२६/११ मुळे आबांवर टिका करता पण त्यांनीच शहिदांच्या मुलांना सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या..
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज १२ वर्ष पूर्ण झाली. २६/११ म्हणल्यानंतर आठवतात ते शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह मुंबई पोलीस दल, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस यांचा दहशतवादी विरोधी लढा.
प्राणांची बाजी लावून या योद्धांनी मुंबई वाचवली होती. त्याचसोबत आठवतात ते तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील.
आर. आर. पाटील ऊर्फ आबांनी तेव्हा बडे बडे शहरों में अस विधान केलं होतं. याच एका गोष्टीवरून कधीही डाग न लागणाऱ्या आबांवर टिका झाली. राजीनामा देण्याची वेळ आली. लोकांनी देखील आबांना त्याच एका वाक्यावर लक्षात ठेवलं. चुकीच्या गोष्टी देखील लक्षात ठेवाव्याच पण त्याचसोबत एखाद्या माणसानं चांगल केलं असेल तर तेही लक्षात ठेवाव म्हणूनच का किस्सा…
२६/११ च्या भ्याड हल्यात प्राणांची बाजी लावून लढणाऱ्यापैकीच होते,
तुकाराम ओंबळे आणि बापूसाहेब धुरगुडे.
तुकाराम ओंबळे यांनी तर स्वत:चा जीव देऊन अजमल आमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला धडधडत्या बंदुकीसह जिवंत पकडले होते तर बापूसाहेब धुरगुडे हे ही त्याच भीषण हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडले.
या हल्ल्यानंतर शहीद झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांच्या घरातील कर्ता माणूसच गेला होता. परिवारावर दुःखाचा डोंगर असताना भविष्याचा देखील मोठा प्रश्न समोर होता.
अशा वेळी या कुटुंबियांना मदतीचा हात आणि भविष्याची सुरक्षितता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शहीद झालेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्यास प्रथम किंवा द्वितीय वर्ग श्रेणीमधील शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली.
या हल्ल्यात शहिद झालेल्या तुकाराम ओंबळे यांच्या मुलींना तर बापूसाहेब धुरगुडे यांच्या मुलीला या निर्णयानुसार क्लास वन किंवा क्लास टू नोकरी मिळण्याची अपेक्षा होती.
तुकाराम ओंबळे यांच्या वंदना, वैशाली आणि भारती या मुली शिकत होत्या तर बापूसाहेब धुरगुडे यांची मुलगी पूनम या देखील महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. यानुसार कुटुंबियांमधील एका व्यक्तीस शासन सेवेत सामावून घेण्याची तरतूद २० जानेवारी २००९ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली.
मात्र तरीही,
शहीद बापुसाहेब धुरगुडे यांची मुलगी पुनम धुरगुडे यांना २४ जून २००९ पासून मुंबई पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या वर्ग तीनच्या पदावर नियुक्ती देण्यात आली. तर शहीद तुकाराम ओंबाळे यांची मुलगी भारती ओंबाळे यांना देखील वर्ग तीनच्या पदावर नियुक्ती देण्यात आली.
प्रथम किंवा द्वितीय वर्ग श्रेणीमधील शासन सेवेत सामावून घेण्याबाबतची तरतूद असतानाही नोकरशाहीने मात्र या दोघींना अनुकंपा तत्त्वावरील श्रेणी तीन आणि चार मधील पदाची नोकरी दिली होती. त्यामुळे साहजिकच अन्यायाची भावना मनात घर करून गेली.
त्यानंतर पितृछत्र गमावल्याचे संकट कोसळलेल्या बिकट अवस्थेतही भारती ओंबळे या एमकॉम झाल्या. तर पूनम यांनी देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले.
त्यानंतरही खालच्या श्रेणीची नोकरी करीत राहणे दोघींच्या मनाला पटत नव्हते.
प्रकरण पुन्हा गृहमंत्री पाटील यांच्याकडे गेले.
त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे स्वतः विनंती केली.
यानंतर भारती ओंबाळे यांनी देखील आर. आर. पाटील यांची भेट घेतली, तेव्हा पुन्हा त्यांनी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेले. लागलीच त्याला हिरवा कंदील मिळाला.
लढाई जिंकल्यावरही भारती मोठ्या पदाची जबाबदारी घ्यायला बिचकत होत्या. तेव्हा आबांनी वडिलांच्या मायेने त्यांना जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत धीर दिला. त्यानंतर भारती यांनी उपजिल्हाधिकारी पद स्वीकारले.
मुंबई शहरावर झालेला हा हल्ला ही एक अपवादात्मक घटना असून त्यामध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या तडकाफडकी आणि प्रामाणिक कामासाठी परिचित असलेल्या आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन शाहिद कुटुंबियांवर झालेला अन्याय दूर केला.
हे हि वाच भिडू.
- प्रत्येक घरातील एक माणूस देशासाठी शहिद : महाराष्ट्रात आहे शहिदांच गाव.
- नमस्कार मी आबा म्हणजेच आर. आर. पाटील.
- २६/११ : यांच्या एका घोषणेमुळे वाचले होते शे-पाचशे जणांचे प्राण.