पुतीनने कोरोनाची लस शोधली पण त्याला नेमकी पोरबाळं किती याचा शोध लागायचाय

व्लादिमिर पुतीन म्हणजे जगाच्या राजकारणातला सगळ्यात वांड माणूस. कोरोनाची लस येणार येणार म्हणून जगभरात लढाया चालल्या आहेत. एका वर्षात लस आणणार, सहा महिन्यात लस आणणार यांचे दावे सुरु आहेत आणि या पठ्ठ्याने काल आम्ही लस बनवली म्हणून डीक्लेर केलं.

नुसता कोरोनाची लस सापडली म्हणून सांगितल नाही तर आपल्या लाडक्या मुलीवर त्याचा पहिला प्रयोग देखील केला.

मामू कहाणी सुनाते रहे और लडके ने चांद को छु भी लिया

डोनाल्ड तात्या, क्षी जिनपिंग, आपले मोदीजी, किम जोंग उंग तात्या अनेकांनी प्रयत्न केला पण  खोल समुद्राचा जसा अंदाज येत नाही तस पुतीन साहेबांची खेळी कधी कोणाला कळली नाही. रशिया सारख्या देशाचं आणि जगाचं राजकारण गेली वीस वर्षे आपल्या भोवती फिरवत ठेवणाऱ्या पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायमच एक गूढतेचं वलय राहिलंय.

आपल्या करीयरची सुरवात ‘केजीबी’  या  गुप्तहेर  संघटनेचे एजंट म्हणून केलेल्या पुतीन यांनी सुमडी मध्ये कोंबडी कस करायचं हे तेव्हाच शिकून घेतलं. त्यांचे प्रत्येक निर्णय खुद रशियामध्ये अनेकांना बुचकाळ्यात पडणारे असतात.

एवढच काय तर त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल देखील कमालीची गुप्तता राखलीये.

आता त्यांनी कोरोनाची लस आपल्या मुलीला दिली म्हणतात पण कोणत्या मुलीला हे संगीत; नाही. एवढच काय त्यांना नेमक्या मुली किती हे देखील कधी कोणाला स्पष्ट माहित नाही. पुतीन यांनी आपलं कुटुंब एखाद्या रहस्यासारखं गुप्त ठेवलंय.

तरी जेवढी माहिती आम्हाला सापडली ती भिडू वाचकांपुढे ठेवतो.

२७ जुलै १९८३ रोजी व्लादिमिर पुतीनच ल्युडमिला नावाच्या मुलीशी लग्न झाल. पुतीन तेव्हा केजीबीसाठी अंडर कव्हर म्हणून इस्ट जर्मनीमध्ये होता. तो आणि त्याची नवी बायको रशियन ट्रान्सलेटर म्हणून काम करायचे. पण पूर्व जर्मनीमध्ये गुप्तहेर म्हणून पुतीनने काय काय गोंधळ घातला हे कधीच कळू शकल नाही.

जर्मनीमध्ये असतानाच पुतीन दाम्पत्याला दोन मुली झाल्या पण मिशनवर असल्यामुळे पुतीनने बाहेरच्यांना ही बातमी कळू दिली नाही. पुढे राजकारणात आल्यावर ही अनेक वर्ष ही माहिती गुप्त होती. पण आपल्या सारखे शोध पत्रकार म्हणजे केजीबीचे पण बाप असतात. त्यांनी अनेक वर्ष फिल्डिंग लावून लावून माहिती काढली.

पुतीनच्या पहिल्या मुलीचं नाव मारिया तर दुसऱ्या मुलीचं नाव कॅटरीना.

यातल्या कॅटरीनाची माहिती सर्वप्रथम समोर आली. प्रोफेशनल रॉक अँड रोल डान्सर असणारी  कॅटरीना पुतीन यांची मुलगी आहे हे कळल्यावर अनेकांना धक्का बसला. कॅटरीना ने तिखनोवा हे तिचं आजोळचं नांव सर्वत्र वापरल होतं.

२०१३ सालच्या अकरोबिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कॅटरीना पाचवी आली. पुढे तिने किरील शाम्लोव्ह या रोशिया बँकेच्या मालकाच्या मुलाशी लग्न केलं. ती सध्या मॉस्को युनिव्हर्सिटीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टीटयूटची प्रमुख म्हणून काम करते. 

अनेक जण कॅटरीना ही पुतीन यांची मुलगी असल्याचं सांगत असले तरी या गोष्टीला देखील अधिकृत पुष्टी नाही. अनेक जणांनी अनेकवेळा तसे दावे केले, पण कुणीही एकदा केलेल्या दाव्यावर ठाम राहू शकलेलं नाही.

