“मेरे सपनोंकी राणी”ने सिद्ध केलं पोरगं बाबाच्या सावलीतून बाहेर आलंय.

१९४० ते १९६० हा भारतीय सिनेसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. जसजस साठचं दशक आलं तो पर्यंत ती जादू कमी होत गेली होती. शास्त्रीय संगीताचा आधार नसलेले नवे संगीतकार सिनेमासृष्टीत आले होते. भलामोठा ऑर्केस्ट्राच्या वाद्यमेळ्याच्या जीवावर संगीत खपवणे ही नवी स्टाईल आली होती. अशा या भाऊ गर्दीत जुन्या संगीताचा अखेरच्या शिलेदारामध्ये होते  सचिन देव बर्मन !

एसडी बर्मन यांच्या गाण्याच्या ट्युन्स रागदारीवर आधारित असायच्या. कितीही झालं तरी त्याबाबतीत तडजोड करायची नाही हे तत्व त्यांनी पाळलेल. यामुळेच मेलडीने त्यांची साथ कधी सोडली नाही. प्यासा, देवदास, तेरे घर के सामने , ज्वेल थीफ असे अनेक अजरामर सिनेसंगीत त्यांनी बनवले. 

त्रिपुराच्या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. पण त्यांच संगीत फुलल कलकत्यामध्ये. सुरवातीला आकाशवाणीमध्ये नोकरी करणारे एसडी बंगाली सिनेमासाठी संगीत देऊ लागले. तिथे मिळालेल्या यशामुळे नशिबाची परीक्षा बघायला मुंबईला आले. आल्या आल्या यश मिळाले नाही. काही वर्ष मुंबईचा स्ट्रगल केला. मध्येच सगळ सोडून परत कोलकात्याला गेले. पण आपल्या स्वप्नापासून खूप वर्ष दूर राहणे शक्य नव्हते.

दरम्यानच्या काळात एसडी यांनी आपल्या एका विद्यार्थिनीशी म्हणजेच मीरा दास गुप्ता यांच्याशी लग्न केलं होतं. ती सुद्धा उत्कृष्ट संगीतकार होती. मीरा संगीत बनवताना एस.डी. यांना मदत करायच्या. ते दोघेही मुंबईला आले. त्यांना एक मुलगा होता त्याच नाव राहुल. या राहुलला त्यांनी कोलकात्याला त्याच्या आज्जीजवळ ठेवलं होतं.

नाव होतं राहुल पण रडायचा अगदी वरच्या सुरात म्हणून त्याला सगळे पंचम म्हणायचे. हा पंचम वाढला आपल्या आज्जीजवळच. तिथे त्याचे बरेच लाड झाले. अभ्यासात मात्र त्याची प्रगती शून्य होती.

एक दिवस एसडीबर्मन कोलकात्याला आले होते. तेव्हा पंचमच्या आज्जीनी जावयाकडे तक्रार केली,

” तुमच पोरग खूप व्रात्य आहे. दिवसभर फुटबॉल खेळतो. तो काही माझ्या जवळ टिकत नाही, त्याला तुमच्यासोबत मुंबईला न्या. “

एस.डी.बर्मन यांच्या पुढे पर्यायचं नव्हता. त्यांनी पोराला विचारलं तुला अभ्यास जमत नाही तर नेमक काय जमत? पंचम म्हणाला,

“मला सायकलिंग आवडते. त्यात मला बरीच बक्षिसे मिळाली आहेत.”

एसडी म्हणाले,

“त्यात काय विशेष? मी सुद्धा शाळेत असताना टेनिस खेळायचो याचा अर्थ त्यावर माझे पोट भरेल असे नाही. आयुष्य काढता येईल असं काही तुला जमत का?”

पंचम म्हणाला,

“मला माऊथऑर्गन वाजवता येत. मी त्यावर वेगवेगळ्या चाली बनवतो.”

एसडीचकित झाले. त्यांनी कधी राहुलला गाण शिकवलं नव्हत. त्यांनी त्याला माउथ ऑर्गन वाजव म्हणून सांगितलं. पंचमनी काही ट्युन्स ऐकवले. एसडी बर्मन म्हणाले,

“आज तू जे वाजवलंस ते तुझ नाही. संगीतात सच्चेपणा हवा. आम्ही मुंबईला परत जातोय, तीन महिन्यांनी परत येऊ. तो पर्यंत तू तबला शिक.”

पंचमला आश्चर्य वाटलं. आपल्याला माऊथ ऑर्गन चांगलं वाजवता येते तर आपले वडील तबला शिकायला का पाठवतायत? एसडीनी त्याला समजावलं की आपल्या संगीतात ऱ्हिदम यावा यासाठी तालवाद्याच बेसिक ज्ञान आवश्यक आहे. त्यांनी पंचमला बजावलं की रोज कमीत कमीत ४ ते पाच ट्युन्स बनवायच्याच.

