पुरंदरे घराण्याचे उपकार पेशवे कधीही फेडू शकणार नाहीत…
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे शिवशाहीर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेबांच्या शिवचरित्राचं गारुड मराठी भाषेच्या सीमा ओलांडून देशभरात पसरलं आहे. फक्त त्यांचाच नाही तर ते ज्या सासवडच्या पुरंदरे घराण्याशी संबंधित आहेत त्यांचा इतिहास देखील मोठा आहे.
सासवडचे पुरंदरे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे. सतराव्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तर पेशवाईपर्यंत या घराण्यातील अनेक पिढ्यांनी स्वराज्याच्या कामी योगदान दिले.
या घराण्याचा मूळ पुरुष त्र्यंबक भास्कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेला. इ. स.१६५९ साली अफजलखान भेटीच्या वेळी महाराजांनी त्यांच्याकडे मराठी फौजेची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर १६६० मध्ये पन्हाळगडावरून निघताना पन्हाळगडची जबाबदारी पण त्र्यंबक भास्कर यांच्याकडे दिली होती. इ. स.१६७० मध्ये त्यांची पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नियुक्ती झाली.
पुढे त्र्यंबक भास्कर पुरंदरच्या अगदी जवळ असलेल्या सासवडला स्थायिक झाले.
त्र्यंबक भास्करांच्या दोन मुलांपैकी धाकटा अंबाजी मोठा पराक्रमी होता. .१७०३ मध्ये औरंगजेबाने सिंहगडला वेढा घातला असताना सेनापती धनाजी जाधवांच्या दिमतीला असलेल्या बाळाजी विश्वनाथांनी अंबाजीपंतांकडे दारूगोळ्याची मागणी केली होती.
पुढे छत्रपती शाहू महाराज १७०७ मध्ये माळव्यातून सुटून महाराष्ट्रात आले, तेव्हा महाराष्ट्रातून सैन्यासह त्यांना जाऊन मिळणारे पहिले सरदार घराणे म्हणजे पुरंदरे.
अंबाजीचा पुतण्या मल्हार सुकदेव याने शाहू महाराजांची मर्जी जिंकली. पुढे जेव्हा कोकणातून बाळाजी विश्वनाथ भट देशावर आलेतेव्हा प्रथमतः त्यांचा संपर्क आला तो अंबाजीपंतांशी. चंद्रसेन जाधवांच्या आणि बाळाजी विश्वनाथांच्या तंट्यापासून अगदी प्रत्येक बाबतींत अंबाजीपंतांनी बाळाजी विश्वनाथांची पाठराखण केली.
पुढे १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवाई मिळाल्यानंतर अंबाजीपंत पुरंदरे यांना सातारा दरबारात मुतालकी मिळाली. ही मुतालकी पुरंदरे घराण्याकडे शेवटपर्यंत सुरू राहिली.
१७१६ मधील दमाजी थोरातांवरच्या हिंगणगावावरील छाप्यात अंबाजीपंत आणि बाळाजी विश्वनाथ दग्याने पकडले गेले. दमाजीने खंडणीसाठी अंबाजीपंतांच्या अंगाचे मांस तोडले, असे उल्लेख या घराण्याच्या यादीत आढळतात.
१७१८-१७१९ च्या पेशव्यांच्या दिल्ली स्वारीत अंबाजीपंत सुद्धा सामील झाले होते. याच स्वारीत राजमाता येसूबाईंची सुटका होऊन चौथाई-सरदेशमुखी आणि स्वराज्य अशा तीनही सनदा दिल्ली दरबारातून मराठ्यांना मिळाल्या.
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपदाचा वाद पुन्हा उकरला गेला, तेव्हा अंबाजीपंतांसह पिलाजी जाधवराव वगैरे मंडळींनी बाजीरावांचा पक्ष उचलून धरल्याने छ. शाहू महाराजांनी विश्वासाने बाजीरावांना पेशवाई दिली.
१७२६ च्या मध्यावर अंबाजीपंत पुरंदरे यांनी माळव्यात स्वतंत्र मोहीम केली. यावेळी त्यांच्या सोबतीला पिलाजी जाधवराव वगैरे खाशी मंडळी होती. अंबाजीपंत मोहिमेवर असताना सातारा दरबारातील पेशव्यांच्या मुतालकीचे काम त्यांचा मुलगा महादोबा पाहत असे. बाजीरावांच्या १७३३ च्या जंजिरा मोहिमेत अंबाजीपंत पेशव्यांसोबत दंडाराजपुरीला तळ देऊन होते. १७३३ च्या अखेरीस अंबाजीपंत काशी यात्रेला गेले होते. पुढे २५ ऑगस्ट १७३५ रोजी सासवडला त्यांचा मृत्यू झाला.
पेशवे स्वतः या घराण्याला आपल्या सख्ख्या भाऊबंदांप्रमाणे जपत असत. नानासाहेबांनी पुण्याच्या नगररचनेसोबत शनिवारवाड्याच्या कोट बांधायचा प्रारंभ केला. बारामतीकर जोशांसारख्या पेशव्यांच्या आप्तांनाही कोटाच्या आत घर बांधायला परवानगी नव्हती, पण याला अपवाद केवळ पुरंदऱ्यांचा होता.
१८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावांच्या काळात तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात आबा पुरंदरे यांच्या फौजेवर मोठी भिस्त होती. सासवडच्या पुरंदरे वाड्याच्या प्रचंड तटावर अजूनही तोफगोळे आदळल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसतात.
आजही हा सरदार पुरंदरे यांचा वाडा सासवड मध्ये उभा आहे.