२४ वर्ष झाली तरी CBI ला पुरोलियाचं गुढ सोडवता आलेलं नाही.

सीबीआय ही देशाची सर्वात महत्वाची तपास संस्था. त्यामुळेच कुठलंही महत्वाचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी जोर धरते. पण आज आम्ही तुम्हाला सांगतोय एका अशा गूढ प्रकरणाबद्दल जे होऊन आता जवळपास २३ वर्षांचा कालावधी लोटलाय, परंतु अजून देखील सीबीआयला या प्रकरणाचं गूढ उकलता आलेलं नाही.

स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातलं हे गूढ प्रकरण म्हणजे.

 ‘पुरुलिया शस्त्रास्त्र कांड’

  • काय होतं पुरुलिया शस्त्रास्त्र कांड…?

साल होतं १९९५. १७ डिसेंबरची रात्र.

याच रात्री पश्चिम बंगालमधील पुरुलिया या गावात एका रशियन विमानाने शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला होता. मोठ्या प्रमाणात बंदुकी, गोळ्या, बॉम्ब, रॉकेट लॉन्चर यांनी भरलेल्या पिशव्या रात्रीतून या गावात टाकण्यात आल्या होत्या.

१८ डिसेंबरच्या सकाळी जेव्हा गावकरी आपल्या कामाला निघाले तेव्हा त्यांना या पिशव्या आणि आतमधल्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रांचा साठा बघून त्यांच्यात एकंच दहशत पसरली. शस्त्रास्त्रांचा साठा इतक्या मोठ्या प्रमाणात होता की लवकरच ही बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली.

४ दिवसातच विमान पकडण्यात आलं !

या खळबळजनक घटनेने सक्रीय झालेल्या भारतीय सुरक्षा संस्था कामाला लागल्या. २१ डिसेंबर रोजीच थायलंडहून कराचीकडे जात असलेल्या एका विमानाला मुंबईवर संदिग्धावस्थेत घिरट्या घालताना ट्रॅक करण्यात आलं आणि विमानतळावर उतरण्यास भाग पाडण्यात आलं.

या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी केली असता पुरुलियामधील शस्त्रास्त्रांच्या प्रकरणी या विमानातील प्रवाशांचाच हात आहे. याच विमानाने पॅराशूटच्या मदतीने पुरुलियामध्ये शस्त्रास्त्रे टाकली होती.

‘एन्तोनोव २६’ असं नाव असलेल्या या विमानातून ब्रिटीश शस्त्रास्त्र दलाल पीटर ब्लीच आणि इतर ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईचा मास्टरमाइंड असलेला ‘किम डेवी’ मात्र आश्चर्यकारकरित्या आपला देश डेन्मार्कमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाला. ज्याचं प्रत्यार्पण अजूनपर्यंत होऊ शकलेलं नाही.

त्याचवेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पीटर ब्लीच आणि इतरांना देखील भारत सरकारने माफ करून सोडून दिलं. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी  पीटर ब्लीचला सोडण्यात येत असल्याची घोषणा केली होती. 

मात्र अजूनपर्यंत तरी या प्रकरणाच्या पाठीमागे नक्की कोण होतं, हे प्रकरण नेमकं का घडवण्यात आलं, पुरुलियामध्ये शस्त्रास्त्रे टाकण्यामागचा उद्देश काय होता, यांसारख्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं नाही.

भारत सरकारचा हात..?

एप्रिल २०११ साली किम डेवीची मुलाखत ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीवर प्रदर्शित झाली त्यात त्याने दावा केला की या प्रकरणात भारत सरकारचा हात होता. केंद्रात विराजमान असलेल्या पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव सरकारने पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी प्रदेशात हिंसा घडविण्यासाठी नक्षलवाद्यांना पुरवायला पुरुलियामध्ये शस्त्रास्त्रे टाकली होती.

किम डेवी

डेवीचा हा दावा सीबीआयने फेटाळून लावला. सीबीआयच्या मते या प्रकरणात बंगालमधील धार्मिक-अध्यात्मिक संघटना ‘आनंद मार्ग’चा हात होता. डावे आणि ‘आनंद मार्ग’ संघटना यांच्यातील संघर्षातून बंगालमधील डाव्या सरकारविरोधात ‘आनंद मार्ग’ने कट रचला होता.

मुख्य आरोपी डेवी हा सुद्धा ‘आनंद मार्गी’च असल्याचा दावा देखील सीबीआयने केला होता. न्यायालयाने सीबीआयचे हे दावे फेटाळून लावले. पण असं असतानाही अनेक जणांचं मत आहे की यामागे ‘आनंद मार्ग’ संघटनाच होती.

अनेक दावे, पण एकमत कशावरच नाही !

भारत सरकार, आनंद मार्ग या दोहोंव्यतिरिक्त या प्रकरणात अमेरिका, म्यानमार आणि लिट्टे यांसारख्या संघटनांचा हात असल्याचे देखील दावे करण्यात आले. काही सुरक्षा विशेषज्ञांनी चुकून ही शस्त्रास्त्रे पुरुलिया येथे पडल्याचा देखील दावा केला. पण हे फक्त दावेच राहिले. या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण आणि हे प्रकरण का घडवण्यात आलं यावर मात्र अजूनही पडदाच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.