चांगल्या पगाराचा जॉब सोडला, कॅन्सरला हरवलं आणि पानांची पत्रावळी जगभर पोहोचवली

लहान असतांना गावातील लग्नात, भंडाऱ्यात पळसाच्या पानाच्या पत्रावळी असायच्या. पत्रावळी लहान आली, खराब आली तर बनणाऱ्या आबाला जाऊन सांगायचो कालच्या रमेशच्या पोराच्या लग्नातल्या पत्रावळी चांगल्या नव्हत्या. जसं-जसं मोठं होतं गेलो तसं लग्नात पंगतीची जागा बुफेने घेतली आणि  पानाच्या पत्रावळी सुद्धा गायब होत गेल्या. त्यांची जागा प्लस्टिकच्या, थर्मकोलच्या प्लेट ने घेतल्या.

या प्लेटमुळे कचरा तर वाढवलाच त्या खाऊन गायी, म्हशी आजारी पडू लागल्या. थर्मकोलच्या दुष्परिणामुळे त्याच्या प्लेटवर बंदी आणली आहे. प्लस्टिकच्या प्लेट बाजारात अजूनही मिळतात. खेड्यात सुद्धा या प्लेटच्या कचऱ्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.   

स्टार्टअप आणि पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक असणारे काही जण आता या संदर्भात पुढे येत आहेत.  तेलंगाणातील एका उच्च शिक्षित दाम्पत्याने आपली अमेरिकेतील नोकरी सोडून पर्यावरण पूरक पानाच्या पत्रावळी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी या पत्रावळी जगभरात पोहोचविल्या आहेत. 

त्यांच्या पर्यावरणपूरक स्टार्टअपची ही कहाणी  

हैद्राबाद येथे राहणाऱ्या वेणुगोपाल आणि माधवी यांनी अवघ्या ३ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये ‘विसत्राकू’ नावाने स्टार्टअप सुरु केला. ‘विसत्राकू’ याचा तेलगूत अर्थ होतो पत्रावळी. विसत्राकू माध्यमातून पळसाच्या पानाच्या पत्रावळी आणि द्रोण बनविण्यात येते. स्वतःच्या शेतात त्यांनी पळसाची झाडे लावली असून तेथेच एक फॅक्टरी उभी केली आहे. 

वेणुगोपाल आणि माधवी राहत असलेल्या सोसायटीत एक कार्यक्रम होता. बाजूलाच प्लस्टिकच्या प्लेटचा ढीग लागला होता. आजूबाजूचे कुत्रे, गायी येऊन प्लेट मध्ये उरलेले अन्न खात होते. हे पाहून माधवी आणि वेणुगोपाल राग आला. प्लस्टिकच्या प्लेट जर पशूच्या पोटात गेला तर त्याचे मोठे दुष्परिणाम होत असतात. 

‘विसत्राकू’ची खरी संकल्पना माधवी आणि वेणुगोपाल यांना सोसायटीतील कार्यक्रमातून झालेल्या कचऱ्यामुळे सुचली. अगोदर लग्न समारंभात पानाच्या पत्रावळी जेवायला देत. आता अशा प्रकारच्या पत्रावळी कुठंच उपलब्ध नाहीत. अशा पत्रावळी कोणी बनवत नाही आणि ते कोणी वापरत नसल्याचे माधवी आणि वेणूगोपाळाच्या लक्षात आले.  

माधवी आणि वेणुगोपाल यांचे हैद्राबाद जवळ सिद्दीपेठ येथे २५ एकर शेत आहे. शेतात वेगवेगळ्या ३० प्रकारचे फळे लावले होते. शेतात अधे मध्ये पळसाची अनेक झाडे होती.  माधवी यांनी एक दिवस वेणुगोपाल यांना सांगितले की, आपण लहान असतांना याच पळसाच्या पानापासून पत्रावळी बनविल्या जात. त्यादिवशी दोघांनीही पळसाची पाने घरी सोबत घेत पत्रावळी बनविण्याचा प्रयत्न केला. 

हाताने तयार केलेली पत्रावळी लहान होती. माधवी या सोशल मीडियावर चांगल्याच ऍक्टिव्ह असतात त्यांनी हाताने तयार केलेली पळसाची पत्रावळीचा फोटो फेसबुकवर टाकला आणि या संदर्भात अधिक माहिती कोणाला आहे हा अशी विचारणा केली. 