Dq0CYQtXcAA2uBG

तीन चार महिन्यांनी एसडी बर्मन परत आले ते त्यांनी पंचमला मुंबईला नेण्यासाठीच.

मुंबईमध्ये आल्यावर राहुल साठी अनेक दालन खुली झाली. पाश्चात्य संगीताची तोंडओळख झाली. जाझ संगीत काय असते हे तो शिकला. एकदा वडिलांचा फंटूश सिनेमा बघण्यासाठी ती थिएटरमध्ये गेला होता तेव्हा त्याला कळाल की, “ए मेरी टोपी पलट के आ” या गाण्याची ट्यून आपली आहे. त्याला धक्काच बसला. त्याने एसडीकडे ही गोष्ट विचारली. त्यांनी फटक्यात उत्तर दिल,

“हो वापरली मी तुझी ट्यून. आणि हा तू तुझा सन्मान समज की आपण काही तरी बरं बनवायला लागलो आहे.”

सातव्या मजल्यावर पोहचलेला पंचमचा अहंकार लगेच खाली आला. एसडीबर्मनला सुद्धा आपल्या पोरामधलं टलेंट लक्षात आलं होतं. त्यांनी त्याला रेकोर्डिंग स्टुडियो मध्ये न्यायला सुरु केलं. पंचम संगीतात मदत करू लागला. चलती का नाम गाडी, कागज के फुल,गाईड अशा सिनेमांसाठी त्यान आपल्या वडिलाना असिस्ट केलं.

कॉमेडीचा सुपरस्टार मेहमूद जेव्हा आपल्या प्रोडक्शन साठी सिनेमा बनवत होता तेव्हा त्याने एसडीन संगीतासाठी विचारलं. त्यांनी तारखा नसल्यामुळे नकार दिला. म्हणून मेहमूदने त्यांच्या असिस्टंटला म्हणजेच पंचमला संगीतकार म्हणून संधी दिली. काहीच वर्षात शम्मी कपूर हिरो असलेला तिसरी मंझील हा आरडीच्या संगीताचा पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. त्याच्या गाण्यांचं सगळीकडे कौतुक झालं.

याच दरम्यान पडोसन आला. यातली सुद्धा गाणी गाजली. त्यात त्याने केलेल्या नव्या प्रयोगाच कौतुक झालं. यात त्याने किशोरकुमार संधी दिली होती. एसडीच्या गाण्याच्या रेकोर्डिंग वेळी पंचमची किशोर कुमारसोबत मैत्री झालेली. त्याच्यातल्या खरा गायक पंचमनेचं ओळखला होता. पडोसन मुळेचं किशोर कुमारने जगासमोर सिद्ध केलं की आपण पार्टटाईम सिंगर नाही तर रफी, मुकेशच्या तोडीचा गायक आहे.  

hqdefault

आर डीचं असं स्वतःच फिल्मी करीयर चालू होतं. पण अजूनही तो मुख्यतः वडिलाना मदतच करत होता. अशातच एसडी बर्मनचं एका सिनेमाच रेकोर्डिंग सुरु होतं. सिनेमाच नाव होतं आराधना. डायरेक्टर होते शक्ती सामंता. हिरो होता राजेश खन्ना. एसडीनी काही गाण्यांची रेकोर्डिंग आपल्या लाडक्या रफीच्या आवाजात केली होती.

पण एकदिवस अचानक त्यांची तब्येत खालवली. सिनेमाच संगीत निम्म्यात बंद पडणार अशी वेळ आली. तेव्हा त्यांनी उरलेली गाणी पूर्ण करायची जबाबदारी पंचमवर सोपवली. त्याला रफी बद्दल आदर होता पण त्याच्यामते राजेश खन्नाला किशोरचा आवाज जास्त सूट होतो. त्याने उरलेली गाणी रफीच्या ऐवजी किशोरच्या आवाजात रेकॉर्ड केली.

पिक्चर रिलीज झाला. संगीताच क्रेडीट एसडी बर्मन यांनाच देण्यात आलं होतं. कोणालाही अपेक्षित नव्हत पण सिनेमा सुपरहिट झाला.  रूप तेरा मस्ताना, कोरा कागज था ये मन मेरा ही गाणी तर गाजलीच पण राजेश खन्ना आणि शर्मिला टागोरवर रेकॉर्ड झालेलं मेरे सपनोकी राणीने सगळे रेकॉर्ड तोडले. या गाण्याने राजेश खन्ना, किशोर कुमार आणि पंचम या तिघांनाही सुपरस्टार बनवलं.

याच सिनेमान सिद्ध केलं होत की पोरग बाबाच्या सावलीतून बाहेर आलं आहे. आता आर डी बर्मनचं युग सुरु होतंय. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.