क्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांची ओळख छ. शाहू महाराजांनी करुन दिली
गेले वर्षभर झालं कोरोना आपल्या जीवनाचा भाग बनून गेला. बाधितांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. पुण्या मुंबईतून आलेल्या व्यक्तिंना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे तर कोरोनाबाधित व्यक्तिंना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात येत.
आज हे शब्द काही जणांना नवीन वाटत आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का या दोन शब्दांची ओळख सर्वात पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी करून दिली.
मुंबई पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा शाहू महाराजांनी जी उपाययोजना राबवली त्यामध्ये लोकांना क्वारंटाईन करणं आणि आयसोलेशन करणं महत्वाचं होतं. त्याचाच परिमाण म्हणजे आजही कोल्हापूरात आयसोलेशन नावाने ओळखला जाणारा भाग आहे.
मुंबईत प्लेगची साथ आल्यानंतरच शाहू महाराज सावध झाले होते.
हा प्लेग आपल्याकडे देखील येवू शकतो हे त्यांनी जाणलं. याच काळात भयानक दूष्काळ पडला होता. शाहू महाराज दुष्काळी जनतेची दुख दूर करण्यासाठी बाहेर पडत तेव्हा येणाऱ्या प्लेगच्या साथीचा अंदाज लोकांना देत असत. शाहू महाराजांना या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं की, लोकं उंदरांना गणपतीचे वाहन मानतात. सहजासहजी उंदराला मारण्यास धजावत नाहीत. शिवाय प्लेगसारख्या रोगाकडे देवाचा प्रकोप म्हणूनच बघतात.
म्हणून महाराजांनी आज्ञापत्र काढली.
प्लेगसाठी घराघरातील उंदरांची बिळे मुजवावीत म्हणून सांगण्यात आलं. घरात सुर्यप्रकाश खेळता ठेवण्यास सांगण्यात आलं. मुळात हा कोणत्याही देवाचा प्रकोप नसून तो उंदरामुळे होणारा रोग आहे व त्यावर स्वच्छता हाच उपाय असल्याचं महाराजांनी लोकांना सांगितलं. त्याचा योग्य तो परिणाम होवून गावेच्या गावे स्वच्छ झाली.
याच सोबत महाराजांनी लोकांनी मळ्यात रहावयास जावे म्हणून उद्युक्त केलं. लोकांनी महाराजांच ऐकून मळ्यामध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. जेव्हा करवीर नगरीत प्लेग आला तेव्हा या गोष्टींचा लोकांना फायदा झाला. अनेकजण मळ्यात रहायला गेले.
प्लेग येण्यापुर्वीच खबरदारी घेण्याची शक्य ती तयारी महाराजांनी केली, तरिही करवीर नगरीत प्लेगचे आगमन झालेच. १८९८ आणि १८९९ या दोन वर्षात करवीर नगरीस प्लेगने सतावले. गडहिंग्लज व शिरोळ तालुक्यातील १८ गावे प्लेगने पछाडली. त्यामुळे ३१,१३१ प्लेगने पछाडले.
महाराजांनी या सर्व गोष्टींची पुर्वतयारी करून ठेवली होती.
प्लेगची गाठ उठली की तीन दिवसात रोगी खलास व्हायचा. अशा वेळी प्लेगबाधित व्यक्तिला घरात ठेवणे धोक्याचे असायचे. पहिला प्लेगबाधित व्यक्तिला घरातून हलवून मग घरातील इतर निरोगी व्यक्तिंना बाहेर काढलं जात असे. व त्यानंतर घर निर्जंतूक करण्यात येत असे.
लोकांच्या व वतनदारांच्या मदतीशिवाय प्लेगविरोधात लढणं अशक्य होतं. म्हणून शाहू महाराजांनी राजाज्ञा देण्यास सुरवात केली.
मात्र आजच्यासारखीच तेव्हा देखील परिस्थिती होती. “तटत नाय खचाक्क” करणाऱ्या लोकांना अद्दल घडवायची जबाबदारी वतनदारांवर देण्यात आली. त्यासाठी महाराजांनी जो वतनदार सहकार्य करणार नाही त्याचे वतन जप्त करण्याची आज्ञा दिली. वतनदारांनी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही म्हणून महाराजांनी दोन तीन वतनदारांचे वतन जप्त केले. त्यानंतर वतनदारांना अद्दल मिळाली.
करवीर नगरिच्या प्रवेशद्वारानजीक म्हणजेच नगरीत यायच्या व नगरीत जायच्या निरनिराळ्या दिशांच्या मोक्याच्या जागी क्वारंटाईन करण्याची पद्धत अवलंबण्यात आली.
क्वारंटाईन हाच शब्द तेव्हा वापरण्यात आला होता. त्यामुळे बाहेरची माणसे आत किंवा आतली माणसे बाहेर येताना त्यांची वैद्यकिय तपासणी करुन, निर्जंतूक करुनच त्यांना प्रवेश दिला जात असे अथवा बाहेर सोडले जात असे.
रेल्वेने येणाऱ्या लोकांसाठी देखील रेल्वे स्टेशननजिक तपासणी केंद्र उघडण्यात आले. काही लोक ही वैद्यकिय तपासणी चुकवून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर फसव्या लोकांची माहिती देणाऱ्यास ५ ते १५ रुपायांचे बक्षीस शाहू महाराजांनी देण्यास सुरवात केली.
याच वेळी करवीर नगरीच्या कोटी तिर्थाजवळ प्लेगचे हॉस्पीटल सुरू करण्यात आले. डॉ. बोमनजी दोराबजी यांची खास प्लेग डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्लेग ग्रस्त लोकांना खास आयसोलेशन करुन ठेवण्याची जागा निश्चित करण्यात आली. ४ सप्टेंबर १८९९ पासून भास्करराव जाधव यांची प्लेग आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
क्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांवर शाहू महाराजांनी प्लेगशी यशस्वी लढा उभारला. या काळात हे दोन्ही शब्द करवीर नगरीत फेमस झाले होते. त्याचा परिणाम म्हणजे करवीर नगरीत नाममात्र प्लेगचे बळी गेले.
एप्रिल १९०० साली जॅक्सनने शाहू महाराजांना पत्र लिहले, या पत्रात जॅक्सन म्हणतात,
प्लेगाच्या काळात त्रस्त झालेल्या जनतेला आपण जातीने केलेल्या शासकिय मदतीबद्दल आपले अभिनंदन करणे यशोचित होईल.
हे ही वाच भिडू.
- जगभरात धुमाकूळ घालणारा प्लेग कोल्हापूरात शिरू शकला नाही ते शाहू महाराजांमुळे
- शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेल्या गंगाराम कांबळेच पुढं काय झालं?
- कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण..
- चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते