इंटरनेटच्या जमान्यात देखील पुणे पोलिसांनी मोर्स कोडची यंत्रणा जिवंत ठेवली आहे…

प्रत्येक रविवारी पुणे शहर पोलिसांच्या वायरलेस विभागातील एक ऑपरेटर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला एक मोर्स कोड संदेश पाठवत असतो. आता तुम्ही म्हणालं यात विशेष ते काय? वाटायला तशी हि गोष्ट किरकोळ वाटू शकते, पण या किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीमागेच पोलिसांना वाटतं असलेला मोठा आदर दडलेला आहे.

आजच्या सॅटेलाईट आणि इंटरनेटच्या काळात जग प्रत्येक मिनिटाला बदलत आहे. सातत्यानं नव-नवीन कल्पना उदयास येत आहेत. नवीन शोध लागत आहेत. संपर्क साधण्याच्या सुविधांमध्ये देखील असाच सातत्यानं बदल होतं आहे. एसएमएस, मेल, व्हाट्सअप असा टप्प्या-टप्प्यान बदल झाला. त्यामुळेच संपर्क साधण्याची ‘मोर्स कोड’ हि संकल्पना अत्यंत जुनाट समजली जात आहे.

पण हीच जुनाट समजली जाणारी मोर्स कोडची सिस्टीम पुण्याच्या पोलिसांनी मात्र आजही जिवंत ठेवली आहे.

आता हे मोर्स कोड काय असतं? तर विशिष्ट पद्धतीच्या ठिपके आणि डॅशच्या साह्याने संदेश पाठवणे. याचा शोध लावला १८३० च्या दरम्यान सॅम्यूल एफ.बी.मोर्स यांनी. टेलिकम्युनिकेशनच्या सुरुवातीच्या पद्धतींपैकी एक असलेल्या मोर्स कोड या यंत्रणेसाठीचा आदर म्हणून आणि संवादाच्या इतर यंत्रणा फेल गेल्या तर एक प्रमुख स्टँड-बाय मोड म्हणून या यंत्रणेचा आठवड्यातून एकदा वापर केला जातो.

पुणे शहर पोलिसांनी अलीकडेच पोलिसांद्वारे वापरल्या जाणाऱ्या दळणवळणाच्या यंत्रणा आणि त्यांची आजपर्यंतची उत्क्रांती याबद्दल ट्विट करून माहिती दिली होती. सोबतच पुण्याचे पोलिस आयुक्त कार्यालय अजूनही प्रत्येक रविवारी संदेश पाठवण्यासाठी मोर्स कोडचा वापर करते असं सांगितले होते.

इतर सर्व पोलीस युनिट्सच्या कामकाजाप्रमाणेच पुणे पोलिसांचा वायरलेस आणि कम्युनिकेशन्स विंग संदेशाची तीन माध्यम वापरतो.

यातील पहिलं आणि मुख्यत्वे म्हणजे PolNet. सर्व भारतातील पोलीस यंत्रणा याच सॅटेलाईट आधारित कम्युनिकेशन सिस्टीमचा वापर करत असते. सगळी अधिकृत, महत्वाची आणि संवेदनशील माहिती पोलीस दलात देण्यासाठी हीच यंत्रणा वापरली जाते. केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत पोलीस वायरलेस संचालनालय (DCPW) कडून PolNet चालवले जात असते.

दुसरे म्हणजे कोणत्याही दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संबंधित नसलेले आणि केवळ पोलीसांसाठीच कार्यरत असलेले व्हॉइस कॉल नेटवर्क. आणि तिसरे म्हणजे पोलीसांकडून अंतर्गत संदेश आदान-प्रदान करण्यासाठी वापरले जाणारे पोलीस वायरलेस नेटवर्क.

पोलिस नियंत्रण कक्षातील (१०० क्रमांक) दळणवळण यंत्रणा सांभाळणे हे काम देखील विंगच्या जबाबदाऱ्यांपैकी एक आहे.

आणि या तीन यंत्रणांव्यतिरिक्त मोर्स कोड ट्रान्समिशन मॉड्यूल नेहमी स्टँड-बाय ठेवला जातो. दर रविवारी DGP कार्यालयाला एक चाचणी करण्यासाठीचा संदेश पाठवतो. अधिकारी सांगितात की, रविवारी मोर्स कोड संदेश पाठवण्याच्या कामाला युनिटच्या स्वतःच्या भाषेत ‘संडे वर्किंग’ असे म्हंटले जाते.

विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक ऑपरेटरचा सराव व्हावा म्हणून प्रत्येक वेळी वेगळ्या ऑपरेटरला मोर्स कोडचा संदेश पाठवण्याचे काम सांगितले जाते. सोबतच पोलिसांच्या मते मोठ्या आपत्ती किंवा दळणवळण बिघाड झाल्यास एक विश्वासू संदेश वहन यंत्रणा म्हणून मोर्स कोड वर डोळे झाकून अवलंबून राहू शकतो.

पुणे शहराच्या वायरलेस आणि कम्युनिकेशन विभागाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) दर्जाचे अधिकारी करतात आणि त्यात एक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, २८ सहाय्यक उपनिरीक्षक आणि ५० कॉन्स्टेबल कार्यरत आहेत. योगायोगाने, महाराष्ट्र पोलिसांच्या वायरलेस विभागाचे मुख्यालयही पुण्यात आहे . जे राज्यातील वायरलेस यंत्रणेचं सर्व काम, प्रशिक्षण आणि सुधारणा अशा गोष्टी बघत असतात.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.