‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ ही प्रार्थना गाणाऱ्या गायिकेला आज पेन्शनसाठी झगडावं लागतंय
एकदा एका गाण्याच्या कार्यक्रमाला जाणं झालं. खास मराठमोळ्या गीतांचा तो कार्यक्रम होता. स्टेजवर नवोदित कलाकार आणि पहिल्या रांगेत बरेच ज्येष्ठ आणि मुरलेले कलाकार बसले होते. कार्यक्रम आटोपला पण मी जरा तिथंच घुटमळत राहिले. फॉर्मलिटी म्हणून का होईना गायकांशी दोन शब्द बोलावे, त्यांचं कौतुक करावं म्हणून स्टेजजवळ गेले, तर तिथं एक आजी स्टेजवरच्या नवोदित गायिकेला सांगत होत्या..
‘तुझ्या गळ्यात गाणं आहे, प्रसिद्धी मिळत नाही म्हणून गाणं सोडू नको.’
नंतर त्याच आजींना टीव्हीवर एका न्यूज चॅनलवरच्या मुलाखतीत आपल्या आयुष्याची व्यथा मांडताना पाहिलं…
इतनी शक्ती हमे दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना… शाळा कॉलेजांमधल्या स्पीकर्सपासून मोबाइलच्या रिंगटोनपर्यंत सगळीकडे वाजणारी ही प्रार्थना, आजही हमखास आपल्या कानावर पडते. एरवी दिवसभर थट्टामस्करी आणि दंगा करणारी पोरं, ही प्रार्थना लागली की गपगुमान हात जोडून, डोळे मिटून उभी राहतात, एवढी ताकद या गाण्याच्या सुरांमध्ये, शब्दांमध्ये आणि गाणाऱ्या गायिकेच्या गळ्यात आहे.
त्या कार्यक्रमात भेटलेल्या, न्यूज चॅनेलला मुलाखत देणाऱ्या आजी म्हणजेच हे अजरामर गाणं गाणाऱ्या गायिका, पुष्पा पागधरे.
हे गाणं माहीत नाही असं कधी होत नाही, पण दुर्दैवानं हे गाणं गायलेल्या गायिकेचं नाव मात्र कुणालाच माहीत नसतं.
पुष्पा पागधरे ह्या माहेरच्या पुष्पा चामरे.
त्यांचा जन्म १५ मार्च १९४३ साली झाला. पुष्पा यांचं मूळ गाव सातपाटी. वडिलांचं नाव जनार्दन चामरे आणि आईचं जानकी चामरे. त्यांचं शालेय शिक्षण सातपाटीतच झालं. आपल्या वडिलांसोबत त्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये वरचेवर भाग घ्यायच्या.
पण पुष्पा यांना गाण्यातला पहिला ‘सा’ लावायला शिकवला, तो त्यांच्या शाळेतल्या मास्तरांनी. त्यांचं नाव आर. डी. बेंद्रे. पुष्पा या कोळी समाजाच्या. त्याकाळी कोळी समाजातल्या किंवा कुठल्याच समाजातल्या मुलामुलींनी नाच-गाण्याचं शिक्षण घेणं म्हणजे पाप समजलं जात होतं. त्यामुळे पुष्पाताईंनाही गाण्याचं रीतसर शिक्षण घेणं तसं सोप्पं नव्हतं. पण त्यांनी हार मानली नाही.
एक दिवशी सातपाटीच्या शाळेतल्या भिकाजी नाईक या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई ‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला’ हे गाणं गायल्या. त्यांचा सूर ऐकून प्रेक्षकांच्या रांगेत बसलेले तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर यांनी, त्यांच्या गळ्यातला पक्का सुर हेरून त्यांना मुंबईला यायला सांगितलं. आणि तिथूनच पुष्पाताईंच्या संगीतमय प्रवासाला सुरवात झाली.
