एलिझाबेथ आणि तिच्या राजघराण्याला इंग्लंडमध्ये उपरे असं का म्हटलं जातं ?

सध्या इंग्लंडचं राजघराण जगभरात चर्चेत आहे. गेली सत्तर वर्षे युनायटेड किंगडमची सम्राज्ञी म्हणून राज्यकारभार सांभाळणाऱ्या एलिझाबेथचा धाकटा नातू हॅरी काही दिवसांपूर्वी सेपरेट झाला होता. तो आणि त्याची बायको सिने स्टार मेगन मार्केल यांनी आपला मुलगा आर्चीच्या जन्मा वेळी  राज घराण्यावर रेसिजमचे आरोप केले आहेत.

मेगन मार्केल म्हणाली होती की,

“आर्चीच्या जन्माआधी कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत चर्चा झाली होती, यावेळी त्यांना बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल तेव्हा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणं त्याला प्रिन्स करण्यासाठी तसंच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हतं. “

तिची ती मुलाखत प्रचंड खळबळजनक ठरली. अनेकांनी इंग्लंडच्या राजघराण्यावर टीका केली. काही जणांनी राणीच्या पुतळ्या खाली पॅरासाईट असं लिहिलेला फोटो व्हायरल केला. खरं तर हा फोटो जुना असला तरी या राजघराण्यावर इंग्लंडचे पॅरासाईट किंवा उपरे म्हणून हिणवलं जातं.

इंग्लंडच्या राणीला तिच्याच देशात उपरे असं का म्हटलं जात असावं?

गोष्ट सुरु होते सतराव्या शतकापासून. इंग्लंडच्या आजवरच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक घराणी सत्तेत येऊन गेली. यातील आता आहे ते विंडसर घराणे. त्याकाळात सत्तेवर होतं ते स्टुअर्ट घराणं. तेव्हाची राणी होती क्वीन अ‍ॅन. तिच्याच काळात इंग्लंड आणि स्कॉटलंड हे दोन देश एकत्र येऊन ग्रेट ब्रिटन नावाच्या साम्राज्याची स्थापना झाली.

हि क्वीन अ‍ॅन पराक्रमी होती, राज्यकारभारात हुशार होती. पण दुर्दैवाने ती सतरा वेळा बाळंत राहून तिच्या राजघराण्याला एकही वारस ती देऊ शकली नाही. तीच एक बाळ दहा वर्षे जगलं पण पुढे त्याचाही आजारपणाने मृत्यू झाला. निपुत्रिक मृत्यू पावलेली ॲन स्टुअर्ट घराण्याची शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ पहिला जॉर्ज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.

त्याच घराणं होतं हॅनोव्हर घराणे.

हे हॅनोव्हर मूळचे जर्मनीचे. तिथल्या कॅलेनबर्ग येथे त्यांचं छोटंसं संस्थान होतं. अ‍ॅनच्या मृत्यू नंतर या जर्मन शासकांना इंग्लंडचा राजे पण का मिळालं या मागे हि एक कथा आहे. झालं असं होत कि इंग्लंड मध्ये तेव्हा ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट यांचा प्रभाव वाढत चालला होता. आणि स्टुअर्ट घराणे होते कॅथलिक. अ‍ॅनचे वडील जेम्स दुसरे हे कॅथलिक विचारांचे होते. त्यांच्या काळात इंग्लंडमध्ये कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट वाद चिघळला. त्यांना सत्तेतून बेदखल करण्यात आलं.

अ‍ॅनचा काळ देखील याच वादाने गाजला पण जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा प्रोटेस्टंट पंथाच्या लोकांना नवीन राजा हा आपल्या विचारांचा असावा असं वाटत होतं आणि म्हणूनच इंग्लंडचे सिंहासन जॉर्जच्या पदरी येऊन पडले.

असं म्हणतात की या पहिल्या जॉर्जला साधं इंग्रजी सुद्धा बोलता येत नव्हतं तरी त्याची निवड झाली होती. एक अर्थे त्याच राजेपद इंग्रजांच्यासाठी एक वरदान ठरलं. त्याच्याच काळात  ग्रेट ब्रिटनमध्ये संसदेची स्थापना झाली व पंतप्रधान निवडला जाऊ लागला. ह्यामुळे राजेशाहीचे महत्त्व व सामर्थ्य बऱ्याच अंशी ढासळले. लोकशाहीच्या दिशेने पावले पडू लागली.

