पुतीन यांना आजही त्यांच्या स्वप्नातला सोव्हिएत रशिया पुन्हा उभा करायचा आहे.

“कधीकधी तर मला रात्रीची टॅक्सी चालवावी लागली होती. बोलायला बरं वाटत नाही पण दुर्दैवाने हे देखील घडलं होतं “

सोव्हिएत रशियाचे विघटन आणि त्यांनतर ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीतील आपल्या अनुभवाबद्दल पुतीन बोलत होते. कधीकाळी जगात दहशत असलेल्या KGB ये गुप्तचर संस्थेच्या एक प्रमुख हेराला जेव्हा उदरनिर्वाहासाठी अपमानित होऊन टॅक्सी चालवावी लागते हे पुतिनच्या एका शब्दा शब्दातून दिसून येतं होतं.

”१००० वर्षांपासून आम्ही जे घडवलं होतं ते धुळीस मिळालं. नवीन स्वतंत्र देशामध्ये पंचवीस दशलक्ष रशियन नागरिक आपल्या मायभूपासून तोडले गेले”

सोव्हिएत विघटन होऊन दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी लोटला होता पण पुतीन मात्र २०२१ -२२ उजाडलं तरी ते विसरायला तयार नव्हते.

१९५२ मध्ये लेनिनग्राडमध्ये जन्मलेले पुतीन सोव्हिएत युनियनच्या सुवर्ण युगात वाढले.

दुसऱ्या महायुद्धातला विजयानंतर महासत्ता झालेल्या सोविएत रशियाच्या स्पुटनिक, हायड्रोजन बॉम्ब, युरी गागारिन या सर्व अचिएव्हमेंट्स बघत पुतीन मोठे झाले.

सोव्हिएत नागरिक शांतता आणि समृद्धीचा आनंद घेत होते. जीवन स्थिर होते. आर्थिक सुबत्ता होती. अक्ख्या जगात सोव्हिएत रशियाचा दरारा होता.

मात्र ९०च्या दशकात सोव्हिएतच्या सुबत्तेला आहोटी लागली. एक-एक देश सोव्हिएत रशियापासून तुटून पडत होता. रशियाची ना पहिल्यासारखी ऐट राहिली होती ना दरारा.

….आणि १६ ऑगस्ट १९९९ मध्ये  जेव्हा रशियाच्या पंप्रधानपदी पहिल्यांदा निवड झाली तेव्हापासून पुतीन यांनी वेळो वेळी ही सल बोलून दाखवली आणि संधी मिळताच त्यादिशेने पावलंही टाकली. सध्याचं पुतीन यांच्या युक्रेनवरील आक्रमणातून हीच बाब पुन्हा अधोरोखित झाल्याचं जाणकार सांगतात.

त्यामुळं सोव्हिएत रशिया पुन्हा उभारण्याचं स्वप्न पुतीन सातत्यात आणणार का मुद्दा पुन्हा चर्चिला जाऊ लागला आहे.

लेनिनच्या नेतृत्वात झालेल्या समाजवादी क्रांतीनंतर स्थापना झाले सोव्हिएत रशिया. नंतरच्या काही दशकांमध्येच सोव्हिएत युनियन जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली देशांपैकी एक बनले आणि ते शिखरावर असताना त्यात १५ प्रजासत्ताकांचा समावेश होता. मात्र सोव्हिएत युनिअनच्या डिसइंटिग्रेशन नंतर हे देश बाहेर पडले.

आज या देशांचे रशियाशी कसे संबंध आहेत?

जे देश सोव्हिएत रशियापासून वेगळे झाल्यात त्या देशांवर आजही रशियाचा मोठा प्रभाव आहे आणि रशिया वेळोवेळी या देशांमध्ये हस्तक्षेप करतो. हा प्रभाव आपण तपशीलवार बघू.

कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्सची (CIS)चे मेंबर असलेलं देश..

