कॅनडा आणि पंजाबी लोकांची नेमकी भानगड कशी जमली माहितय का?

आमचे एक भिडू आहेत वैभव सलालकर पाटील. त्यांनी आम्हाला प्रश्न पाठवला की,

“पंजाबी लोक कॅनडाला का पसंती देतात…

किंवा NRI म्हणून कॅनडामध्ये का राहतात?”

नेहमी प्रमाणे विषय खोल होता म्हणून आम्ही उडी घ्यायची ठरवली. तर जेव्हढ खोल जाईल तेव्हढ आम्ही जास्त बुडत गेलो. जस मुंबईमध्ये गुजराती तसं कॅनडामध्ये पंजाबी माणूस. कॅनडामध्ये गेल्यावर असे काही भाग आहेत जिथ गेल्यावर आपल्याला वाटत की आपण चुकून भटिंडा, जालंधर अशा कुठल्या पंजाबी गावात तर आलो नाही ना चुकून.

गोष्ट आहे १८९७ मधली.

अर्ध्या पृथ्वीवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया सिंहासनावर येऊन साठ वर्षे पूर्ण झाली होती. या गोल्डन ज्युबलीचा उत्सव सगळीकडे साजरा होत होता. ब्रिटीश साम्राज्य असणाऱ्या वेगवेगळ्या देशातही वेगवेगळे कार्यक्रम आखले जात होते. यातच होता कॅनडा !!

उत्तर अमेरिका खंडातला हा महाकाय देश. बऱ्याच युरोपियन देशाप्रमाणे इथे पंधराव्या शतकापासून ब्रिटीशांची देखील वसाहत होती. शेजारीच असलेल्या अमेरिका देशाएवढा नसला तरी कॅनडाहा बऱ्यापैकी प्रगती करत असलेला देश होता. वेगवेगळ्या देशातून लोक इथे कामासाठी येत होते. यात फक्त युरोपियनच नाही तर आशियातून चीनी जपानी लोकही होते. या प्रचंड पसरलेल्या देशात कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या प्रत्येकाला भरपूर पैसे कमवण्याची संधी होती.

तर १८९७ साली एक जहाज हॉंगकॉंगवरून वॅन्कूव्हरला आलं त्याच नाव होत एम्प्रेस ऑफ इंडिया. या जहाजात होते लंडनला क्वीन व्हिक्टोरियाच्या गोल्डन ज्युबली अटेंड करायला निघालेले भारतीय सैनिक. महिनो-महिने चालणारा हा प्रवास होता. 

ब्रिटीश रॉयल आर्मीच्या सिख रेजिमेंटचे हे सैनिक होते. कॅनडाच्या भूमीवर पाउल ठेवणारे ते पहिले भारतीय होते. यातच होते केसुर सिंग. ते रिसालदार मेजर होते. ही मंडळी वॅन्कूव्हर फिरली. त्यांना हा देश खूप आवडला. दूरदृष्टी असणाऱ्या केसुर सिंगनी तेव्हाच ठरवलं की रिटायरमेंटनंतर इथेच सेटल व्हायचं.

काहीच वर्षात कॅनडामध्ये पगडीधारी शीख मंडळी दिसू लागली. तिथे कॅनडीयन पॅसीफिक रेल्वेचं काम जोरात सुरु होतं. त्यासाठी त्यांना मजूर लागणार होते. शिवाय या खंडप्राय देशातील बरीच जमीन लागवडी खाली आणली जात होती. पंजाब मध्ये पिढ्यानपिढ्या शेती केलेल्या या रिटायर सैनिकांनी यात आघाडी घेतली. गावाकडून शेतमजूर आणले.

१९०६ साल उजाडेपर्यंत कॅनडामध्ये जवळपास १५०० पंजाबी भिडू आले होते.

आता तुम्ही म्हणाल एवढ सोपं होतं तर हे पंजाबी अमेरिकेला का गेले नाही. तर विषय असा होता की तो पर्यंत अमेरिका स्वतंत्र झाली होती. त्यांचे स्वतःचे नियम कायदे कडक झाले होते पण कॅनडामध्ये अजूनही वसाहती राज्य होतं. भारतातही इंग्रजांच राज्य असल्यामूळ हे पंजाबी बांधव टेक्निकली ब्रिटीश साम्राज्याचे नागरिक होते. त्यामुळे त्यांना कॅनडामध्ये प्रवेश सहज होता.

पण याचा अर्थ भारतीयांचं स्वागत कॅनडामध्ये खुल्या दिलान झालं असं नाही. कॅनडामधले युरोपियन वंशाचे लोक त्यांना तिथे घुसू देण्याच्या विरोधात होते. शिवाय कामगार म्हणून आधीच आलेले चीनी जपानी देखील या पंजाबीवर चिडून होते. यामधून गोंधळ सुरु झाला. कॅनडाचे सरकार देखील पंजाबीना सामावून घेण्यास खूप उत्सुक नव्हते. हे लोक खूप अस्वच्छ राहतात, त्यांच्यात जातपात मानण्यावरून विषमता आहे, त्यांना कॅनडाचं वातावरण मानवत नाही असे अनेक कारणे देण्यात येत होते.

पण जिद्दी पंजाबी लोक सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते.