ही झाली धाकटी. गेल्या काही दिवसात पुतीनच्या थोरल्या लेकीची म्हणजे मारियाची माहिती समोर आली.

मारिया कॉलेजमध्ये लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. मॉस्को विद्यापीठातून तिने मेडिकलचं शिक्षण घेतलं. मॉस्कोच्याच इंडोक्रीनोलॉजी सेंटर मध्ये ती पीएचडी स्टुडंट आहे. तिचं जॉरीट फॅसन नावाच्या डच उद्योगपतीशी लग्न झालय. अर्थात ही माहितीही अशीच सूत्रांच्या आधारेच.

पुतीन जे सांगतायत की माझ्या मुलीवर कोरोनाच्या लसीची चाचणी झाली ती मुलगी म्हणजे मारियाच असण्याची शक्यता आहे.

आता या झाल्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुली. पुतीन साहेबांनी दुसर लग्न देखील केलं आहे अस म्हणतात. ही बातमी सुद्धा कशी बाहेर आली याची एक गंमत आहे. 

झाल असं २००९ साली मॉस्कोव्ह्स्की करसपॉंडट नावाच्या एका वृत्तपत्राने बातमी छापली की, पुतीन हे त्यांच्या बायकोला घटस्फोट देऊन एका आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टशी लग्न करणार आहेत. त्यावेळी त्या बातमीचं खंडन करण्यात आलं.

परंतु त्यानंतर काही दिवसातच बातमी देणारं वृत्तपत्र बंद पडलं.

आलीना काबाएव्हा हे या जिम्नॅस्टचं नाव. सर्वात सुंदर रशियन स्त्रियांच्या यादीत तीच नाव झळकत होतं. रशियाला तिने जिम्नॅस्टिकमध्ये ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवून दिले आहे, ९ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप, १५ वेळा युरोपियन चॅम्पियनशिप जिंकणारी सेलिब्रिटी स्पोर्ट्सस्टार अलीना साधारण २००५ साली राजकारणात आली.

२००७ साली तिने रशियन लोकसभेची निवडणूक देखील जिंकली. याच दरम्यान आपल्या पेक्षा वयाने ३० वर्षांनी मोठ्या असलेल्या व्लादिमिर पुतीन यांच्याशी तिची ओळख वाढली असण्याची शक्यता आहे.

२००८ साली पुतीन यांनी तिला रशियाचा नॅशनल मिडिया ग्रुपचा अध्यक्ष केलं.

तेव्हा पासूनच तिच्या बद्दलच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या. पुतीन यांची दहशतच इतकी की तसा दावा करणाऱ्या बहुतांश जणांनी नंतर पलटी मारली, त्यांनी एक तर आपला दावा मागे घेतला किंवा पुतीन यांनी संबंधितांच तोंड बंद केलं

२०१३ मध्ये पुतीन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच ल्युडमिला पुतिना हिला घटस्फोट दिला. पण दुसर लग्न करत आहोत किंवा केलय हे काही जाहीर केलं नाही.

 २०१३ साली अलीना प्रेग्नंट असल्याच्या वावड्या उठल्या तेव्हा तिने मिडिया समोर येऊन तस काही नसल्याचं सांगितल होतं. तरीही २०१५ साली स्वित्झर्लंड येथे एका व्हीआयपी रुग्णालयात अलीनाने पुतीन यांच्या बाळाला जन्म दिला आहे अस खात्रीलायक सूत्रांच म्हणण आहे.

आता पुतीन आपल्या लग्नाच्या बायकोपासून झालेल्या मुलींचं नाव सांगत नाहीत तर या साठीत झालेल्या लग्नाबाहेरच्या संतानाचे नाव जाहीर कसे करतील?

मध्यंतरी अलीना एका आईस स्केटिंग मचवेळी दोन लहान मुलांसोबत दिसली. आता ही दोन्ही मुले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीनची आहेत असा अमेरिकी माध्यमांचा दावा आहे. 

कौटुंबिक आयुष्यातील गुप्ततेबाबत ज्यावेळी पुतीन यांना छेडलं जातं, त्यावेळी ते सांगतात की,

“आपल्या कुटुंबीयांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता यावं, सेलिब्रिटी असण्याचं प्रेशर त्यांच्यावर असू नये म्हणून ही काळजी घेतली जाते.”

बाकी काही असो, जगात कशालाही न घाबरणारा, वाघाशी कुस्ती खेळणारा, मनात आणलं तर दोन चार अतिरेकी स्वतःच धरून आपटू शकणारा, कोरोनाची लस बनवणारा टग्या माणूस आपल्या पर्सनल लाईफ बद्दल मात्र जरा  जास्त घाबरून असतो हे मात्र खरं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.