आपल्या वडिलांसोबतच पुष्पाताई मुंबईला आल्या. त्यांची भेट संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली. त्यांनीच मग पुष्पाताईंची भेट अब्दुल रहेमान खाँसाहेब यांच्याशीही घडवून दिली. अब्दुल रहेमान खाँसाहेब यांच्याकडे त्यांनी गझल आणि ठुमरीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुष्पाताई गायक आर. एन. पराडकर यांच्याकडून भजनं, भक्तिगीतं आणि गोविंद पोवळे यांच्याकडून इतर प्रकारचं सुगम संगीत शिकल्या.
पुढे त्यांनी ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’, ‘राया मला पावसात नेऊ नका’, ‘अगं पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी’, ‘ नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी’ अशी सुमारे ५०० हून अधिक लोकप्रिय गाणी गायली. मराठीत तर गायलीच प सोबतच हिंदी, गुजराती, बंगाली, भोजपुरी, मारवाडी अशा भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली.
पुष्पाताईंनी अशोक पत्की, ओ.पी. नय्यर, बाळ पळसुले, यशवंत देव, राम कदम, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, स्नेहल भाटकर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं.
त्यांच्या आयुष्यातला माईलस्टोन म्हणजे १९८६ साली आलेल्या ‘अंकुश’ सिनेमातलं ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणं.
तुम्ही आज युट्यूबवर जाऊन ‘itni shakti’ एवढं जरी टाइप केलंत, तरी रिझल्ट्समध्ये तुम्हाला ‘इतनी शक्ति हमे दे न दाता’ या गाण्याचे अनेक कव्हर सॉंग्स दिसतील, प्रत्येक कव्हरला मिलिअन्समध्ये व्यूज दिसतील…
पण हे गाणं पुष्पा ताईंनी २५० रुपये घेऊन रेकॉर्ड केलं होतं.
त्यांनी गायलेल्या ओरीजिनल गाण्यालाही युट्यूब वर ११ मिलियन व्ह्यूज आहेत. खरंतर युट्यूबवरचे हे व्ह्यूज एकत्र जरी केले, तरी पुष्पाताईंना करोडोंच्या घरात पैसे मिळू शकतात, पण परिस्थिती अशी आहे, की महिन्याचं अवघ्या ३१५० रुपयांचं पेन्शनही त्यांना सरकारकडून वेळच्या वेळी मिळत नाही.
इतकी लोकप्रिय झालेली गाणी गाऊनही पुष्पाताईंकडे ना त्यांच्या कुठल्या गाण्याची रॉयल्टी आहे, ना रॉयल्टीसाठी भांडण्याची ताकद आहे, ना पैश्यांचं पाठबळ आहे आणि ना माणसांचा आधार आहे.
त्यांच्या मुलाखतीतही त्या गाण्याविषयी कमी आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या सोयीविषयीच जास्त बोलत होत्या. आता वयाच्या ८० व्या वर्षी त्या माहीमच्या मच्छिमार कॉलनीत एकट्या राहतात. अशावेळी देवाकडे त्यांनीच गायलेली त्यांचीच प्रार्थना त्यांच्यासाठीच म्हणावी वाटते.
गणितात बाकी शून्य आली की आपल्याला हायसं वाटतं. गणित सोडवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचं फळ झालं असं वाटतं, पण पुष्पाताईंसारख्या इतक्या मोठ्या गायिकेच्या आयुष्याचं अख्खं गणित चुकूनही, बाकी शून्य आहे.
हे ही वाच भिडू:
- एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यातील अनेक वर्षांचा वाद पंचमदांनी एका गाण्यातून मिटवला होता…
- १६ वर्षांच्या आशा भोसलेंनी घरच्यां विरोधात बंड पुकारून लतादीदींच्या सेक्रेटरीशी लग्न केलं
- लता मंगेशकरांनी खरंच सुमन कल्याणपूर यांचं करीयर संपवलं होतं?