टायरवर चालणाऱ्या नाशिकच्या मेट्रोची अशी आहेत ‘७’ वैशिष्ट्ये

आज सकाळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत नाशिक मेट्रोला तब्बल २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोला ५९७६ कोटींची तरतूद केली.

आता अर्थमंत्री इथं नुसती पैशांची घोषणा करून थांबल्या नाहीत तर त्यांनी नाशिकच्या मेट्रोचं भरभरून कौतुक केलं, आणि हा प्रकल्प देशपातळीवर स्वीकारत असल्याची घोषणा केली.

आता देशाच्या अर्थमंत्र्यांनी सगळ्या जगासमोर नाशिकच्या मेट्रोचं कौतुक केल्यावर साहजिकच प्रश्न सुरु झाले. अजून ही मेट्रो सुरु होणं लांब पण तयार होण्याच्या आधीच हे एवढं काय विशेष आहे रे? त्यावर नाशिककरांनी लगेचच त्याची वैशिष्ट्ये, ती कशी चांगली आहे, हे सांगायला सुरुवात केलीय. तीच आम्ही तुमच्यासाठी आणलेत.

तर नाशिककर सांगत असलेली त्यांच्या मेट्रोची ७ वैशिष्ट्ये खास बोल भिडूंच्या वाचकांसाठी.  

१. रस्त्यावर धावणारी देशातली पहिली रेल्वे :

नाशिकमध्ये येत असलेल्या मेट्रोचे कोचेस, सोयीसुविधा, स्टेशन, सिग्नल यंत्रणा हे सगळं सेम टू सेम मेट्रोसारखंच असणार आहे. फरक फक्त हा की इतर मेट्रो कोचेस रुळावरून धावतात, तर नाशिकच्या मेट्रोचे कोच रबरी टायरवर चालणार आहेत. त्याच कारण म्हणजे या मेट्रोची चाकं धातूची नाही, तर आपल्या सर्वसामान्य गाड्यांप्रमाणे रबराची असतील.

पूर्ण जगात इलेक्ट्रिक बसेस चालतात. कोच असलेल्या इलेक्ट्रिक ट्रामही रस्त्यावर चालतात. पण मेट्रोसारख्या सर्व सोयीसुविधा असलेली टायरबेस मेट्रो असलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे.

२. कमी प्रवाश्यांसाठी उपयुक्त 

भारतात ज्या काही शहरांमध्ये मेट्रो आहेत ती सगळी पहिल्या श्रेणीमधल्या शहरांमध्ये आहेत, तिथं गर्दीच्या वेळी तासाला साधारणपणे ५ ते १५ हजार लोक प्रवास करतात. पण नाशिकची जी मेट्रो आहे त्यात तासाला ५ ते १५ हजार प्रवासी संख्या असली तरी चालू शकणार आहे. नाशिकची सध्याची लोकसंख्या २३ लाख आहे.

३. रस्त्यावरून धावणार असली तरी स्वतंत्र मार्ग  

नाशिकच्या मेट्रोचे कोच रस्त्यावरून धावणार असले तरी स्वतंत्र एलिव्हेटेड मार्ग असणार आहेत. ज्यामुळे भविष्यकाळात लोकसंख्या वाढल्यानंतर अस्तित्वात असलेल्या मार्गावर रेल्वे रूळही टाकता येतील ज्यावरून मेट्रो धावू शकते.

४. कमी खर्चात ३२ किलोमीटरची मेट्रो :

नाशिक मेट्रोचे सुरुवातील दोन कॉरिडोर असणार आहेत. यात पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका असून हा १० किलोमीटरचा मार्ग आहे. त्यात १० स्टेशन असणार आहेत. तर गंगापूर ते नाशिक रेल्वे स्टेशन असा दुसरा कॉरिडोर असून हा २२ किलोमीटरचा मार्ग आहे. त्यात १९ स्टेशन असणार आहेत.

मेट्रोच्या इतर प्रकल्पांना २५० ते ४०० कोटी रुपये प्रति किमी खर्च येतो. पण या नवीन प्रणालीची किंमत अंदाजे ६० कोटी रूपये प्रति किमी असेल.

५. फिडर रूट 

मेट्रो मार्गाच्या व्यतिरिक्त शहरात दोन फीडर रूट असतील. फीडर रूटवर बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक बसेस चालतील. साधारणपणे मेट्रो सेवा नसलेल्या किंवा जिथं मेट्रोचं जाळं उभारणं शक्य नाही अशा २२ किलोमीटरच्या भागात या बसेस प्रवासी वाहतूक करतील.

६. ९० टक्के प्रवासी वाहतूक शक्य 

नाशिकच्या नियोजित दोन मेट्रो, दोन फीडर रूटद्वारे एकूण ९० टक्के प्रवासी वाहतूक शक्य असल्याचं महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

७. अपघात आणि प्रदूषण विरहित

दोन मेट्रो साठी स्वतंत्र मार्गांची तरतूद असल्यामुळे अपघात होण्याचा धोका शून्य तर फिडर रूट वरील बस मुख्य कॉरिडॉरवरून जाताना चार्ज होतील, स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज राहणार नाही. तसेच त्यामुळे प्रदूषणाचा धोका अजिबातच नाही.

ही ७ वैशिट्ये असल्यामुळेच कदाचित नाशिककर अभिमानाने भविष्यातील मेट्रोची आताच वैशिट्ये सांगत आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.