८ डिसेंबर १९९१ ला  सोव्हिएतचे तीन नेत्यांनी बेलावेझा करारावर स्वाक्षरी केलीआणि यूएसएसआर यापुढे अस्तित्वात नसल्याची घोषणा केली. त्यात रशियाचे अध्यक्ष बोरिस याल्टीन, युक्रेनचे अध्यक्ष लिओनिद क्रावचुक आणि बेलारूसी पंतप्रधान व्याचेस्लाव केबिच यांचा समावेश होता. 

त्यावेळी  कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्सची (CIS) स्थापना केली गेली. आज माजी सोव्हिएत प्रजासत्ताकांपैकी नऊ सदस्य आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, कझाकिस्तान,किर्गिस्तान, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे पूर्णपणे आणि तुर्कमेनिस्तान हा सहयोगी हा CIS चा सहयोगी सदस्य आहे. या देशांवर रशियाचा प्रचंड प्रभाव आहे.

अमेरिका आणि युरोपच्या नाटोसारखं रशियाचं पण मिलिटरी अलायन्स आहे.

आर्मेनिया, बेलारूस, कझाकस्तान, किर्गिस्तान हे देश रशियाबरोबर कलेक्टिव्ह सेक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन (CSTO) या मिलिटरी आलायन्सचा भाग आहेत. 

यातील अर्मेनियाचा विषय सोडला तर बाकी सर्व देशात २०-२५ वर्षे सलग राज्य करणारे हुकूमशहा आहेत. जेव्हा जेव्हा या देशांमध्ये तहुकूमशाला उलथून टाकण्यासाठी आंदोलनं होतात रशिया त्यांच्या मदतीला धावते.

जानेवारीमध्ये जेव्हा कझाकस्तानचे राष्ट्रअध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्या विरोधात आंदोलन झालं  होतं तेव्हा रशियाने पिसकीपर्स या गोंडस नावाखाली २ हजार ५००  सैन्य रशियाने तझाकिस्तानमध्ये उतरवलं होतं. तीन दशकांपासून सत्तेत असणाऱ्या बेलारूसचा अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यालाही रशिया अशीच वेळोवेळी मदत करत आहे.

नाटो जॉईन केलेले देश ..

सोव्हिएत रशियामधून बाहेर पडलेल्या लॅटव्हिया, लिथुआनिया आणि एस्टोनिया या तीन बाल्टिक देशांनी नाटो जॉईन केलं आहे.  रशियाशी बॉर्डर असणाऱ्या या तीन देशांनी नाटो जॉईन केल्याने रशिया यांच्यावर अजूनच चिडलेला आहे. असोशिएट प्रेसच्या बातमीनुसार युक्रेनवर झालेल्या हल्यांनंतर या देशांना चांगलंच कापरं भरलं आहे. युक्रेनच्या हल्यांनंतर आपलाच नंबर असल्याच्या भीतीने या देशांनी आधीच नाटोच्या सदस्य देशांकडे मदतीची याचना केली आहे.

आता उरले युक्रेन आणि जॉर्जिया …

युक्रेन आणि जॉर्जिया यांना २००८ मध्येच नाटो जॉईन करण्याची ऑफर होती.

..पण त्याच वर्षी रशियाने दक्षिण ओसेशिया आणि अबखाझिया या दोन प्रांताचा संरक्षण करण्याच्या नावाखाली जॉर्जियात सैन्य घुसवलं होतं. म्हणजे आत जे युक्रेनमध्ये करतायेत ते पुतीन यांनी आधी जॉर्जियात केलेलं आहे. तर २०१४ मध्ये रशियाने युक्रेनचा क्रिमिया बळकावला होता. कोणत्याही परिस्थितीत या देशांनी नाटो जॉईन करू नये यासाठी रशिया नेहमी सजग राहतं. अनेकवेळा या देशांमध्ये रशिया समर्थित सरकारं पुतीन यांनी बसवली आहेत. 

