बॉम्बने उडवलं तरी काहीच होणार नाही अशा गाड्या टाटाने भारतीय सैन्याला दिल्यायेत

सध्या देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा पुलवामा घटनेचा विषय चर्चेत आला आहे. या घटनेवरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण पुलवामाच्या घटनेवर बोलताना एक मुद्दा कायम मांडला जातो की, जर भारताकडे ब्लास्ट प्रूफ गाड्या असत्या तर ४० जवानांचा जीव वाचला असता. हीच गरज २०२० च्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत सुद्धा जाणवली होती, जेव्हा भारताचे २० सैनिक मृत्युमुखी पडले होते.

त्यावेळी चायनीज सैन्याला जास्त हानी झाली नाही कारण त्यांच्याकडे आर्म्ड व्हेईकल होते. भारतीय सैन्यातील हीच कमी टाटा ग्रुपने टिपल्याचं दिसतंय. म्हणूनच तर टाटाने अशा हाय लेव्हल सेक्युरिटीच्या गाड्या तयार करून भारतीय सैन्याकडे पाठवल्या आहेत.

या गाड्यांना ‘क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल्स’ असं नाव देण्यात आलंय.

क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल्स पूर्णपणे बुलेटप्रूफ आहेत. या गाड्या इतक्या सुरक्षित आहेत की गोळ्या झाडा नाहीतर बॉम्ब फेका आतमध्ये बसलेल्या सैनिकांना धक्का सुद्धा लागणार नाही. या व्हेईकल्सची लांबी २१ फूट आहे तर रुंदी आहे ८ फूट. एकूण १४ टन वजनाच्या या गाड्या २ टन वजनाच्या वस्तू वाहून नेऊ शकतात. 

या फायटिंग व्हेईकल्सची मुख्य खासियत आहे त्याचं इंजिन. २४० HP चं इंजिन याला जोडण्यात आलंय आणि ६ गिअर आहेत. नॉर्मल चारचाकी गाड्यांचं कॉन्फिगरेशन 2×4 असतं. म्हणजे चार चाकांपैकी २ चाकांना इंजिनद्वारे पॉवर पुरवली जात असते. इथे तसं नाही, 4×4 कॉन्फिगरेशनमध्ये या गाड्या बनवण्यात आल्या आहेत, म्हणजे गाडीची चारही चाकं इंजिनवर चालतात. 

याचा फायदा असा होतो की, युद्ध क्षेत्रातील जमीन खडबडीत, ओबडधोबत असते. अशा ठिकाणी जर गाडी कुठे खड्यात वगैरे फसली तर इतर चाकं गाडीला पॉवर देत फसलेलं चाक बाहेर काढतील…

गाडीची जमिनीपासून उंची ३१५ मिलीमीटर असल्याने ओबडधोबड रस्त्यांवरून गाड्या आरामात चालू शकतील. रस्त्यात दगड, धोंडा आला तरी गाडीच्या बॉडीला फटका बसणार नाही आणि भन्नाट एनर्जीच्या इंजिनमुळे गाडी ८० किलिमीटर प्रति तासाच्या वेगाने सुस्साट पळू शकते.  

बॉर्डरवरच्या रस्त्यांमुळे अनेकदा टायर पंक्चर होत असतात. हीच बाब लक्षात घेऊन या गाड्यांसाठी रन फ्लॅट टायर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीमुळे टायर लवकर पंक्चर होत नाही. समजा झालंच तर? तर टायरच्या साईड वॉल खूप हार्ड करण्यात आहेत, ज्यामुळे टायर पंक्चर झालं तरी ते लगेच खाली बसणार नाही, चालत राहील

युद्धक्षेत्रातील जमिनीचा दुसरा फॅक्टर म्हणजे कुठे लँड माईन्स असतील ते सांगता येत नाही. गाडी त्याच्यावर गेली की क्षणात होत्याचं नव्हतं होतं. मात्र या गाडीला लँड माईन्सनंही काही होत नाही!

हा पण कोणत्याही स्फोटानंतर एक समस्या असते… स्फोटानंतर विषारी वायू निघतो ज्यामुळे स्फोटातून बचावलेल्या लोकांचा जीव जाऊ शकतो. या समस्येसाठी गाडीवर फिल्टर बसवण्यात आलेत. याने विषारी गॅस फिल्टर होऊन आत जाईल, जेणेकरून सैनिकांना याने देखील काहीच होणार नाही. गाडीच्या आत काही जाणार नाही मात्र गाडीतून बाहेर फायरिंग करता येते.

सैनिक जिथे बसतात त्याठिकाणी १० फायरिंग पॉईंट देण्यात आलेत. इथून सैनिक शत्रूंवर वार करू शकतात. मात्र शत्रूने रिटर्न फायरिंग केली तर आत गोळ्या जाणार नाही. कारण गाडीच्या संपूर्ण काचा बुलेट प्रूफ आहेत. अगदी १० मीटरच्या अंतराने जरी गाडीवर गोळीबार केला तर शत्रूची मेहनत वाया समजा.

आता गाडीच्या छताकडे येऊ. गाडीच्या छतावर मशीन गनसाठी जागा देण्यात आलीये. ३६० डिग्रीपर्यंत मशीन गन फिरू शकेल अशी व्यवस्था करण्यात आलीये. तर मशीनगनच्या समोरच्या साईडला म्हणजे गाडीच्या छताच्या पुढच्या भागावर ‘थर्मल कॅमेरा’ बसवण्यात आला आहे. हा गाडीचा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे.

थर्मल कॅमेऱ्यांची खासियत म्हणजे ते फक्त टेम्परेचर कॅप्चर करत असतात. 

माणसाच्या शरीराचं तापमान असतं ३६ डिग्री सेल्सियस. म्हणून जिथे कुठे हे तापमान कॅमेरा टिपेल तिथे माणूस आहे असं समजायचं. थर्मल कॅमेरा मानवी आकृती ओळखत नसल्याने तापमान जिथे आढळून येईल तिथे व्हाईट रंगाचा स्पॉट कॅमेरा दाखवेल. शत्रू कुठेही, कशाचाही आडोसा घेत लपू द्या, त्याचा काहीच फायदा नाही. शिवाय कॅमेऱ्याला नाईट व्हिजन सिस्टीम देखील आहे. तेव्हा रात्रीचंही भागतंय. 

आता येऊया गाडीच्या मागच्या बाजूला. सैनिकांना गाडीतून उतरण्यासाठी मागच्या बाजूला दरवाजे देण्यात आले आहेत. याचा उद्देश्य म्हणजे, गाडीच्या मागच्या बाजूने सैनिक उतरले तर त्यांना आडोसा मिळेल. समोरून होणाऱ्या हल्ल्याला कव्हरिंग फायर इझी होईल… 

शेवटचा पण महत्वाचा मुद्दा. बॉर्डर क्षेत्रावर अनेकदा नेटवर्क प्रॉब्लेम येतात. म्हणून कधी अर्जंटमध्ये मदत लागली तरी हेडऑफिसला संपर्क होऊ शकत नाही. याचं सोल्युशन म्हणून अँटेना सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टीममुळे इन्स्टॉल करण्यात आले आहेत. तेव्हा नेटवर्क नसण्याचा ताण येत नाही. 

अशा या क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल्सची निर्मिती करण्याचा अविष्कार टाटा कंपनीने केलाय. २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात केंद्र सरकारने स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला चालना दिल्याने हे शक्य झालंय. सोबतच गेल्या चार वर्षांत परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या डिफेन्स इक्विपमेंट्सच्या खर्चातही ४६% वरून ३६% पर्यंत घट झाली आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.