प्रत्येकाच्या हाताला रोजगार देण्याची मुंबईची ओळख आता पुण्याकडे सरकलीय…

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी… देशाची आर्थिक राजधानी.

त्यामुळे अगदी स्वातंत्र्यापूर्वी पासून या शहराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला काही न् काही काम, रोजगार मिळतोच अशी या शहराची ओळख. त्यामुळे आजही सगळ्या भारतातून, त्याहीपेक्षा संपूर्ण जगभरातून मुंबईत लोक सेटल व्हायला येतात.

पण आता मुंबईची हि ओळख पुण्याकडे सरकायला लागलीय असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. कारण नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात देशात बंगळूरनंतर आता पुण्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने (Monster Employment Index) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हि गोष्ट स्पष्ट झाली आहे.

२०२० च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत रोजगाराच्या इंडेक्समध्ये यंदा ४० टक्क्याने वाढ झाली आहे.

तर स्वप्ननगरी अशी ओळख असलेल्या मुंबईचा नंबर मात्र अगदी चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत हि वाढ केवळ १६ टक्के आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या हातात असलेल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या, तर कित्येकांना इच्छा नसताना काम सोडून गावाकडे परताव लागल होते. परिणामी देशभरातून बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न निर्माण समोर आला होता.

आकडेवारीत सांगायचं म्हंटलं तर CMIE च्या अहवालानुसार कोरोना संकटापूर्वी म्हणजे २०१९ – २० या आर्थिक वर्षात भारतात ३.५ कोटी लोक बेरोजगार होते. पण कोरोना काळात या संकटाने गंभीर स्वरूप धारण केलं. कोरोनापासून फेब्रुवारी २०२१ या १ वर्षात ज्यांच्याकडे काम होतं त्यांनी देखील ते गमावलं.

ज्यांच्या जवळ नोकरी आहे अशांच्या संख्येत २०१६ पासून सातत्याने घट होत आहे. २०१६-१७ मध्ये नोकरी असलेल्यांच आकडा ४०.७३ कोटी होता. पण २०१७-१८ मध्ये त्यात घट होतं तो ४०.५९ कोटींवर आला. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात हा आकडा ४०.०९ कोटीवर आला. २०२०-२१ या वर्षात या आकड्यात आणखी ४.५ कोटींची घट नोंदवली गेली होती.

मात्र आता याच बेरोजगारीच्या आकडेवारीला कमी करण्यासाठी संपूर्ण देशाला पुणे शहर हातभाग लावू शकते.

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय स्तरावर ४४ अंकांनी रोजगाराचा इंडेक्स वाढल्याचे मॉन्स्टर संस्थेने म्हटले आहे.

ही वाढ मुख्यतः माहिती तंत्रज्ञान, सॉफ्वेअर, हार्डवेअर, वाहतूक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. एकूणच पुण्यातील आयटी क्षेत्राचा उत्पादन, सेवा आणि निर्यात क्षेत्राला चांगला फायदा झाला आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते आगामी काळात कोरोना रुग्णसंख्या मर्यादित राहिली तर पुढच्या ६ महिन्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येईल.

त्या तुलनेने शिक्षण, अभियांत्रिकी, बांधकाम अशा क्षेत्रात मात्र नव्या रोजगाराच्या नसल्यात जमा आहे.

काय आहेत मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सचे महत्वाचे निष्कर्ष?

या अहवालाच्या निष्कर्षानुसार,

मागच्या सहा महिन्यात रोजगाराच्या इंडेक्समध्ये सरासरी ५ टक्के वाढ झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट २०२१ मधील नव्या रोजगार संधींची वाढ स्थिर होती. सर्वच शहरांत आयटी, सॉफ्टवेअरशी निगडित रोजगार वाढले. तसेच वरच्या पदांवरील किंवा मॅनेजमेंटमधील नोकऱ्यांमध्ये सर्वात जास्त भरती झाली. जानेवारी २०२१ पासून रोजगाराचा इंडेक्स वाढत आहे.

ऑगस्ट २०२० च्या तुलनेत कोणत्या शहरांमध्ये किती टक्के नव्या रोजगाराच्या संधी वाढल्या?

बंगळूर शहरात मागच्या वर्षभरात नवीन रोजगार देण्याच्या बाबतीत तब्बल ५९ वाढ झाली आहे. त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागत आहे. पुण्यात हि वाढ ४० टक्क्यांनी झाली आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये ३७ टक्के, मुंबई १६ टक्के, दिल्ली व एनसीआर १४ टक्के अशी वाढ झाली आहे.

तर कोलकत्ता आणि जयपूरमध्ये मात्र हि टक्केवारी मायनसमध्ये आहे. कोलकात्यात उणे १६ टक्के आहे. तर जयपूरमध्ये उणे २० टक्के.

कोणत्या क्षेत्रामध्ये नव्या रोजगाराच्या संधी वाढल्या?

ऑगस्ट २०२० च्या तुलनेत आयटी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर माल वाहतूक, जलवाहतूक यामध्ये ३७ टक्के, टेलिकॉममध्ये ३६ टक्के वाढीची नोंद झाली आहे. त्यानंतर कापड, दागिने, लेदर अशा क्षेत्रात ३० टक्के, बँकिंग, विमा ३३ टक्के वाढ झाली आहे.

तर दुसऱ्या बाजूला पर्यटन आणि प्रवास या क्षेत्रात मात्र हा आकडा उणे २७ टक्के नोंदवला गेला आहे. सोबतच शिक्षणामध्ये देखील हा आकडा उणे १८ आहे. याच कारण देखील सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. कारण कोरोना काळात सर्वाधिक फटका पर्यटन आणि शिक्षण या दोन क्षेत्रांना बसला. या काळात पर्यटन पूर्णपणे बंद होते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.