या नागोबाने आज कर्कोटकचे रूप धारण केले होते.

ह्या झरींतून दुथडी भरून जाणारा प्रवाह इतका जबरदस्त होता की त्याच्या काठांवर राहणारे नागरिक नाग मागे लागल्यासारखे धावत सुटले होते

लोंढा मुळा आणू मुठा ह्या नद्यांच्या संगमाजवळ आला. आणि त्याने ‘वेल्स्ली ब्रिज’ असे अधिकृत नाव असलेल्या संगमाच्या पुलाल अशी जोराची धडक मारली की त्याची पूर्वेकडील पहिली कमान पार ढासळून पडली. आता मुठा नदीच्या पत्रांतून लोंढा मुळा-मुठा ह्या जुळ्या नदीच्या पात्रांत शिरला होता. पुणे १ आणि पुणे ६ ह्यांच्यामधून तो वाट काढीत होता.

येरवडा हद्दीतल्या घरात तो शिरला पण माडीपर्यंत जाऊ शकला नाही. बन्ड गार्डनच्या बांधावरून उडी मारून हडपसर, मांजरी, लोणी या गावांतील नदीकांठच्या लोकांना प्रेमालिंगन देऊन तो अष्टविनायकांपैकी रांजणगांवच्या गणपतीच्या दर्शनाला गेला. तेथे भीमानदीच्या विस्तृत पात्रात त्याने आपल्या देहांचे विसर्जन केले. अवघ्या आठ दहा तासांचे त्याचे आयुष्य ठरले पण इतिहासात त्याने आपले स्थान कायमचे पटकावले आहे.

दोनशे वर्षांपूर्वी पानिपतने पुण्याला जसे हालवून सोडले होते तसे पानशेतने आता केले आहे. पानिपतच्या नंतर मराठ्यांनी पुनः डोके वर उचलून दिल्लीपर्यंत स्वराज नेले त्याप्रमाणे पानशेतनंतर मराठी कर्तबगारी पुनः झळको आणि झालेल्या विध्वंसावर भावी यशोमंदिर उभारले जावो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.