मागच्या १४ वर्षांपासून चर्चेत असणारा पुण्याचा रिंग रोड नेमका कसा आहे?

पुणे शहाराच्या आणि भागाचा वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या जवळपास १४ वर्षापासून पुण्यात रिंग रोडची चर्चा आहे. साधारण २००७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर २०११ मध्ये सरकारनं एमएसआरडीसीच्या रिंगरोडला मान्यता दिली.

पण त्या दरम्यानच्या काळात पीएमआरडीएकडून पण एक रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. योगायोगानं एमएसआरडीसी आणि पीएमआरडीए या दोघांचे रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत होते, त्यामुळे नक्की कोणता रिंगरोड होणार, याबाबत बरचं कन्फ्युजन होतं. शेवटी सरकारनं एमएसआरडीसीच्या रिंग रोडला मान्यता दिली.

मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी या रिंग रोडला अधिक गती दिली. त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा पण केली. आणि यंदा तर त्यासाठी भूसंपादनाची पण घोषणा करणार असल्याची देखील घोषणा केली आहे. 

आज या रिंग रोड बाबत अर्थमंत्री अजित पवार म्हणाले,

जवळपास २६  हजार कोटी रुपयांच बजेट असलेल्या या १७० किलोमीटर लांबीच्या आणि ८ पदरी रिंग रॊडच्या भूसंपादनास या वर्षीच सुरुवात होणार आहे. 

नेमका कसा आणि कुठून जाणार आहे हा रिंग रोड ?

एमएसआरडीसीकडून दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यात पहिला टप्पा पूर्व भागातील रिंगरोड व दुसरा टप्पा पश्चिम भागातील रिंगरोड असं नियोजित करण्यात आलं आहे.

पूर्व भागातील रिंग रोड

पूर्व भागातील रिंगरोडच्या मार्गाचं प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील भावडी, लोणीकंद, डोंगरगाव, बकोरी, वाडे बोल्हाई, शिरसवाडी, मुरकुटेनगर, गावडेवाडी बिवरी, कोरेगाव मूळ, नायगाव, सोरतापवाडी, तरडे व आळंदी म्हातोबाची अशा १४ गावांतून रिंगरोड जाईल.

तर पुरंदर तालुक्यातील सोनोरी, दिवे, पवारवाडी, हिवरे, चांभळी, गराडे व सोमुर्डी ही ७ गावे, भोर तालुक्यातील कांबरे, नायगाव, केळवडे, साळवडे, वरवे बुद्रुक या ५ गावांचा समावेश आहे.

अशा प्रकारे ४ तालुक्यांतील ३० गावांमधून पूर्व भागातील रिंगरोड जाणार आहे.

पश्चिम भागातील रिंगरोड

दुसऱ्या टप्प्यातील आणि पश्चिम भागातील रिंग रोड हा भोर तालुक्यातील केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे या ५ गावांतून, हवेली तालुक्यातील रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खामगाव मावळ, मालखेड, वरदाडे, मांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली या ९ गावांतून जाणार आहे.

तर मुळशी तालुक्यातील कातवडी, मुठा, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, पडळघरवाडी, जवळ, केमसेवाडी आणि पिंपळोली अशी १४ गावे आणि मावळ तालुक्यातील पाचाणे, चांदखेड, बेबडओहोळ, धामणे, परंदवाडी, जवळ आणि उर्से अशा ६ गावांचा समावेश आहे.

अशा प्रकारे ४ तालुक्यांतील ३४ गावांमधून पश्चिम रिंगरोड जाणार आहे.

राज्य शासनानं अलीकडेच एमएसआरडीसीच्या पश्चिम भागातील रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्ग १’ असा दर्जा दिला आहे. याबाबतची अधिसूचनादेखील शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राज्यात समृद्धी महामार्गानंतर ‘विशेष महामार्गा’चा दर्जा मिळणारा एमएसआरडीसीचा रिंगरोड हा दुसरा महामार्ग ठरला आहे. लवकरच त्याचं भूसंपादनाच काम करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.