आर. माधवनच्या मुलाने गोल्ड मेडल मिळवत पुन्हा एकदा देशाचं नाव मोठ्ठं केलंय

बॉलीवुडमधले स्टार सेलिब्रिटी आणि त्यांचं स्टारडम हे कायमच चर्चांचे विषय असतात. हे कमी म्हणून की काय, तर हल्ली त्यांचे स्टार किड्स सुद्धा प्रकरणं गाजवत असतात.

पण एका स्टार कीड ने मात्र सगळ्यांना अभिमान वाटावा अशी एक कामगिरी केलीये.

होय, आम्ही बोलतोय ते प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता आर. माधवन याच्या मुलाबद्दल. त्याने अशी कोणती कामगिरी केलीये, सांगतो.

आर माधवनचा मुलगा म्हणजेच वेदांत माधवन एक उत्तम स्वीमर आहे आणि त्याने Danish Open 2022 ह्या कॉम्पटिशनमध्ये, स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये थेट गोल्ड मेडल पटकावलंय.

ह्या आधी वेदांतने स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल सुद्धा पटकावलं होतं, आणि आता गोल्ड जिंकून त्याने देशाचं नाव लय मोठ्ठं केलंय.

पोराच्या कामगिरीवर खुश होत आर. माधवनने त्याच्याविषयी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिलीये. शिवाय त्याने सगळ्यांच्या मिळालेल्या आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल सगळ्यांचे आभारही मानलेत.

आर माधवन ने एक व्हिडिओ शेअर केलाय. वेदांत माधवनला गोल्ड मेडल घालतानाचा तो व्हिडिओ आहे. दरम्यान ह्या व्हिडिओत वेदांत, सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतोय आणि त्यामुळे ह्या विडिओनेही सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत.

वेदांतने हे गोल्ड मेडल ८०० मिटर स्विमिंगमध्ये ८:१७.२८ सेकेंदात पटकावलंय.
तसंच ह्या आधी जिंकलेल्या सिल्व्हर मेडल विषयी सुद्धा आर. माधवनने व्हिडिओ शेअर करतच ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. ज्यात वेदांतने १५०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत अवघ्या १५.५७.८६ सेकंदात हे सिल्व्हर मेडल पटकावलं होतं.

मागच्या वर्षी झालेल्या एका पोहोण्याच्या स्पर्धेत वेदांतने तब्बल ७ मेडल्स पटकावली होती. बंगलोरला झालेल्या ४७ व्या Junior National Aquatic Championships म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी ही मेडल्स पटकावली.

या मेडल्समध्ये ४ सिल्वर आणि ३ ब्रॉन्झ मेडल्सचा सामावेश होता. वेदान्तने, ८०० आणि १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, ४ × १०० आणि ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीलमध्ये सिल्वर मेडल तर १००, २०० आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं.

इतकच नाही तर वेदांतने त्याच्या बाराव्या वर्षी, २०१८ साली Thailand Age Group Swimming Championship मध्ये सुद्धा भारतासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं.

वेदांतच्या आत्ताच्या कामगिरीबद्दल आर माधवनचे फॅन्स आणि फिल्म इंडस्ट्रीतले अनेक जण वेदांतवर सोशल मिडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव करताना दिसतायत.

आता बॉलीवुडमध्ये असे अनेक स्टार अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत ज्यांची मूलं सरळ बॉलीवुड इंडस्ट्रीतच आपलं नशीब आजमावायला जातात. कधी बाय चॉईस तर कधी नाईलाज म्हणून.

पण आर माधवनला त्याच्या मुलाविषयी विचारलं असता, तो म्हणतो की,

“मी आणि माझ्या बायकोने पहिल्या पासूनच वेदांतला त्याला जे हवं ते करण्याची मुभा दिली. प्रत्येक बापाने करायला हवा, अगदी तसाच सपोर्ट केला. त्याला कसलच बंधन घातलं नाही आता रिजल्ट्स आपल्या समोर आहेत. माझा मुलगा माझं नाव मोठं करणार हयाबद्दल मला कसलीच शंका वाटत नाही.”

वेदांत आत्ता फक्त १६ वर्षांचाच आहे. आणि तो त्याच्या लहान वयापासूनच त्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेतोय. ऑलिंपीक चॅम्पियनशिप गाजवणं हे वेदांतचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. मध्यंतरी कोविडच्या काळात मुंबईतले बरेचसे मोठे स्विमिंग पूल्स लॉकडाऊनमुळे बंद होते. आणि यामुळेच वेदांतच्या प्रॅक्टिसमध्ये मोठा अडथळा आला होता. त्यावेळी आर. माधवनने आणि त्याच्या बायकोने वेदांतसोबत दुबईला शिफ्ट होण्याचा मोठा निर्णयही घेतला होता.

सगळेच स्टार किड्स वाया जात नाहीत ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर. माधवन चा मुलगा.

वेदांतने आणि बरोबरीने त्याच्या आई वडिलांनी सुद्धा त्याच्यासाठी घेतलेल्या मेहेनतीचं खऱ्या अर्थाने चीज होताना आता दिसतंय. आणि वेदांत आपल्या स्टार बापाचं नाव, एक स्टार स्वीमर होऊन अजून मोठं करणार आहे हे फिक्स.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.