एक तर त्यांच्यातले बहुतांशी लोक ब्रिटीश आर्मीमध्ये पराक्रम गाजवून रिटायर झालेले होते. त्यांनी व्हिक्टोरिया राणीसाठी सांडलेल्या रक्त आपल्या इमानदार असण्याचा सर्टिफिकेट म्हणून वापरले.

दिवसेंदिवस कॅनडामध्ये येणाऱ्या शिखांचं प्रमाण कमी होत नव्हतं. अखेर तिथले पंतप्रधानानी आपला एक प्रतिनिधी लंडन आणि भारतात पाठवला. त्यांने ब्रिटीश सरकारला पटवून दिले की पंजाबी लोकांना कॅनडामध्ये जाण्यापासून रोखावं. इंग्लंडने त्याला मान्यता दिली.

कॅनडा सरकारने आपले इमिग्रेशनचे नियम कायदे कडक केले. बऱ्याच पंजाबीना देश सोडायला भाग पाडलं. नव्याने येणाऱ्याना प्रवेश नाकारायला सुरवात केली. शिखांची संख्या कॅनडामध्ये निम्म्यावर आली. अशातच कामागाटा मारू प्रकरण घडले.

१९१४ साली सिंगापूरचे एक श्रीमंत शीख उद्योगपती बाबा गुरदित सिंग यांनी कामागाटामारू या बोटीने ३५० पंजाबीना कॅनडाला घेऊन आले. यातही बरेचजण आर्मी रिटायर जवान होते. पण तिथल्या सरकारने त्यांना प्रवेश नाकारला. गुरदीत सिंग यांचे कोणतेही बोलणे न ऐकून घेता त्यांना हाकलण्यात आले. बोट परत फिरवण्यात आली.

कामागाटामारू परत भारतात कलकत्त्याला आली. पण तिथल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हे सगळे प्रवाशी गदर या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित आहेत व ते सरकारविरुद्ध उठाव करत आहेत असा आरोप करून त्यांच्यावर गोळीबार केला. यात जवळपास २० शीख मारले गेले. इंग्रजांच्या या क्रूर वागण्याबद्दल जगभर टीका करण्यात आली. भारतातही अनेक आंदोलने झाली. पण यामुळे एक झालं. काहीही करून ब्रिटिशाचे जुलमी सरकार भारतातून हाकलून लावायचे हे प्रत्येक पंजाबी माणसाच्या मनात कोरले गेले.

कॅनडामध्ये गदर ही संघटना बळकट झाली. आपल्या हक्काबद्दल लढण्याचे बळ आले.

बाहेरून येणाऱ्याना बंदी होती पण जे आधीच कॅनडामध्ये आले होते त्या पंजाब्यानी कष्टाने तिथे आपली मुळे घट्ट केली. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४७पर्यंत कॅनडामधले इमिग्रेशनचे कायदे शिथिल झाले. पंजाबीन तिथे मतदानाचे अधिकार देखील मिळाले.

कॅनडाने त्यांना आपल म्हणून स्वीकारलं होतं.

गेल्या पन्नास वर्षात पंजाबी कम्युनिटीने तिथे प्रचंड प्रगती केली. आपले उद्योगधंदे वाढवले. फक्त स्वतःचीचं प्रगती नाही तर देशाचा विकास करण्यासही हातभार लावला. आज कॅनडामध्ये साडेचार लाख पंजाबी राहतात. तिथे जागोजागी पंजाबी रेस्टोरंटस, गुरुद्वारे दिसतात. तिथल्या राजकारणावरही त्यांची बऱ्यापैकी पकड आहे. कॅनडाच्या पार्लमेंट मध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पंजाबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे सत्तेत येणाऱ्या सरकारला या संपन्न समाजाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणून चं कॅनडाचा पंतप्रधान भारतात आल्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला हमखास भेट देतोच.

काही वर्षात कॅनडाचा पंतप्रधानपदी पगडीधारी शीख बसला तरी आश्चर्य वाटायला नको.

हे श्रीमंत कॅनडियन पंजाबी भारतीय राजकारणावर देखील प्रभाव टाकून आहेत. असं म्हणतात की खलिस्तानवादी चळवळीला त्यांच फंडिंग आहे. ते नक्की माहित नाही पण जगभरच्या लंगर, गुरुद्वारा उभारणी अशी कामे कॅनडाकरांच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही हे मात्र खरे आहे.

आज कॅनडामधल्या श्रीमंतीचं भारतातील पंजाबमध्ये राहणाऱ्या प्रत्येक तरुणाला आकर्षण आहे. खुद्द राजीव भाटीया उर्फ फिल्मस्टार अक्षय कुमार देखील कॅनडाचं नागरिकत्व बाळगून आहे. पंजाबचा गुंठाधारी तरुण एकतर भांगडा कम रॅप व्हिडीओ तरी बनवत आहे किंवा कॅनडाला जाण्याचा जुगाड तरी जमवत आहे. एकदिवस आपल्या सगळ्या भाऊबंदाना आणून कॅनडाला मिनी पंजाब करणे त्यांचं उद्दिष्ट आहे असच वाटतय.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pratik Dhaware says

    Hya vidhansabha nivadanukit konatya pakshala kiti jaga milatil ?

Leave A Reply

Your email address will not be published.