पुढे जॉर्जचा मुलगा दुसरा जॉर्ज, त्याचा नातू तिसरा जॉर्ज, त्याचा खापर पणतू चौथा जॉर्ज हि मंडळी ब्रिटनच्या गादीवर आली. या चौथ्या जॉर्जच्या मृत्यू वेळी त्याचा कोणीही वारस जिवंत नव्हता. त्याची एकुलती एक मुलगी दहा वर्षांपूर्वीच मेली होती. त्यामुळे त्याचा धाकटा भाऊ चौथा विल्यम सत्तेत आला. हा चौथा विल्यम देखील मेला तेव्हा गादी साठी कोणीही वारस नव्हता. त्याची सगळी मुले अकाली वारली होती आणि जे सात आठ संतान होते ते औरस नव्हते.

या सगळ्या गोंधळामुळे हॅनोव्हर खानदानात एक वारस उरला होता तो म्हणजे चौथ्या जॉर्जच्या एका दारुड्या भावाची मुलगी. तीच नाव व्हिक्टोरिया. हा तीच इंग्लंडची आजवरची सर्वात फेमस राणी व्हिक्टोरिया.

ती अवघ्या अठराव्या वर्षी राणी बनली. लवकरच तीच लग्न झालं. हे लव्ह मॅरेज होतं. तिचा नवरा होता साक्से-कोबर्ग व गोथाचा राजपुत्र आल्बर्ट. हा नात्याने तिचा दूरचा भाऊच लागायचा. त्याचा जन्म जर्मनी मध्ये झाला. तो तिथेच वाढला देखील होता. लग्नानंतर तो त्याच्या सासरी म्हणजे इंग्लंडला बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहण्यासाठी आला.

ग्रेट ब्रिटनच्या नियमानुसार राणीच लग्न झालं तरी तिचा नवरा सत्तेत येऊ शकत नव्हता. राज्यकारभार व्हिक्टोरियाच्याच नावाने चालत होता. फक्त बदल एवढाच कि राजघराण्याचं आडनाव बदललं गेलं होतं.

आता इंग्लंडच्या गादीवर होते साक्से-कोबर्ग व गोथा घराणे. हॅनोव्हर प्रमाणे हे देखील जर्मनच.

व्हिक्टोरिया साक्से-कोबर्ग गोथा ६३ वर्षे व ७ महिने सत्तेवर राहिली. तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्व ह्या नावाने ओळखला जातो जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक व लष्करी प्रगतीचा काळठरल. इ.स. १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला. त्यावेळी तिने काढलेला जाहिरनामा राणीचा जाहिरनामा म्हणून प्रसिद्ध आहे.

त्याच वेळी हिंदुस्थानची सम्राज्ञी असा तिने किताब ही धारण केला. व्हिक्टोरिया नंतर सातवा एडवर्ड सत्तेत आला. त्याचा कार्यकाळ फक्त ९ वर्षे होता. १९११ साली त्याचा मुलगा म्हणजेच पाचवा जॉर्ज ब्रिटिश साम्राज्याचा उत्तराधिकारी बनला. असं म्हणतात की या पंचम जॉर्जला आपल्या जर्मन वंशाचा अभिमान होता. त्याला कैसर ए हिंद असेही म्हटलं जातं असे . हि कैसर उपाधी जर्मन भाषेतील आहे.

पण त्याच्या सत्तेत आल्यानंतर काहीच वर्षात एक मोठी घटना घडली. पहिलं महायुद्ध.

ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध जर्मन साम्राज्य अशी हि मुख्य लढाई होती. दोन्ही देशांचे मित्र यात सहभागी होते. जवळपास पाच वर्ष हे युद्ध चाललं. संपूर्ण जग यात ओढलं गेलं. हजारो लाखो प्राण दगावले. आधुनिक काळात आजवर कधी पाहिलं नाही असं हे युद्ध होतं. या युद्धात जर्मनीने इंग्लंडला बरच नामोहरम केलं होतं.

युद्धाचं तिसरं वर्ष सुरु होतं तेव्हा इंग्लंडमध्ये राजघराण्याच्या जर्मन वंशाबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली.

