पुण्याचा जुना बाजार जिथं तुम्हाला भंगारात सोनं सुद्धा मिळू शकतं…

पुण्यात नवा राहायला आलो होतो तेव्हाचा हा प्रसंग. त्या दिवशी रविवार होता. निवांतपणा म्हणून म्हंटल जरा फिरून येऊ. गाडी काढली आणि शनिवारवाड्यावरून रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो.
कुंभारवाडा लागला तशी हे गर्दी दिसली. गाडी तिथंच एका कोपऱ्यात लावली. बाजार भरला होता. म्हणलं कसला बाजार आहे बघू, तितक्यात तिथं एका दुकानदाराची आणि दोन पोरांची डंबेल्सवरून घासाघीस सुरू होती. आणि मला अंदाज आला…

आपण पुण्याच्या जुन्या बाजारात पोहोचलोय

जुन्या बाजाराने अडवलेल्या रस्त्यावरून कडेकडेने जाताना जेवढा दिसेल तेवढा बाजार पाहून घ्यायचा असतो असं जुनीजाणती लोक सांगतात. पण गाडी बाजूला लावून या बाजारात फेरफटका मारावा, असं कितीजणांना वाटतं ? मी मनाशी म्हंटल आलोय, तर एकदा बघूनच घ्यावं. तसं मी माझं पाकीट वरच्या खिशात टाकलं आणि या जुन्या बाजाराच्या सैरीवर निघालो.

बाजाराच्या कोपऱ्यावर एक चचा बसले होते. जाऊन जरा आधी माहिती घेऊ म्हंटल. चचा दिलखुलास माणूस होता तो सांगायला लागला,

आमच्या जुन्या बाजाराला पुण्यात एक स्वतंत्र अस्तित्व आहे. नव्हे, ती ओळख मिरवणारी अनेक ठिकाणं जुन्या बाजाराशेजारी आहेत. या बाजारावर आमच्या सारख्यांच जगणं अवलंबून आहे. तसंच अनेकांच्या जगण्याच्या गरजाही हा बाजार भागवतोय.

बाजाराचा इतिहास सांगताना चचा म्हणाले,

गेल्या अनेक वर्षांपासून हा सांस्कृतिक ठेवा म्हणून शहर आपल्या अंगावर मिरवत आलंय. काळाच्या ओघात तो बदलत गेलाय. जागाही अनेकदा बदलली. मात्र बाजार आजही भरतोय. जे बाहेर मार्केटमध्ये मिळत नाही ते या बाजारात हमखास मिळणार. जुन्या बाजाराचा इतिहास असा लिहून ठेवला नाही पण तोंडी सांगायच तर, पेशवाईच्या पूर्वीचा इतिहास या बाजाराला आहे. पेशवाईच्या काळात तो शनिवारवाड्याच्या पटांगणावर भरायचा. त्यानंतर तो नव्या पुलाखाली भरायला लागला. म्हणजेच सध्याच्या पालिका भवनाच्या जागेवर भरायचा. त्या वेळी गुरांचा बाजारही या बाजारासोबत भरायचा.

पुढे या जागेवर पालिकेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झाल्यावर बाजार पुन्हा हलला आणि शिवाजीनगर गावठाणातील शिवाजी आखाड्याजवळ भरवला जाऊ लागला. त्यानंतर त्याला मंडईजवळ जागा देण्यात आली. ती जागा कमी पडू लागल्याने बाजार मंगळवार पेठेतील सध्याच्या जागेवर भरायला सुरुवात झाली.

साधारणपणे १९६० पासून बाजार याच ठिकाणी भरतो. कुंभारवाड्यापासून शाहीर अमर शेख चौकापर्यंत हा बाजार पसरलाय. पूर्वी हा बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरायचा; पण ट्रॅफिक होतंय म्हणून साधारण चार-पाच वर्षांपासून तो रस्त्याच्या एका बाजूला भरतो.

हे बोलता बोलता चचा म्हणले, मियाँ नुसतंच ऐकत बसलात तर रात उजडेल, बाजार फिरून आल्याशिवाय त्याची मजा समजायची नाही तुम्हाला.

मी मनात हसलो, चचाकडे होकारार्थी मान हलवली आणि पुढं चालायला लागलो. चालता चालता एका दुकानाजवळ लक्ष गेलं ते दुकानातला बरंच सामान नवं होतं. जुना बाजारात नवा माल कसा काय असं मी त्या दुकानदाराला विचारलं. तर तो म्हटला नाव जुना बाजार असलं तरी इथं नव्या वस्तू विकणारे ही आहेत आणि खरेदी करणारेही.

मग हळू हळू पुढे पुढे जात जात जुन्या कपडे विकणार्‍यांची, लोखंड विकणार्‍यांची दुकानं दिसायला लागली. या जुन्या बाजारातच मशिदीला लागून खोलगट भागात कपड्यांची पाच-पन्नास दुकान मला दिसली. त्यांच्या शेजारीच काही जुनी भांडी विकणारी मंडळी दिसली. ही जागा जर अरुंद होती. त्यामुळे रस्त्यावरच्या दुकाना पेक्षा इथे जरा निवांत फिरता येत होतं. काही दुकानांना प्लास्टिकची ताडपत्री लावून उभारलेल्या पालामध्ये दुकानात थाटली होती.

बऱ्याच दुकानात गिऱ्हाईक घासाघीस करत होते. सौदे आटपत होते. लोखंडाच्या दुकानात नट, बोल्ट, पानं, टिकाव, फावडे साऱ्या वस्तू दिसायला लागल्या, पण माझी नजर अँटिक वस्तू कुठे मिळतात याच्या शोधात होती. कारण जुना बाजार म्हटलं की कलासक्त लोकांसाठी या बाजारात भरपूर काही मिळतं असं मी ऐकून होतो.

पण विषय फक्त एकच, या वस्तू शोधण्यासाठी तुमची नजर भिरभिरती पाहिजे असं म्हणतात. जुन्या काळात ब्रिटिश काळातल्या शिवकाळातल्या वस्तू सुद्धा इथं मिळतात आणि माझ्यासारखे छांदिष्ट लोक अशा पितळी वस्तू देवांच्या मूर्त्या, जुने कंदील, झुंबर, तोरण, हँगर अगणित गोष्टी शोधत फिरतात.

काही गोष्टी असतील ही वीणाकामाच्या पण घर सजवण्यासाठी त्यांचा खुबीनं वापर करायचं आणि त्याच्यासाठी किंमत मोजायला तयार व्हायचं अशी लोक जगात सगळीकडेच आहेत.

थोडक्यात तुमची नजर पारखी असेल तर या भंगारात तुम्हाला सोन सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. एकूण काय तर जुना बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा. पण गुहेत गेल्यावर प्रश्न पडतो तो या जुना बाजारात वस्तू येतात कुठून ? त्याच उत्तर मला काही मिळालं नाही. म्हणून शेवटी काहीतरी भेटेल या उद्देशाने गल्ल्या गल्ल्यांमध्ये मी भरपूर चकरा मारल्या दुकानात दुकानदारांशी भरपेट गप्पा मारल्या आणि तिथून बाहेर पडलो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.