ना कामचोरी, ना जॉब सोडणं मग क्विट क्विटिंग ट्रेंड नक्की काय ज्यामुळे कंपन्यांना घाम फुटलाय

कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संज्ञा खूपच ओळखीची झाली. जवळपास २ वर्ष झाले जगभरातील लोकांना आरामात घरून काम करण्याची सवय लागली. म्हणून आता जेव्हा पुन्हा कंपन्या सुरु होऊ लागल्या आहेत तेव्हा ऑफिसला जाऊन काम करण्याची अनेकांची मनस्थिती राहिली नाहीये. 

लॉकडाऊनचा अजून एक परिणाम सांगायचा तर सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला. वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो केले जाऊ लागले. याच सोशल मीडियाच्या एका अतरंगी ट्रेन्डने लोकांच्या आरामात काम करण्याच्या इच्छेसाठी सोल्युशन काढल्याचं दिसतंय. 

या ट्रेंडला ‘क्विट क्विटिंग’ असं म्हटलं जातं.

गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आणि टिकटॉकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘क्विट क्विटिंग’ या नावाने एक ट्रेंड चालवला जातोय. शब्दावर जाऊ नका. ‘नोकरी सोडून देणं’ असं याचा अर्थ नाहीये. तर ‘कमीतकमी पण आवश्यक इतकंच काम करणं’ असं त्याचा अर्थ होतो. 

जर तुम्हाला तुमचं काम आवडत नाहीये, त्याचं सॅटिसफॅक्शन तुम्हाला मिळत नाहीये पण तुम्हाला नोकरी देखील सोडायची नाहीये तर हा पर्याय वापरण्याचा सल्ला सोशल मोडियावरून दिला जातोय.

जर तुमची शिफ्ट संपली असेल तर लगेच ऑफिसमधून निघणं, अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त वेतनाची मागणी करणं, खूपच अँबिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये न गुंतणं, एखाद्याची ओळख त्यांच्या नोकरीपासून वेगळी ठेवणं तसंच काम आणि खाजगी जीवन यामध्ये एक बॉण्ड्री निर्माण करून घेणं असे क्विट क्विटिंगचे काही नियम आहेत. 

क्विट क्विटिंग म्हणजे काम टाळणं नक्कीच नाहीये तर ते कामाव्यतिरिक्तच आयुष्य जगणं, त्याकडे दुर्लक्ष न करणं असं आहे.

पण हा ट्रेंड का चालवला जातोय?

गेल्या काही दशकांपासून लोकांना फक्त कामाची सवय लागली आहे. आयुष्यात पैसे कमावणं हेच ध्येय झालं आहे. प्रमोशनच्या हव्यासापोटी एक्सट्रा काम करणं, पूर्णवेळ कामात स्वतःला झोकून देणं अशा गोष्टींमुळे कंपन्या कधी तुमच्या वर्कोहोलिक स्वभावाचा फायदा घ्यायला लागतात हे कळत नाही.

गेल्या २० वर्षांत खूप कष्ट करणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे वयक्तिक आयुष्याकडे तर लक्ष दिलं जात नाहीये शिवाय त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होतोय. बिनपगारी कामगार हे अनेक वेगवेगळ्या कामांचा एक अपेक्षित भाग बनले आहेत. 

अशात सतत डेडिकेशन आणि नोकरीसाठी लढणाऱ्या लोकांना थोडं स्लो डाऊन होण्याची गरज आहे. इतकंच नाही तर अशा लोकांनी त्यांच्या कामाचं पुनर्मूल्यांकन केलं पाहिजे, म्हणून क्विट क्विटिंग हे मॉडेल आणलं गेल्याचं सांगितलं जातं. 

संशोधनात असं दिसून आलंय की कर्मचारी जर आनंदी असतील तर जास्त प्रोडक्टिव्ह काम करतात. याशिवाय हेल्थी आणि आनंदी कामाच्या वातावरणात सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध वाढतात. क्विट क्विटिंगमुळे केवळ कामावर लक्ष देऊन नेहमी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्पर्धा करण्याची नकारात्मक भावना देखील नष्ट होते, असं म्हटलं जातंय.

हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे रंजय गुलाटी यांनी क्विट क्विटिंगला ‘ग्रेट रिथिंकिंग’ करणं असं म्हटलंय. कारण याने लोक त्यांचं काम आणि पर्सनल आयुष्य दोन्हींना न्याय देऊ शकतात.

हा ट्रेंड कोणी सुरु केला? 

सोशल मीडियावर @zaidleppelin नावाच्या एका युझरने हा ट्रेंड सुरु केल्याचं कळतं. या युझरने एक व्हिडीओ टिकटॉक वर टाकला होता. ज्यात तो संदेश देत होता.. 

‘काम हे तुमचे जीवन नाही. तुमची व्हॅल्यू तुमच्या प्रोडक्टीव्ह आउटपुटद्वारे परिभाषित केली जात नाही. तेव्हा आवश्यक तेवढंच काम करत तुमची किंमत राखा’.

त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि हजारो टिकटोकर्सनी स्वतःचे क्विट-क्विटिंग व्हिडीओ तयार करायला सुरुवात केली. ज्यात त्यांनी स्वतः वर्क आणि लाईफ बॅलन्सवर कसं काम करणं सुरु केलंय ते सांगितलं. त्यावरून अनेकांनी हा फॉर्म्युला वापरायला सुरुवात केली आहे. 

टिकटॉकवर #QuietQuitting हॅशटॅग इतका लोकप्रिय झाला आहे की बरेच लोक त्याला ‘क्रांतिकारी ट्रेंड’ म्हणत आहेत.

तरुण कर्मचाऱ्यांमध्ये क्विट-क्विटिंग जास्त लोकप्रिय होतंय. कारण या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. एम्प्लॉयमेंट हीरोच्या २०२२ च्या वेलनेस अॅट वर्क अभ्यासानुसार, ५३ टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना कामातून उबल्यासारखं वाटतं तर ५२ टक्के लोकांना त्यांचं काम आणि आयुष्य यातील संतुलन खराब असल्याचं वाटतं. 

याचा कंपन्यांवर काय परिणाम होतोय?

कामाशी असंतुष्ट असलेल्या लोकांचं कामावर लक्ष लागत नाही. ते कमी काम करत आहेत म्हणून यंदाच्या गॅलपच्या स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेसच्या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेतील ७.८ ट्रिलियन डॉलर्सची उत्पादकता कमी झाली.

येऊ घातलेल्या आर्थिक मंदीची चिंता वाढत असताना, उत्पादकतेची पातळी घसरणं हे इंडस्ट्रीजसाठी मोठं आव्हान बनत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेच्या नॉनफार्म कामगार उत्पादकतेत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २.५ टक्क्यांनी घट झाली आहे. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या म्हणण्यानुसार ही १९४८ नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण आहे.

तर एकूणच उत्पादकता कमी होत असल्याने Google सारख्या कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शक्यता वर्तवत आहेत. कारण हा ट्रेंड कामगार आणि मालक या दोघांसाठीही हानिकारक आहे.  एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा खर्च कर्मचाऱ्याच्या पगाराच्या २०० टक्के इतका आहे, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. 

तर काही कंपन्यांमध्ये निराशा असून काहींना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुस्तपणाबद्दल काळजी वाटत आहे. 

मात्र कर्मचाऱ्यांना याची जास्त पर्वा नसल्याचं सध्यातरी दिसत आहे. कारण त्यांचा सगळा फोकस हेल्थी आयुष्यावर आहे. एका कंपनीने काढलं तर दुसरीकडे जाऊ, असं म्हटलं जातंय.

भारताबद्दल सांगायचं तर अजूनतरी हा ट्रेंड जास्त पसरला नाहीये. मात्र कोरोना काळापासून अनेक लोक कंपन्यांतील काम सोडून स्वतःचा बिजनेस उभा करताना दिसत आहे. म्हणून क्विट-क्विटिंग हा ट्रेंड भारतात जास्त प्रमाणात वापरला जाऊ शकतो, असं निरीक्षक सांगतात. 

हे ही वाच भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.