अगदी २०१४ पर्यंत युक्रेनमध्ये प्रो-रशियन सरकार होतं.

म्हणजे एकंदरीत नाटो जॉईन करणाऱ्या तीन देशांचा अपवाद सोडल्यास रशियाने बाकीच्या सोव्हिएत देशांवर आपला दबदबा कायम राखला आहे.

पुतिन यांनी याआधी काही सोव्हिएत चिन्हे रिस्टोर केली आहेत. त्यांनी सोव्हिएत राष्ट्रगीत आणि सोव्हिएत प्रतीके परत आणली आहेत आणि दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत विजयाची प्रशंसाही वेळोवेळी केलेली आहे.

इथं हे लक्षात घेणं इंटरेस्टिंग आहे की,

कीवच्या दिशेने येणाऱ्या रशियन रणगाड्यांवर सोव्हिएत युनियनचे ध्वज फडकताना दिसला होता.

त्यामुळे पुतिन यांच्या मनात काय आहे याची कुणालाही शंका नसावी.

मग खरंच पुतीन यांना सोव्हिएत पुन्हा प्रस्थपित करायचं आहे का ?

होय ..

पण पुतीन यांना सोव्हिएतच्या काळात रशियन साम्राज्याचा जो पसरा होता तो पुन्हा मिळवायचा ना की विचारधारा. युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधीच्या भाषणात पुतीन यांनी युक्रेनच्या प्रॉब्लेमला सोव्हिएतचा फाउंडर असलेल्या लेनिनला जिम्मेदार धरलं आहे.

मी या वस्तुस्थितीपासून सुरुवात करेन की, आधुनिक युक्रेन संपूर्णपणे रशियाने किंवा अधिक अचूकपणे बोल्शेविक, कम्युनिस्ट रशियाने तयार केले आहे. लेनिन आणि त्याच्या सहकार्यांनी तिथे रहाणाऱ्या लाखो रशियन लोकांशी अत्यंत कठोरपणे वागवत, त्यांचं मत विचारात नं घेता त्यांना रशियापासून वेगळं केलं.

युक्रेनवर हल्ला करण्याच्या अगोदर पुतीन यांनी राष्ट्राला संबोधित करताना ही विधानं केली आहेत.

मग या देशांवर दावा सांगण्यासाठी पुतीन कोणतं लॉजिक देत आहेत ..

सोमवारी रशियाला उद्देशून केलेल्या याच भाषणातील लाईन्स यावर प्रकाश टाकतात.

”मी पुन्हा जोर देऊ इच्छितो की, युक्रेन हा आपल्यासाठी फक्त शेजारी देश नाही. हा आपल्या  इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आध्यात्मिकतेचा अविभाज्य भाग आहे. हे आमचे कॉम्रेड आहेत, जे आम्हाला सर्वात प्रिय आहेत – केवळ सहकारी, मित्र आणि एकेकाळी देशाची एकत्र सेवा करणारे लोकच नाहीत तर रक्ताच्या नात्याने बांधलेले, कौटुंबिक नात्याने बांधलेले लोक देखील आहेत. प्राचीन काळापासून, ऐतिहासिकदृष्ट्या रशियन भूमी असलेल्या दक्षिण-पश्चिम भागात राहणारे लोक स्वतःला रशियन आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन म्हणतात.”

म्हणजेच पुतीन भाषा, संस्कृती, इतिहास आणि धर्म यांचा हवाला देउन या देशांवर आपला दावा सांगत आहे. ऑल द वर्कर्स ऑफ द वर्ल्ड शुल्ड यूनाइट ..या कम्म्युनिस्टानी सोव्हिएत रशियाच्या स्थापनेच्या वेळी दिलेल्या नाऱ्यांपेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे.

त्यामुळं पुतीन यांना क्षेत्रपळानुसार तरी स्वप्नातला सोव्हिएत रशिया करायचा आहे एवढं नक्की.

हे ही वाच भिडू..

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.