पेटलेला पंजाब शांत करण्याचे श्रेय या मराठी माणसाला जातं.

सध्या राजधानी दिल्ली शेतकरी आंदोलनामुळे पेटलेली आहे. गेले अनेक महिने विशेषतः पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. काल या आंदोलनाला हिंसक वळण लागले. लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांपैकी काही जणांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला.

सध्या या आंदोलनाविरुद्ध देशभरात वातावरण गढूळ बनवलं जात आहे. आंदोलन करणारे हे शेतकरी नसून खलिस्तानवादी देशद्रोही आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे. तर याच्या विरुद्ध जाऊन काही विचारवंत सांगत आहेत कि बऱ्याच प्रयत्नांनी पेटलेला पंजाब शांत झाला होता , केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे पंजाब पेटवला जात आहे.

तेव्हा अनेकांना प्रश्न पडला आहे की पंजाब पेटलेला म्हणजे काय झालं होतं ? तो शांत कसा झाला ? 

प्रशासकीय अधिकारी मनात आणल तर किती चमत्कार करू शकतात याचं उदाहरण म्हणजे भारताचे माजी गृह सचिव राम प्रधान. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचे विश्वासातले सनदी अधिकारी. जेव्हा चीनच्या युद्धानंतर हिमालयाने सह्याद्रीला साद घातली तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीला रवाना झाले. देशाचं जोखमीच संरक्षणमंत्रीपद स्विकारल.

दिल्लीतला कारभार सुरळीत व्हावा म्हणून त्यांनी महाराष्ट्रातले काही अधिकारी केंद्रात नेले होते तेव्हा त्यात राम प्रधान यांच नाव प्रमुख होत.

१९५२ साली राम प्रधान आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई इलाख्यात त्यांची नियुक्ती झाली. प्रशासनाच्या शेवटच्या पायरीपासून ते संयुक्त राष्ट्रात देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला होता.

याच अनुभवामुळे ऐंशीच्या दशकात राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांची गृह सचिव या सर्वोच्च पदासाठी निवड झाली. 

तो काळ भलता धामधूमीचा होता. इंदिरा गांधींनी केलेल्या सुवर्णमंदिरातल्या धाडसी ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर पंजाब मधील शीख तरुणांच्यात असंतोष पसरला होता. याच बदलाच्या भावनेतून इंदिरा गांधी यांची खलिस्तानवाद्यांनी हत्या केली . पंजाब पेटून उठला होता. इंदिरा गांधींच्या समर्थकांनी दिल्ली व पंजाब येथे  केलेल्या दंगलीमुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणे झाले होते.

आत्मघाती शीख अतिरेकी विमान अपहरणापासून मुख्यमंत्र्यापर्यंत हल्ले करत सुटले होते. त्यांना आवरणे कठीण झाले होते.

फक्त पंजाबच नाही तर ईशान्येकडील आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम प्रत्येक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जात होती. खंबीर समजल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर अननुभवी राजीव गांधी पंतप्रधान बनले होते आणि याचा फायदा देशविघातक शक्ती घेण्याचा प्रयत्न करत होत्या.

राजीव गांधी यांना अनुभव नव्हता मात्र आपल्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याचे उपजत शहाणपण त्यांच्या जवळ होते.

देशांतर्गत परिस्थिती नियंत्रणात आणायची या विषयावर त्यांची व राम प्रधान यांची बैठक झाली. सर्वात ज्वलंत प्रश्न पंजाबचा होता. तिथे अकालीदल शीख समुदायाचे नेतृत्व करत होता. त्यांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. पण परिस्थिती आणखी चिघळली जात होती.

राम प्रधान यांनी राजीव गांधी यांना सांगितलं,

“अकाली दलाशी बोलू शकेल असा एकच माणूस माझ्या समोर आहे तो म्हणजे शरद पवार. ”  

शरद पवार तेव्हा विरोधी पक्षात होते. ते कॉंग्रेस पक्षात नसूनही राजीव गांधी त्यांना या प्रश्नाची जबाबदारी देण्यास तयार झाले. पवारांना यातल काहीच माहिती नव्हत. ते दिल्लीला आले असता एक दिवस राम प्रधान त्यांना भेटायला महाराष्ट्र भवन येथे आले.

त्यांनी पवारांना थेट प्रश्न केला,

“पंजाब मधलं वातावरण सुरळीत करण्यासाठी अकाली नेत्यांशी संवाद सुरळीत करायला लक्ष घालाल का?

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पवार अख्खं पंजाब फिरले होते. त्यांची अकाली नेत्यांसोबत चांगली मैत्री होती. त्यांच्याशी सुसंवाद करण्याची पवारांनी तयारी दाखवली. शीख समाज कॉंग्रेस विरोधात अस्वस्थ होता पण राजीव गांधी यांची हा प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा होती.  शरद पवारांना आवश्यक ते सर्व स्वातंत्र्य दिले गेले, राम प्रधान त्यांच्या मदतीला होते. पुढे गुप्त बैठका घेण्यात आल्या.

सरकार स्वतः हून एक पाउल पुढे येत आहे हे बघितल्यावर अकाली नेत्यांनी देखील चर्चेची तयारी दर्शवली.

अखेर २४ जुलै १९८५ रोजी अकाली नेते लोंगोवाल व राजीव गांधी यांच्यात करार झाला व पंजाब प्रश्न सुटण्याच्या दिशेने पाहिले पाऊल पडले. यात सिंहाचा वाटा गृहसचिव राम प्रधान यांचा होता.

याचा अर्थ असा नव्हे की पंजाब लगेच शांत झाला. पुढची साधारण दहा वर्षे हि आग धगधगत राहिली. मात्र सरकार बद्दल असलेला असंतोष कमी होण्यास सुरवात त्या लोंगोवाल करारामुळे झाली. राम प्रधान यांनी निवृत्तीपर्यंत आसाम, मिझोरम असे अनेक प्रश्न सोडवण्यास राजीव गांधींना मदत केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.