जर्मनीच रक्त अंगात खेळत असलेला राजा आपल्या देशाला कसा विजय मिळवून देईल असं म्हटलं जाऊ लागलं. पंचम जॉर्जच्या कानावर हि टीका पडली. रंगाच्या भरात त्याने आपलं आडनाव बदलून टाकलं. तेव्हा पासून ब्रिटिश राजघराण्याचे आडनाव विंडसर असे झाले. राजाने आपल्या कुटूंबियांना असलेली जर्मन भाषेतील सर्व उपाधी टाकून देण्यास सांगितली. जर्मनीशी असलेले सगळे संबंध राजघराण्याने तोडून टाकले.

इंग्लंडने पहिलं महायुद्ध जिंकलं त्या पेक्षाही महत्वाचं म्हणजे पंचम जॉर्जने आपल्या प्रजेचा स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवला.

पुढे दुसरे महायुद्ध तर याहूनही भयंकर झाले. जर्मनीच्या नाझी हुकूमशाह हिटलरने जगाला वेठीस धरलं. ज्यूंचा नरसंहार केला. जर्मन लोकांबद्दल इंग्लंड व जगभरात तिरस्काराची भावना निर्माण झाली. यावेळी इंग्लंडच्या राजे पदी सहावा जॉर्ज आला होता. या राजाबद्दल मात्र तो जर्मन वंशाचा असल्याबद्दल कधी चर्चा झाली नाही. तो स्वतः युद्ध क्षेत्रावर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवत होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता अफाट वाढली होती.

त्याच्याच नेतृत्वाखाली दोस्त राष्ट्रांनी हिट्लरविरुद्धचे दुसरे महायुद्ध जिंकले. मात्र त्याच्याच इंग्लिश साम्राज्याचे विघटन झाले. भारत व त्यांच्या अधिपत्या खाली असणारे अनेक देश स्वतंत्र झाले.

१९५२ साली जेव्हा सहाव्या जॉर्जचा मृत्यू झाला तेव्हा त्याची मुलगी सत्तेवर आली. तीच नाव एलिझाबेथ. हि आजही सत्तेत आहे. तीच लग्न डेन्मार्कच्या प्रिन्स फिलिप बरोबर झालं असून तिथल्या प्रथेप्रमाणे हे प्रिन्स फिलिप इंग्लंडच्या राणी सोबत राहतात पण त्यांना राजेपदाचा अधिकार नाही.

या राणीची कारकीर्द व्हिक्टोरिया पेक्षाही चांगलीच मोठी लाभली आहे. मात्र तिच्या काळात देखील अनेक वादग्रस्त घटना घडल्या. या पैकी तिचा थोरला मुलगा व इंग्लंडचा भावी राजपुत्र चार्ल्सचा व त्याच्या पत्नीचा म्हणजेच डायनाचा घटस्फोट, तिचा संशयास्पद अपघाती मृत्यू, चार्ल्सचे बाहेर सुरु असलेले अफेअर, त्याने केलेला त्या दुसरा विवाह या सर्व घटना राणीच्या भोवती फिरत राहिल्या.

असं म्हणतात की ही ९४ वर्षांची म्हातारी राणी अजूनही जुन्या विचारांची आहे, तिने सामान्य घरातून आलेल्या डायनाला त्रास दिला, पुढे चार्ल्सला दुसरे लग्न करण्यापूर्वी आपला गादीचा अधिकार सोडायला लावला वगैरे वगैरे चर्चा रंगल्या. अशातच तिच्या धाकट्या नातवाने मेगन मॉर्केल या कृष्ण वर्णीय युवतीशी विवाह केला होता तेव्हा कुजबुज सुरु झाली होती.

इंग्लंडच्या राज घराण्याला आपल्या शुद्ध राज वंशीय रक्ताचा, आपल्या गोऱ्या वर्णाचा प्रचंड अभिमान आहे हे त्यांनी दाखवून दिलंच आहे. जगातली इतरत्र राजेशाही संपुष्टात आली असली तरी इंग्लंडचा अभिमान म्हणून ते स्वतःला मिरवत असतात. तिथल्या नागरिकांनी भरलेल्या कराचा मोठा वाटा या राजघराण्यावर त्यांच्या नखर्यावर खर्च होतो.

त्यामुळेच ब्रिटनच्या जनतेपैकी अनेकजण आता त्यांना जर्मन वंशाची आठवण करून देत  तुम्ही आमच्या देशात उपरे आहात आणि आमच्या रक्ताच्या पैशावर जगणे सोडून द्या अशी मागणी करताना दिसून येत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.