आबा म्हणाले, “अजित दादा कौतुक करतात की सालटी काढतात हेच कळत नाही.”

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके आबा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला गरीब घरातला ग्रामीण भागातला हा तरुण उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचला ते फक्त आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर.

शाळा कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धा गाजवणाऱ्या आर आर पाटलांना पहिली राजकीय संधी वसंतदादा पाटलांनी दिली तेही त्यांचं भाषण ऐकूनच. खास ग्रामीण ढंगातील म्हणी वाक्प्रचार वापरून आबा बोलायला लागले कि जनतेसाठी ती पर्वणी असे. त्यांचे दीर्घ पॉज आणि त्यानंतर दिलेला पंच हा टाळ्यांच्या कडकडाटाने गाजायचा.

गल्ली ते मुंबई सगळीकडे आबांची भाषणे गाजली.

विधानसभेत विरोधी बाकांवर असताना त्यांनी युती सरकारची अनेकदा केलेली नाके बंदी, पुढे सत्तेत आल्यावर ग्रामविकास मंत्री म्हणून केलेली अभयसंपुर्ण भाषणं देखील प्रचंड गाजली. याच भाषणांमुळे शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये अनेक वजनदार नेते असतानाही आर.आर.पाटलांनी राज्याचं गृहमंत्रीपद सोपवलं.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या भाषणांचा संग्रह ‘बिकट वाट, नाजूक गाठ’ या नावाने नुकताच प्रकाशित झाला.

आर आर आबा तेव्हा हयात होते. ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी त्यांच्या भाषणांचे संकलन केले होते. आबांनी गृहमंत्री म्हणून विधानसभा आणि विधान परिषदेत दिलेली उत्तरे, राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमात केलेली भाषणे यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला होता.

प्रकाशनसोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्रिपदाची चव चाखलेले जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमातील सर्वांचीच भाषणे रंगली. हा रंगारंग सोहळा पाहण्यासाठी आबा मात्र उपस्थितीत नव्हते.

आबांना प्रसिद्धीची कशी नॅक सापडली आहे, हे सांगताना दादा म्हणाले होते,

प्रसिद्धी कशी मिळवावे यांचे तंत्र आबांना बरोबर माहीत आहे. गृहखात्याची चर्चा ते दिवसभर होऊ देतात. चर्चा पार उशिरापर्यंत चालते. पण उत्तर मात्र आबा दुस-या दिवशी सकाळी दहा वाजता देतात. कारण त्यावेळी सगळे पत्रकार उपस्थितीत असतात. आपल्याला हे कधी जमले नाही. आम्ही आपले उठतो आणि रात्री एक वाजताही उत्तर देतो. एक ओळही छापून येत नाही. उत्तरात हेडलाइन काय द्यायची तेही आबा आधीच ठरवून टाकतात.

आबांच्या या बोधवाक्यांचाही एखादा संग्रह प्रसिद्ध करावा, अशी सूचना दादांनी डॉ. भोंगळेंना केली.

त्यानंतर छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी केलेली भाषणेही आबांची वक्तृत्व कौशल्याची स्तुती करीत असतानाच गृहमंत्रिपदाचा काटेरी मुकुट सांभाळणे किती अवघड आहे, हे सांगणारी होती.

भुजबळ तर म्हणाले, एकदम थँकलेस जॉब आहे. तिकडे बलात्कार करायचा कुणी तरी उत्तर द्यायचे गृहमंत्र्यांनी, दरोडा टाकायचा चोरांनी आणि उत्तर द्यायचे गृहमंत्र्यांनी, लाठीमार झाला तर का झाला आणि नाही केला तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असे सांगत भुजबळ यांनी आपले शैलीदार भाषण केले.

पण आबांच्या बोध वचनाचा विषय तिथेच संपला नाही.

पुस्तक प्रकाशनाच्या दुस-याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. ग्रामपंचायतीची निवडणूक लढविताना शिक्षणाची अट असावी, असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला होता. त्यावर आबांनी आपल्या स्टाइलमध्ये मत मांडायला सुरुवात केली.

त्यांचे ते बोलणे कौतुकाने पाहणाऱ्या दादांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि त्यांनी आबांना जोरदार कोपरखळी मारली.

‘आबा आता मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या भाषणांचाही एक संग्रह काढा.’

त्यावर गप्प बसतील ते आबा कसले? त्यांनी तितक्याच खुबीने उत्तर दिले. पुस्तक केव्हा काढायचे ते बघू. मात्र जेव्हा ते पुस्तक निघेल त्यावर दादा तुम्ही भाषण करू नका. तुम्ही भाषण करताना माझी स्तुती करता की सालटी काढताय, तेच कळत नाही’ त्यावर मंत्रिमंडळ बैठकीतही हास्यकल्लोळ झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.