पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ४११ एकर जागेचं भाडं वर्षाला फक्त १ रुपया आहे.

ऐकून डोक्यात झिणझिण्या आल्या ना? इथ फुटाफुटाला मारामारीचा मुळशी पॅटर्न सुरुय. बिल्डर लोक कुठे मोकळी जागा मिळते का याच्या वासावर आहेत. मुंबईच्या पाठोपाठ पुण्यात सुद्धा सर्वसामान्यांना घर घेण मुश्कील झालंय.

याच पुण्याच्या मध्यवर्ती अशी जागा आहे जिथ ४०० एकरांच भाडं वर्षाला फक्त १ रुपया आहे. तीच नावं,

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” 

५ नोव्हेंबर १८१७

ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यात झालेली तिसरी व अंतिम लढाई याच जागी लढण्यात आली होती.   हे युद्ध Battle ऑफ खडकी किंवा Battle ऑफ गणेशखिंड म्हणून पण ओळखले जाते. यात दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठ्यांचा इंग्रजानी निर्णायक पराभव केला.

ही लढाई फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलणारी ठरली. याच लढाई नंतर अधिकृतरीत्या इंग्रजांचं भारतावर अधिकृत राज्य सुरु झालं. हे सगळ जिथ घडल त्याच जागेवर पुणे विद्यापीठ वसलेलं आहे.

युद्ध इंग्रजांनी जिंकल्याने ही जागा इंग्रजांच्या ताब्यात गेली. गावापासून काही अंतरावर असणाऱ्या या जागेवर पुढे मिलिटरी छावणीची स्थापना झाली. त्या छावणीवर व आजूबाजूच्या परिसरावर पूर्णपणे ब्रिटीशांचा अधिकार होता.

तिथेच पुढे बॉम्बे गव्हर्नरच्या निवासाची इमारत बांधण्यात आली. हीच राजभवनाची इमारत म्हणजे सध्याची पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत. 

ही राजभवनाची इमारत १८६४ ला बर्टल फ्रेअर गव्हर्नर असताना बांधून झाली होती. आयलंड ऑफ इंग्लंडवर असलेल्या प्रिन्स अल्बर्ट ऑस्बोर्नच्या घरापासून प्रभावित होऊन ह्या मुख्य इमारतीची रचना करण्यात आली होती. या इमारतीला इटालियन आध्यात्माची जोड होती. इमारत बांधकामासाठी प्रचंड खर्च आला होता.

पण ब्रिटीश पार्लमेंटने याला बॉम्बे गव्हार्नांसचा ढिसाळ कामगार आणि उधळपट्टी म्हणून टीका केली होती. कारण जेव्हा गव्हर्नर बर्टल फ्रेअरने १८६७ ला भारत सोडला तेव्हा ती अजिबात राहण्यायोग्य नव्हती. सध्याच्या घडीला इमारतीला जतन करण्यासाठी , पूर्वीच वैभव टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विद्यापीठ स्थापनेसाठी प्रयत्न करणारे कोण होते? ही जागा विद्यापीठाला कशी मिळाली?

१९४७ मधे भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर १० फेब्रुवारी १९४९ रोजी बॉम्बे विधिमंडळाने पारित केलेल्या पुणे युनिवर्सिटी अॅक्ट खाली विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापिठाच कामकाज निजाम गेस्ट हाउस मधे सुरु झाल. हा लॉ कॉलेजच्या रोडला असलेल्या भांडारकर इन्स्टिट्यूट चा एक भाग होता.

पण तेव्हाचे बॉम्बे सरकारचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री असलेले बी.जी. खेर यांनी प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठाला गव्हर्नर बंगल्याचा परिसर मिळू शकला. ही ४११ एकर जमीन पुणे विद्यापीठाला ९९९ वर्षाच्या भाडेतत्वावर दिली आहे.

विद्यापीठ स्थापन झाल्याच्या त्याच वर्षी डॉ. एम.आर. जयकर यांची पहिले कुलगुरू म्हणून निवड झाली. जयकर यांनी वकिलीच शिक्षण घेतल होत. त्यांच्याच नावाने आज विद्यापीठात शहरातील सगळ्यात मोठी लायब्ररी आहे.

एकेकाळी जिथे मराठा साम्राज्याचा सर्वात मोठा पराभव झाला तिथे हजारो विद्यार्थी स्वतःच भविष्य घडवण्यासाठी शिक्षण घेत आहेत.

९ ऑगस्ट २०१४ ला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या स्मरणार्थ विद्यापीठाचे नाव  बदलून “सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ ” असं करण्यात आल. मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या सावित्रीबाईना त्यांच्याच शहरात उशिरा का होईना पण उचित सन्मान मिळाला.

हे ही वाच भिडू.