युपीच्या राजकारणात पूर्वांचल एक्सप्रेस वेमुळं पक्षांना सत्तेतून बाहेर पडावं लागलंय
येत्या ३ ते ४ महिन्यात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. अश्यात सगळेच पक्ष जनतेचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी कामाला लागलेत. मतांचा आकडा आपल्या वाट्याला जास्त यावा, यासाठी पक्षांनी मोठं मोठ्या – योजना, प्रोजेक्ट, आश्वासनांची यादी वाचायला सुरुवात केली आहे.
अश्यातच युपीमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे सध्या राजकीय चर्चेत सापडलाय. आता आधी आपण या एक्सप्रेस वे बद्दल जाणून घेऊ,
तसा हा एक्सप्रेस वे नेहमीच चर्चेत असतो तो त्याच्या लांबीमुळे. ४३१ किमीचा हा एक्स्प्रेस वे नऊ जिल्ह्यांतून जाणार आहे, ज्याच्यावरचा ३.४ किमीचा एअरस्ट्रीप आकर्षणाचा केंद्र बनला आहे. या एक्स्प्रेस वेमुळे केवळ वेग वाढणार नाही, तर परिसरातील उद्योग आणि व्यवसायांनाही बळ मिळणार असल्याचे बोलले जाते.
या एक्सप्रेस वे मुळे राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजप पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीत पूर्वांचली मतदारांना आकर्षित करण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. पण आपण जर मागचा थोडा इतिहास पहिला तर उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे राजकारण वेगळीच स्टोरी सांगत आहे.
तर माजी मुख्यमंत्री मायावती यांनी दिल्ली ते बिहार दरम्यान एक्स्प्रेस वे बांधण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशचा प्रवास सोपा आणि जलद करणं हे यामागचं उद्धिष्ट तर २००७ च्या निवडणुकीत पूर्वांचली मतदारांना आकर्षित करणं हा यामागचा हेतू होता. ज्यात मायावती पास देखील झाल्या.
उत्तर प्रदेशाच्या राजकीय इतिहासात बऱ्याच वर्षानंतर एका पक्षाचे मजबूत सरकार तयार झाले होते. मायावतींनी त्यांच्या कार्यकाळात नोएडा ते आग्रा हा यमुना एक्स्प्रेस वे बांधला. मात्र, त्या उद्घाटन करू शकल्या नाहीत कारण पुढच्याचं २०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या सरकारच्या हातातून सत्ता गेली.
मायावतींनी बांधलेल्या या यमुना एक्स्प्रेस वेचे उद्घाटन २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणाऱ्या समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते झाले. म्हणजे मायावतींचं मार्केट अखिलेश यादवांनी खाल्लं, पण महत्वाचं म्हणजे एक्सप्रेस वेचा एवढा मोठा प्रकल्प हाती घेऊनसुद्धा मायवतींची सत्ता घेतली.
पुढे अखिलेश यांनी यूपीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक्स्प्रेस वेचे जाळे टाकण्याच्या दृष्टीकोनातून काम पुढे नेले. यमुना एक्सप्रेस वेसमोर त्यांनी आग्रा ते लखनऊ असा विभाग बांधला आणि त्यावर नवीन एक्सप्रेस वे बांधण्याचे काम सुरू केले. अखिलेश यांनी आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेचा पायाच घातला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी म्हणजे २०१६ मध्ये त्याचे उद्घाटनही केले.
अखिलेश यादव यांचे वडील आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसापूर्वी आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेचे उद्घाटन झाले आणि त्यावर हालचाली सुरू झाल्या. पायाभरणी आणि उद्घाटनाचे काम अखिलेश यांनी केले खरे, पण त्यांच्यासाठी पुढचा निवडणुकीचा निकाल मायावतींसारखाच लागला आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वे अखिलेश यांची सत्ता वाचवू शकला नाही.
आता जे आधी घडलं त्याचीच पुनरावृत्ती झाली, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत धडाकेबाज एन्ट्री मारत भाजपने एक्स्प्रेस वेच्या बांधकामाचे काम सुरू ठेवले. राजधानी लखनऊ ते बिहारच्या सीमेवरील गाझीपूरपर्यंत त्यांनी एक्सप्रेस वे बांधला.
