जेआरडी टाटा नव्हे तर पुरुषोत्तम मेघजी कबाली हे भारतीय वंशाचे पहिले परवानाधारक पायलट होते

सध्या टाटांकडे ‘एअर इंडिया’ कंपनी परत गेल्याने सगळीकडे त्याच्या चर्चा आहेत. एअर इंडियाची ‘घरवापसी’ झाली अशा आशयाने या घटनेकडे बघितलं जातंय. शिवाय टाटांची अजून एक खासियत म्हणजे १९२९ मध्ये जेआरडी टाटा भारताचे पहिले परवानाधारक पायलट बनले. मात्र असं असलं तर भारताचे पहिले वैमानिक म्हणून ‘पुरुषोत्तम मेघजी कबाली’ यांना ओळखलं जातं.

हे कसं? तर टाटा यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला होता आणि ते फ्रेंच वंशाचे भारतीय नागरिक होते. तर कबाली हे ‘भारतीय वंशाचे’ पहिले पायलट होते. म्हणून टाटा यांच्या एक वर्षानंतर १९३० मध्ये परवाना मिळवूनही पहिल्या भारतीय पायलटचा मान त्यांना जातो. 

तीसच्या दशकाच्या सुरुवातीस, विमान कंपन्यांनी जागतिक स्तरावर त्यांची बाजारपेठ वाढवण्यास सुरुवात केली. तसं, त्या काळात विमानं खूपच कमी होती आणि अंतरही कमी होतं. मात्र लवकरच वैमानिक लांब पल्ल्याचा प्रवास करत, वेगाचे नवे विक्रम प्रस्थापित करू लागले आणि नवीन विमान कंपन्या बाजारात दाखल होऊ लागल्या.

त्याचवेळी १९३० मध्ये पुरुषोत्तम मेघजी कबाली या भारतीयाने वैमानिक क्षेत्रात प्रवेश केला. याच वर्षी त्यांनी इंग्लंडमध्ये VT-AAT विमान खरेदी केलं. तेव्हा पाकिस्तान आणि भारत एक होते. त्यानुसार  इंग्लंडमधील क्रॉयडन इथून हे विमान पॅरिस, रोम आणि इराण मार्गे कराचीत आणण्याची त्यांची योजना होती. त्यांनाही एवढा लांबचा रस्ता पार करून विक्रम करायचा होता.

एवढं लांब अंतर एका छोट्या विमानात कापण्याचा हा खूप धाडसी प्रयत्न होता. पण तुम्ही आम्ही बघतो अगदी तसंच स्वप्न कबालींनी बघितलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण सुरु केलं. 

या विमानाला ‘फेदर ऑफ द डॉन’ असं नाव त्यांनी दिलें होतं.

आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणतंही कार्य सुरु करण्याअगोदर आपण पूजा करतो. अगदी तसंच प्रवास सुरू करण्यापूर्वी या विमानाची क्रॉयडन इथे पूजा करण्यात आली. प्रसिद्ध कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक आणि पहिल्या महिला राज्यपाल ‘सरोजिनी नायडू’ यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. प्रवास सुरु झाला आणि विमानाने टेक-ऑफ केलं.

प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विमान अगदी छान चाललं. प्रवास चांगला चालू होता. कबालींनी पॅरिस, मार्सेलिस, पिसा, रोम आणि ट्युनिस कोणत्याही अडचणी शिवाय पार केलं.  पण, जेव्हा ते लिबियातील त्रिपोली इथे आले तेव्हा मोठी अडचण उभी राहिली.

लिबियामध्ये, टोब्रुक आणि त्रिपोली दरम्यान वादळात कबाली अडकले आणि त्यांचं विमान कोसळलं. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही पण विमानाचा चेंदामेंदा झाला.

नंतर हे अपघातग्रस्त विमान ट्रकमध्ये बॉम्बे फ्लाइंग क्लब इथे आणण्यात आलं. आणि कबाली यांनी बी. एम. दमानिया जे अभियंता आणि विमानचालक होते त्यांच्याकडे विमान दुरुस्तीची जबाबदारी सोपवली.

कबालींचं स्वप्न अपूर्ण राहिलं मात्र त्यांनी निर्धार सोडला नाही. विमान उडवणं हा त्यांचा धंद होता जो त्यांनी कधीच सोडला नाही. त्याचं विमान दुरुस्त झाल्यावर त्यांनी ते पुन्हा उडवलं. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी मुंबईतील जुहू इथल्या ‘एअर सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड’ या खासगी विमान कंपनीत पायलटची नोकरी स्वीकारली आणि आयुष्यभर वैमानिक म्हणून कार्य करत राहिले. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.