ते नसते तर आज पंजाब अफगाणिस्तानचा भाग असता..

अफगाण सैन्य हे एकेकाळी जगातले सगळ्यात ताकदवान सैन्य म्हणून नावाजले जायचे. अफगाणांवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांच्यावर सत्ता गाजवणे हे कुणालाही जमत नव्हतं. पण याच अफगाणी फौजेनी एकदा भारतावर आक्रमण केलेलं आणि तेव्हा त्या संपूर्ण फौजेला नडणारा एक भारतीय योद्धा होता ज्याचं नाव ऐकल्या ऐकल्या अफगाणी फौज थरथर कापायची तो योद्धा म्हणजे हरी सिंग नलवा.

शोले सिनेमात गब्बरची जशी दहशत होती ना अगदी तशी अफगाणिस्तानमध्ये हरी सिंग नलवा यांची दहशत होती. 

महाराजा रणजित सिंह यांच्या सेनेत हरी सिंह नलवा हे मुख्य कमांडरपैकी एक होते. ते कश्मीर, हजारा आणि पेशावर प्रांताचे राज्यपाल होते. हरी सिंह नलवा यांनी फक्त अफगाणी सेनेला धडा शिकवला नाही तर त्यांना पंजाबमध्ये एंट्री करू  दिली नाही. आपल्या प्रांतात त्यांचा जबर दरारा होता.

इंडियन एक्स्प्रेसने गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसरचे व्हाईस चॅन्सलर डॉ.डी.पी. सिंग यांच्या हवाल्यानुसार सांगितलं कि,

 इसवी एक हजार ते १९ व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात अफगाण फौजा भारतात घुसून हल्ले करायच्या. अफगाणच्या लोककथांमध्ये याचा उल्लेख येतो कि जेव्हा लहान मुलं आरडाओरड किंवा रडत असे तेव्हा त्याची आई त्याला गप्प करण्यासाठी नलवा यांचं नाव घेत असे तेव्हा ते मूल गप्प होत असे.

हरी सिंग नलवा यांनी अफगाणी सीमा आणि खैबर दर्रे या भागावर नियंत्रण मिळवलं होतं ज्यामुळे अफगाणी फौजांना भारतात घुसण्याची संधी मिळत नव्हती. 

अफगाणी सैन्यांची दिल्ली आणि पंजाब प्रांतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी महाराजा रणजित सिंह यांनी दोन विभागात आपली सेना तयार केली होती. एकात फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन आणि ज्यू सैनिकांची नियुक्ती केली होती ज्यामध्ये आधुनिक हत्यारांचा समावेश होता. 

दुसऱ्या सेनेत हरी सिंग नलवा यांच्याकडे हि धुरा देण्यात आलेली होती. नलवा यांनी अफगाणिस्तानच्या हजारा प्रांतातील १००० योध्याना हरवलं होतं. तेव्हा अफगाणी सेना तीन पटीने नलवा यांच्या सेनेला भारी होती. भारत सरकारने २०१३ साली हरी सिंग नलवा यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीटसुद्धा जारी केलं होतं. हरी सिंग नलवा यांनी अनेकदा अफगाणी फौजेला प्रत्युत्तर दिलेलं होतं. 

१८०७ साली नलवा यांनी कसूरच्या लढाईत अफगाण शासक कुतुबुद्दीन खान याला पराभूत केलं होतं. आश्चर्य म्हणजे या लढाईच्या वेळी नलवा हे फक्त १६-१७ वर्षांचे होते. १८१३ मध्ये अटकच्या लढाईत नलवाने इतर योध्यांसोबत अजीम खान आणि त्याचा भाऊ मोहम्मद खान यांच्यावर विजय मिळवला होता. दुराणी पठाणांवर शिखांचा हा मोठा विजय होता. 

१८१८ मध्ये नलवाच्या नेतृत्वात शिखांनी पेशावरची लढाई जिंकली. १८३७ मध्ये अफगाणिस्थानचं प्रवेशद्वार असलेल्या जमरूद वर नलवा यांनी विजय मिळवला. एकामागोमाग लढाई जिंकत चाललेले नलवा अफगाणी सेनेसाठी काळ बनून उभे राहिले होते. जमरूदच्या लढाईमध्ये हरी सिंग नलवा गंभीर जखमी झाले होते तेव्हा त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता कि

मी मेलो तरी चालेल पण माझ्या निधनाची खबर अफगाणी सेनेला कधीच लागता कामा नये. कारण नलवा यांच्या नावाची दहशतच इतकी जबरदस्त होती कि सैन्य माना टाकायचे.

त्यांनी या लढाईत सांगितलं होतं कि लाहोरमधून जोपर्यंत सेना येत नाही तोपर्यंत माझ्या मृत्यूची वार्ता सांगू नका. जर हरी सिंह नलवा यांनी हे युद्ध जिंकलं नसतं तर पेशावर आणि त्याच्या आसपासचा प्रदेश हा अफगाणिस्थानमध्ये गेला असता.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.