यशवंतरावांच्या एका आदेशावर २२ भारतीय विमाने पाकिस्तानात घुसली होती.
१ सप्टेंबर १९६५ , स्थळ: संरक्षण मंत्र्यांचे ऑफिस,रूम नंबर १०८, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली.
वेळ: संध्याकाळचे चार
संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या समोर डिफेन्स सेक्रेटरी पी.व्ही.आर. राव , हवाईदल प्रमुख अर्जन सिंह, लेफ्टनंट जनरल कुमारमंगलम इत्यादी लोक बसले होते. तिथे जमलेल्या सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त होते. कारण ही तसच होत.
भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली होती. पाकिस्तानी आर्मीने जम्मू काश्मीरमधील लष्करीदृष्ट्या महत्वाच्या अखनूर पुलावर वर्चस्व मिळावे यासाठी ऑपरेशन ग्रँड्स्लॅम ही मोहीम राबवली होती. सकाळीच चांब सेक्टरमध्ये पाक लष्कराने अत्याधुनिक अमेरिकन रणगाड्याच्या साह्याने जोरदार हल्ला केला होता. यावर उपाय काय याची चर्चा चालू होती.
साधारण साडेचार वाजत आले होते.
भारतीय लष्करप्रमुख जनरल जे.एन.चौधरी यांचा संरक्षण मंत्र्यांच्या दालनात प्रवेश झाला. जे.एन.चौधरी नुकतेच काश्मीरच्या ऊरी-पुंछ या युद्धआघाडीवरून परतले होते. सगळ्यांचे लक्ष ते काय म्हणतात याकडे लागले.
जनरल चौधरी यशवंतरावाना म्हणाले,
“सर आम्हाला हाजीपीर परिसरात पाक लष्कराचा बिमोड करण्यासाठी हवाई दलाची तातडीने मदत लागेल. “
वेळ आणीबाणीची होती. पाकिस्तानी भूमीवर हल्ला करून त्यांच्यावर दबाव बनवला नाही तर चांब सेक्टरमध्ये पाक रणगाडे बराच मोठा उच्छाद मांडणार होते.
डिफेन्स मिनिस्टर यशवंतरावांनी हवाईदल प्रमुखांना विचारले,
“मार्शल, आपल्याला जर पाकिस्तानच्या भूमीवर हल्ला करायचा झाला तर किती वेळ लागेल? “
एअर चीफ मार्शल अर्जन सिंह ठामपणे म्हणाले,
” We are ready. आम्ही आपल्या परवानगीचीच वाट बघतोय.”
आता निर्णय यशवंतरावांच्या हातात होता. कोणाचाही सल्ला घेण्यासाठीचा वेळ उरला नव्हता. सगळे श्वास रोखून ते काय म्हणतात याकडे पहात होते.
काही क्षण विचार करून यशवंतराव आपल्या निर्धारी स्वरात अर्जन सिंहना म्हणाले,
“करा आक्रमण.”
पावणे पाच वाजले होते.
अवघ्या पाचच मिनिटात अंबाला,पठाणकोट येथून भारतीय हवाईदलाची २२ जिगरबाज लढाऊ विमाने आभाळात झेपावली. हाजीपीर टेकड्या ओलांडून सीमापार उतरलेल्या भारतीय आर्मीच्या जवानाना संरक्षण देत त्यांनी बॉम्बचा वर्षाव सुरु केला. सरगोधा ते पेशावर अशा अनेक पाकिस्तानी हवाई तळांना भाजून काढले.
याच आर्मी आणि एअरफोर्सच्या संयुक्त हल्ल्यामुळे पाकिस्तानची निर्णायक पीछेहाट सुरु झाली. भारतीय लष्कराने पश्चिमोत्तर सीमेजवळ लाहोरपासून पाच मैल अंतरावर तिरंगा फडकवला. हे यश भारतीय सैन्य आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाचे देखील होते.
या घटनेचा उल्लेख एअरचीफ मार्शल अर्जन सिंह यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये केलेला आहे.
हे ही वाच भिडू.
- जेव्हा संरक्षणमंत्री शरद पवार भारतातच सर्जिकल स्ट्राईक घडवून आणतात…!
- ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !
- पाकिस्तानी हल्ल्यात गुजरातचे मुख्यमंत्री शहीद झाले होते.