मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या पुरंदर पासूनच अंजीराची लागवड सुरु झाली

महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे नाव घेतलं तर पुणे जिल्हा टॉपवर येतो. पुण्याचं वैशिष्ट्यच आहे की त्याला किल्ल्यांचं वैभव लाभलय. यामध्ये पुरंदर किल्ल्याचाही नंबर लागतो, पण पुण्यामध्ये असलेलं हे पुरंदर गाव फक्त किल्ल्यासाठीच नाही तर अजून एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे ‘पुरंदरी अंजीर’.

पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवडचे अंजीर यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. अगदी शिवकाळामध्ये हे अंजीर असल्याचे पुरावे सापडतात. या सासवडपासून पाच किलोमीटर अंतरावर ‘सोनोरी’ नावाचं गाव आहे. इथेच सर्वप्रथम अंजिराची लागवड सुरु झाली होती.

एकदा पुरंदर किल्ल्याला मिर्झाराजे आणि दिलेरखान यांनी वेढा दिला होता. त्यावेळी छावणी ही सोनोरी गावात पडली होती. त्या छावणीत असलेल्या एका अफगान सरदाराने अंजिराची काही रोपं थेट अफगाणिस्तानातून आणली होती. त्याला अंजिराचं आयुर्वेदिक महत्त्व माहीत होतं. सोनोरी गावात आल्यावर जेव्हा त्याला जाणवलं की, अंजिरासाठी पोषक असलेलं उष्ण आणि कोरडं हवामान इथे आहे, तेव्हा त्याने अंजिराची काही रोपं सोनोरी गावातील शेतकरी कुटुंबांना देऊ केली आणि अशा रीतीने या गावात पहिल्यांदा अंजिराची लागवड झाली.

त्याकाळी पाऊसमान जरी कमी असलं तरी अंजीर जगविण्यासाठी आवश्यक तितक्या पाण्याची उपलब्धता या गावात होती. डोंगराळ भाग आणि शिवाय दमट हवा नव्हती म्हणून इथे अंजिराच्या बागा फुलू लागल्या. तिथली जमीन आणि हवामान यामुळे चवीला अत्यंत गोड अशी अंजिरं इथे पिकू लागली.

त्यानंतर इंग्रजांच्या काळात व्यापारासाठी सोनोरी गावाजवळच राजेवाडी इथं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. तिथून वेगवेगळ्या प्रकारचा शेतमाल इंग्रज त्यांच्या देशात पाठवायचे. त्याचाच एक भाग म्हणून अंजिरही परदेशात पाठवला गेले. जसजसे अंजीर या रेल्वे मार्फत देशाच्या इतर भागात जाऊ लागले तस-तशी सोनोरीच्या अंजीरांची ख्याती सर्वदूर पसरली आणि या अंजिरातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गावाचा उदरनिर्वाह सुरु झाला.

अनेक शेतकऱ्यांनी झाडाचा शेंडा काढून रोपं लागवड करायला सुरुवात केली. लागवड करताना ठराविक अंतर नसलं तरी स्वतःच्या अंदाजाप्रमाणे दहा ते पंधरा फुटांवर लागवड केली जायची आणि खत म्हणून प्रामुख्यानं शेणखताचा वापर केला जायचा. लागवडीच्या जवळपास वर्षभरानंतर वर्षभरानंतर बाग फुलायची पण एकदा लागवड केली, की पुढची दहा ते पंधरा वर्ष पाहायचं काम नाही. कारण ही बाग तशीच्या तशीच चालू राहायची.

लवकरच ‘पुना फिग’ म्हणून या अंजिरानं त्याची ओळख निर्माण केली होती.

हळूहळू अंजिराचे क्षेत्र वाढत गेलं आणि पुरंदर तालुक्यातील सोनोरी तसंच जवळपासचा परिसर ‘अंजिराचा पट्टा’ म्हणून नावारूपाला आला. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून गावातल्या शेतकऱ्यांनी अंजीर पिकाकडे एक व्यावसायिक पीक म्हणून बघायला सुरुवात केलीये. या अंजिरानं बहात्तरच्या दुष्काळात गावकऱ्यांना मोठा आधार दिला होता.

नंतरच्या काळात गावातील जवळपास पन्नास टक्के क्षेत्र अंजिरानं व्यापलं होतं. फळांची काढणी केल्यानंतर ती फळं डोक्यावर पाटीत घेऊन सासवडच्या बाजारपेठत बायका जायच्या. तिथं पन्नास पैसे ते एक रुपया दराने अंजीर त्या विकत होत्या. पण तरीही त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून गावातील शेतकऱ्यांनी अंजिराच्या लागवड पद्धतीत अनेक बदल करून पाहिले आणि त्यांना यश मिळालं. शिवाय अंजीरातून चांगले उत्पन्न मिळू लागले.

आता मागील काही वर्षांपासून गावात बागा वाढत आहेत. याचं कारण म्हणजे गावातील सुशिक्षित तरुण अंजीर बागांकडे वळत आहेत. वर्षातून दोन वेळा ते बहर घेतात. प्रामुख्यानं ‘खट्टा बहार’ हिवाळ्यात तर ‘मीठा बहार’ उन्हाळ्यात घेतला जातो. हे पीक नगदी असल्याने वर्षभर याला बाजारात मागणी असते आणि त्यानुसार छाटणीचे नियोजन केलं जातं.

महाराष्ट्रातील अंजीर लागवडीपैकी साधारण ६०० हेक्टरच्या आसपास क्षेत्र हे एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. तर पुरंदर तालुक्यात सुमारे ४५० हेक्‍टर क्षेत्र आहे.

या अंजिराची खासियत ओळखून २०२०-२१ मध्ये पुरंदर अंजीर या पिकाला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय सुद्धा मिळाला आहे. ज्यामुळे आता अंजीरासाठी देश आणि विदेशातील बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. त्यांची निर्यात आता परदेशातही होते त्यामुळे गावकऱ्यांचं जीवनमान सुधारलं आहे. 

शेतकरी पिकलेली ताजी अंजीरं विकतात पण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरं तयार करतात. व्यापारी दृष्टीने अंजिराची लागवड ही फक्त महाराष्ट्रातच केली जाते.

अशा या अंजिरामुळे सोनोरी गावाला जगभरात ओळख मिळाली आहे. अत्यंत दुर्मिळ प्रजाती इथं या गावकऱ्यांनी जपून ठेवल्या आहेत. मात्र या प्रजाती संरक्षित करण्यासाठी सरकारी पातळीवर गांभीर्याने विचार आणि कृती व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.