आसाम मध्ये अशा प्रकारे पळसाच्या पानांची पत्रावळी तयार करतात अशी माहिती त्यांना मिळाली. तेथील स्थानिक लोकांकडून अधिक माहिती घेतली असता माधवी यांच्या लक्षात आले की, आता याचा वापर खूप कमी झाला आहे. 

सगळी माहिती गोळा करून माधवी आणि वेणुगोपाल यांनी आपल्या शेतातच एक छोटी फॅक्टरी उभी केली. या स्टार्टअपला ‘विसत्राकू’ असे नाव दिले. तिथे २ प्रकारच्या पत्रावळी आणि द्रोण बनविण्यात येऊ लागले. हा पत्रावळीच्या आठवणी लहानपणाशी जोडल्या. पर्यावरणपूरक अशा पत्रावळीची मार्केटिंग सुरुवात आपल्या सोसायटी पासून केली.

ही फॅक्टरी ७ महिलांच्या माध्यमातून चालविण्यात येते.  

 कुठल्याही नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यास माधवी वेणुगोपाल त्यांच्या फॅक्टरीत बनविलेल्या पत्रावळी पाठवून देत. ते नातेवाईक या पत्रावळीचा अनुभव फेसबुकवर लिहत. केवळ माऊथ पब्लिसिटीमुळे या पत्रावळी देशभर पोहचल्या. 

पत्रावळी सगळ्या भारतात तर पोहचल्या अमेरिका, जर्मनी सारख्या देशांमध्ये सुद्धा ‘विसत्राकू’ पत्रावळीला मागणी आहे. सिद्धपेठ येथे असणाऱ्या शेतात लहान फॅक्टरी आहे. तिथे ७ महिलांच्या माध्यमातून दररोज ७ ते १० हजार पत्रावळी आणि द्रोण तयार करण्यात येते. 

पळसाची पानांना घाग्याने शिवण्यात येत. त्यानंतर फ्रुड ग्रेड मशीनखाली १५ सेकंड ठेवण्यात येत. यामुळे या पानांना पत्रावळीचा आकार येतो. 

 कॅन्सरवर मात करत विसत्राकू’ स्टार्टअप यशस्वी करून दाखवला 

माधवी आणि वेणुगोपाल हे दोघेही उच्च शिक्षित आहेत. माधवी यांचे फार्मसी मध्ये मास्टर झाले आहे. तर वेणुगोपाल हे मॅकेनिकल इंजिनियर आहेत. दोघांनीही बँकॉक, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेत काम केले आहे. 

अमेरिकेत कामकरत असतांना दोघानांही जाणवलं की, मुलं मोठे होत आहे आणि त्यांना अमेरिके पेक्षा भारताची जास्त ओढ आहे. त्यामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. २००३ ला माधवी आणि वेणुगोपाल भारतात आले.  

हैद्राबादला परत आल्यानंतर त्यांनी सिद्दीपेठ येथे शेती विकत घेतली. पारंपरिक शेती न करता नवीन प्रयोग करण्याचा ठरविले. जॉब बरोबरच जैविक शेती करू लागले. आपण म्हणतो ना सगळं काही सुरु असतांना दुधात मिठाचा खडा पडतो आणि ते खराब होते. त्याच प्रमाणे माधवी यांच्या आयुष्यात झालं. त्यांना २०१० यामध्ये अचानक कळाले की,आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.

आपले खूप कमी दिवस उरलेत असे माधवी यांना वाटू लागले होते. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ कुटुंबात राहणे पसंत केले. नोकरी सोडल्याने त्यांच्याकडे अधिक वेळ होता. आधी शनिवारी, रविवारी शेतात जाणाऱ्या माधवी आता दररोज जाऊ लागल्या.पुढे जाऊन माधवी यांनी कॅन्सरवर विजय मिळविला आणि अधिक जोरात काम सुरु केले. 

विसत्राकू’ हा स्टार्टअप सक्सेसफुल करून दाखवला आहे. माधवी आणि वेणुगोपाल यांचं म्हणणं आहे कि, पत्रावळीवर जेवणाची पद्धत परत आणायची आहे. तसेच लोकांना सांगायचे आहे की, तुमचे एक पाऊल पर्यावणासाठी किती महत्वाचे आहे. पानाच्या पत्रावळीमुळे लाखो टन कचऱ्यापासून आपली मुक्तता होणार आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.