साडेतीनशे वर्षापूर्वी आजच्याच दिवशी झाली होती ‘स्वराज्याची पहिली लढाई’ !

२७ एप्रिल १६४५. गुलामीत पिचलेल्या अन्यायग्रस्त रयतेला स्वतंत्र करण्यासाठी आणि हक्काचं स्वराज्य मिळवून देण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ शिवबाने घेतली. तेव्हा त्यांच वय चौदा पंधरा वर्षाच असेल.  नुसता ती शपथ नव्हती तर अख्ख्या देशाच भाग्य बदलवणारी घटना होती.

मांसाहेबांचा आशीर्वाद सोबतीला होताच.शिवरायांनी आपल्या मुठभर सवंगाड्यांच्या सोबत अख्खा मावळ पिंजून काढायला सुरवात केली. नवे साथीदार जोडले, परकियांच्या ताब्यात कोणते कोणते गड गेलेत त्यांची स्थिती काय याची टेहळणी करण्यात आली.

पहिली सुरवात केली तोरण्यापासून. दुर्लक्षित असेल हा गड सहज ताब्यात आला.  या गडावर विजय मिळवल्यामुळे तरुण मावळ्यांच्यात आत्मविश्वास आला. स्वराज्याचे तोरण बांधले गेले. पाठोपाठ जहागिरीतले इतर छोटेमोठे किल्लेही आदिलशाहीच्या हातातून हिसकावून घेण्यास सुरुवात केली.

ही बातमी फार दिवस लपून राहणे शक्य नव्हते. शिवरायांच्या या कृतीने विजापूरचा आदिलशहा मात्र खवळला. शहाजी राजे तेव्हा त्याच्या नोकरीमध्ये होते. त्यांना तुमचा मुलगा कसल्या उचापती करतोय याचा जाब विचारण्यात आला. तेव्हा महाराजांनी उत्तर पाठवलं की जहागीरीतले किल्ले तिथली डागडुजी करण्यासाठी व्यवस्था मजबूत करण्यासाठी ताब्यात घेतले आहेत. तात्पुरत वातावरण निवळल

पण जेव्हा मराठी सैन्याने पुण्याजवळचा कोंढाण्यासारखा मात्तबर किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा मात्र शिवरायांच्या या कारवायांनी आदिलशाह संतापला. पण त्याला खात्री होती की, शहाजीराजेंची साथ असल्याशिवाय शिवाजी इतकं मोठं धाडस करूच शकत नाही. यातूनच शिवरायांचं बंड मोडून काढायचं ठरवल.

प्रथम २५ जुलै १६४८ त्याने शहाजीराजे यांना कपटाने कैद केले आणि त्यांच्या बंगळूर प्रांतावर आपली आदिलशाही फौज धाडली. तर दुसरी एक फौज पुण्याच्या दिशेने चालून आली.

शहाजीराजे कैदेत असताना त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे (शिवरायांचे मोठे बंधू) यांनी बंगळूर मधून तो हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. इकडे पुण्यातही आदिलशाहची दुसरी फौज येऊन ठेपली होती. त्याला भिडायला शिवराय देखील आपल्या मावळ्यांंसोबत सज्ज झाले होते. त्यावेळी शिवरायांचे वय अवघे १८ वर्षे होते.

आदिलशाही फौजफाटा अफाट. आदिलशाही सरदार फत्तेखान कोवळ्या वयातील शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी ३,००० सैन्यांची फौज घेऊन आलेला. काही झाले तरी शत्रूला आपल्या स्वराज्यात प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्णय शिवरायांनी घेतला. स्वराज्याची ही पहिलीच लढाई होती.

पहिल्याच लढाईत त्यांनी गनिमीकावा वापरण्याचे ठरवले. शत्रूशी लढण्यासाठी शत्रुच्याच भूमीचा वापर करायचा अशी मोहीम शिवरायांनी आखली. त्यासाठी  निवड केली पुरंदर किल्ल्याची .

पुरंदरच्या आसपासचा प्रदेश डोंगराळ, त्यामुळे शत्रूला आत शिरायला कठीण. पण त्यावेळी किल्ला शत्रुच्याच ताब्यात होता. पण पुरंदरचे किल्लेदार महादजी सरनाईक होते त्यांचे आणि शहाजीराजेंचे स्नेहबंध होते. त्यातच सरनाईक यांचे वय झाले होते व त्यांच्या मुलांचे आपसात पटत नव्हते. याचाच फायदा घेत शिवराय किल्ल्यात शिरले. महाराज असे अचानकपणे पुढे आल्याने फत्तेखान आपला मार्ग बदलून कोंढाण्याकडे जाण्याऐवजी बेलसरजवळ मुक्कामी थांबला.

तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८. आता महाराजांनी गनिमीकावाने कुटयुद्ध चालू केले.

आपले सैन्य कमकुवत असून आपली फळी फुटली असल्याचे दृश्य महाराजांनी तयार केलं. छावणी बाहेर पडताच खानने महाराजांच्या सैन्याचा अंदाज घेतला आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढवा म्हणून बाळाजी हैतबरावला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले. खानाला विजयाचा आनंद देऊन त्याला बेसावध करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला सोडून दिला.

किल्ला सहजपणे हाती आल्याने बाळाजी व त्याचे सैन्य आनंदित झाले होते. इकडे खान देखील बेसावध झाला. मात्र सावध असलेल्या महाराजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी व भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गढी घ्यायला पाठवले. त्याच दिवशी संध्याकाळी ही तुकडी पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी दबा धरून बसली.

पहाटे शत्रू गफिल असतांना या सैन्याने हल्ला चढवला. शत्रूंनी अशा हल्ल्याची कल्पनाही केली नव्हती. बाळाजीने लगेच दरवाजा लावून घेतला. पण आदिलशाहाच्या कारकिर्दीत गडाच्या कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट मजबूत नव्हता. मावळ्यांनी कोट खणायला सुरुवात केली. काहीजण शिड्या चढायला लागले. वरतून बाळाजीच्या सैन्य दगड, गोटे, पलिते मिळेल त्याने हल्ला करायला लागले.

बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडार पाडले. कावजीने वेस फोडली. मराठ्यांचा आवेश पाहून हैतबराव व त्याच्या सैन्याचा धीर सुटू लागला. शेवटी कावजीने हैतबरावला ठार केले आणि त्याचे सैन्य शरण आले. आता मराठ्यांनी मोर्चा पुरंदरकडे वळवला.

राजांनी दुसरी तुकडी फत्तेखानच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली. तीच नेतृत्व बाजी पालसकर यांच्याकडे दिल. आता फत्तेखानच्या सैन्याने देखील कडवा प्रतिकार करायला सुरुवात केली होती. खानाच्या सैन्यापुढे राजेंची सैन्य तुटपुंजे होते. बाजीच्या सैन्याचे नुकसान होऊ लागले.

या झटापटीत निशानाची तुकडी फत्तेखानच्या सैन्याच्या तावडीत सापडली. ते पाहून बाजी जेधे पुढे सरसावले. निशानाचा भाला आणि जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर घेऊन ते परत फिरले. त्यांच्या मागोमाग सैन्यही परतले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद करण्यात आले. शिरवळ आणि बेलसर अशा दोन ठिकाणी तरुण शिवाजीने आपला पराभव केला या कल्पनेने संतापलेल्या फत्तेखानने पुरंदरवर हल्ला केला.

आता मराठ्यांचे सैन्य वरच्या बाजूस होते. त्याचा फायदा घेऊन फत्तेखानचे सैन्य माऱ्याच्या टप्प्यात येताच वरतून मावळ्यांनी दगड, बाण यांचा मारा सुरू केला. फत्तेखानचे सैन्य वरच्या माराने व चढाईने दमलेले असतांना महाराजांनी अचानक गडाचा दरवाजा उघडला व ताज्या फौजेला बाहेर काढले. त्यांच्या आक्रमणाने मुघल सैन्याची दाणादाण उडाली. गोदाजीने मुसेखानाच्या छातीत खसकन भाला खुपसला.

पण खानही काही कमी पराक्रमी नव्हता. त्याने तो भाला काढून तलवारीने झुंज द्यायला सुरुवात केली पण, गोदाजीचा वार जबरदस्त होता की मुसेखान खांद्यापासून मध्यभागापर्यंत चिरला गेला होता. त्यातच खाली कोसळला. मुसेखानची अवस्था बघून फत्तेखान आणि त्याच सैन्य घाबरलं आणि तिथून पळत सुटलं.

मुघल आपल्याला घाबरून पळताय म्हणल्यावर मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला. या युद्धात बाजी पालसकर यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांना वीरमरण आले पण स्वराज्याची पहिली लढाई यशस्वी झाली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.