आजही त्यांच्या हवामानाच्या अंदाजाचा फायदा महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना होतो

सद्या भर उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडायला लागला. त्यात लग्नाचा सिझन.. कित्येकांचे मंडप वावटळीमुळे उडून गेले, वऱ्हाडी लोकांची तारांबळ झाली. थोडक्यात अवकाळी पावसाने लग्नाचं नियोजन विस्कळीत झालं. मग काय लोकं सोशल मीडियावर मिम टाकायला लागले…

“इथून पुढे लग्नाच्या तारखा पंजाबराव डक यांनाच विचारून काढाव्या लागतात म्हणजे ऐनवेळी अशी फजिती होणार नाही”

आता जागोजागी त्यांच्या नावाने पडणाऱ्या पोस्ट पाहिल्यात तर साहजिकच प्रश्न पडतो हे पंजाबराव डक कोण आहेत ? तर पंजाबराव डक हवामानाचा अचुक अंदाज सांगणारे हवामानतज्ञ आहेत. ज्यांना शेतकऱ्यांचा देवदूत समजलं जातं. 

तर हे हवामानतज्ञ म्हणा किंवा हवामान अभ्यासक आहेत परभणी जिल्ह्यातील पंजाब डख.  जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव इथ अंशकालिन शिक्षक तथा हवामान अभ्यासक असलेल्या पंजाब डख यांनी वर्तवलेल्या या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना होतं आहे. यासाठी ते व्हाटसअँप, आणि युट्युबचा खुबीने वापर करतात. त्यांच्याशी संबंधीत अंदाजे ५६० ग्रुप आहेत. तर त्यांच्या युट्युब चॅनेलचे ६७ हजारांपेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत. काहीच दिवसांपूर्वी शेतकरी पंजाब डख यांचे आभार मानतानाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

पंजाब डख हे शेतकरी कुटुंबातील आहेत.

टिव्हीवरील इंग्रजी व हिंदी बातम्या ते लहानपणापासूनच वडिलांबरोबर कायम पाहत असायचे. त्या बातम्या संपल्यावर ते वडिलांबरोबर सातत्याने हवामान या विषयावर चर्चा करत राहायचे. यातून आपणही शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज का देऊ नये, अस त्यांना वाटू लागलं. आणि या उत्सुकतेतून त्यांनी हवामानाबाबत त्यांचं स्वतःच निरीक्षण सुरू केलं.

ते जवळपास १९९५ पासून हवामानाचा अंदाज व्यक्त करत आहेत.

पुढे २००० साली पंजाब डख यांनी सी-डॅक हा संगणकाचा कोर्स पूर्ण केला. या कोर्सनंतर ते उपग्रह संगणकावर बघायचे आणि निरीक्षण करून अंदाज व्यक्त करायचे. या कामाची त्यांना आवडच  लागली. जणू छंदच. यातून त्यांनी शेतकर्‍यांसाठी मोफत मेसेज सेवा सुरू केली. त्यांनी वर्तविलेले अंदाजाची शेतकर्‍यांना खात्री व्हायची.

२०१५-१६ मध्ये अँड्रॉईड मोबाईल सर्वत्र आले आणि त्यांनी मेसेज सेवेसोबत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांची मदत वाढवण्याचे ठरवले. घरात बसून संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज वर्तवण्याची कल्पना आली आणि राज्यातील ३६ जिल्ह्यामध्ये ३६ व्हॉट्सअ‍ॅपग्रुप तयार केले. त्यात देखील आता आणखी खोलात जात अंदाज वर्तवण्यात येतो. म्हणजे विभागानुसार, जिल्हा, तालुका आणि गावाच्याही हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो.

आज पंजाब डख यांच्याशी संबंधित राज्यभरात ५६० पेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा अंदाज पोहोचतो.

पाऊस कधी येणार? किमान पावसामुळे नुकसान होऊ नये, पेरणी केव्हा करावी, पाऊस पुढे आहे का? गाराचा पाऊस कधी आणि कोठे पडेल? याबाबतची माहिती वर्तवली जाते. विशेष म्हणजे हे सगळे अंदाज ते तारखेनुसार आणि वेळेनुसारही सांगतात असा दावा केला जातो. सोबतच शेतकर्‍यांना गावोगाव जाऊन मार्गदर्शन करण्याचे काम देखील ते पार पडतात.

असं सांगितले जाते कि महिन्याला ते कमीत कमी ३० हजार शेतकर्‍यांना भेटतात.

पंजाब डख हे अंशकालिन शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेकडे काम करतात. त्यांना ५ हजार इतके मानधन मिळते. परंतु दोन वर्षापासून कोविडमुळे तेही मिळत नाही. घरी १० एकर शेती आहे. मात्र सततच्या अभ्यासामुळे पर्यावरणातील घटना, हवामानातील बदल या बद्दलचा त्यांचा चांगला अभ्यास झाला आहे.

जसे की पश्‍चिमेला पावसाळ्यात आभाळ तांबडे दिसू लागले की, ७२ तासांत पाऊस येणार हा अंदाज असतो. विजेच्या दिव्यावर किडे घोंगावू लागले की, ७२ तासांत पाऊस येणार, विमानाचा आवाज येणे हे ही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचे आहे. सोबतच आंब्याचे प्रमाण जास्त होऊन आंबारस जास्त होत असेल तर ही दुष्काळाची चाहुल त्यांच्या अंदाजात मानली जाते. त्यांच्या या अंदाजानुसार शेतकर्‍यांचा ओढा त्यांच्या हवामान अंदाजाकडे लागलेला असतो.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.