आता देशातील सर्वात लांब पूर्वांचल एक्स्प्रेस वेच्या पायाभरणीवरून समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपचे म्हणणे आहे की, पूर्वांचल एक्स्प्रेस वेचा पाया त्यांच्या सरकारने घातला आहे. तर अखिलेश यादव यांनी ट्विट त्यांच्या सरकारच्या काळात म्हणजे २२ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी या एक्स्प्रेस वेची पायाभरणी केल्याचं म्हटलंय. यासाठी त्यांनी ट्विटरवर पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या पायाभरणीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्यासह काही वरिष्ठ सपा नेते दिसत आहेत.
एक तस्वीर इतिहास के पन्नों से : जब समाजवादियों ने किया था, पूर्वांचल के आधुनिक भविष्य के मार्ग का शिलान्यास।
जिसने उप्र व पूर्वांचल के विकास का नक़्शा खींचा वो बीता कल हमारा था और अब ‘नव उप्र’ के लक्ष्य को लेकर चल रहा कल भी हमारा ही होगा…
यूपी का विकास होगा
बाइस में बदलाव होगा pic.twitter.com/kCDV4ZtI17— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 15, 2021
फ़ीता आया लखनऊ से और नयी दिल्ली से कैंची आई
सपा के काम का श्रेय लेने को मची है ‘खिचम-खिंचाई’आशा है अब तक अकेले में बैठकर लखनऊवालों ने ‘समाजवादी पूर्वांचल एक्सप्रेसवे’ की लंबाई का आँकड़ा रट लिया होगा।
सपा ‘बहुरंगी पुष्पवर्षा’ से इसका उद्घाटन करके एकरंगी सोचवालों को जवाब देगी। pic.twitter.com/AeHDiJYTuH
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 16, 2021
खरं तर, मे २०१५ मध्ये अखिलेश सरकारने लखनऊ -आझमगड-बलिया एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. २०१७ मध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर या एक्स्प्रेस वेचा मार्ग बदलून लखनऊ -आझमगड-गाझीपूर असा करण्यात आला. त्यानंतर १४ जुलै २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्स्प्रेस वेची पायाभरणी केली. अखिलेशप्रमाणेच योगी सरकारने पायाभरणी केलेल्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले.
आता या सगळ्या घटनांकडे जर आपण बारकाईने पहिले तर एक गोष्ट जरूर लक्षात येईल कि, एक्स्प्रेस-वे बांधणारं सरकार पुढच्या निवडणुकीत आपटत, आणि त्यांचं मार्केट पुढचं सरकार खातं. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ हा पराभवाचा ट्रेंड फोडू शकतील का? असा प्रश्न निर्माण झालाय.
पण तुमच्या माहितीसाठी देशातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यात पूर्वांचलचा मोठा वाटा आहे. कारण पूर्वांचलच्या ११७ जागा निवडणुकीत कोणाचंही पारडं जड करू शकतात आणि कोणालाही खाली आपडू शकतात. याच उदाहरण म्हणजे मायावती सरकार.
ज्यांनी २००७ मध्ये पूर्वांचलमध्ये मोठा विजय मिळवला तेव्हा मायावती पहिल्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार बनवण्यात यशस्वी ठरल्या. यांनतर २०१२ला अखिलेश यादव आले आणि सत्ता मिळवून गेले. पण २०१७ ला मात्र पूर्वांचलमधील जनता भाजपच्या पाठीशी उभी होती आणि निकाल आपल्यासमोर आहे.
कारण सध्या योगी सरकार देशाला आकर्षित करणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेस वेवर काम करत आहे. ज्याची पायाभरणी अखिलेश यांनी केली होती. आणि जे मायावती म्हणा किंवा अखिलेश यादव यांच्यासोबत घडलं, तेच आता योगी यांच्यासोबत घडणार का चित्र बदलणार? यासगळ्या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या निवडणुकीचा निकालच सांगेल.
हे ही वाच भिडू :
- हैद्राबादचं जावुदे, अजय सिंग बिश्टचे योगी आदित्यनाथ कसे झाले ते वाचा..
- योगी आदित्यनाथांच्या गोरखनाथ मठापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..
- असा कोणता प्रोटोकॉल आहे भिडू की, योगी पंतप्रधानांच्या गाडीच्या मागे चाललेत..