दुष्काळी जनतेला स्मरण करून आपली पहिली शपथ घेणारा नेता या विधानसभेने पाहिलाय
१९९० च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली होती. काँग्रेसचंच सरकार स्थापन होणार होतं. पण हा निकाल ऐतिहासिक होता. काँग्रेस साठी नाही तर शिवसेना आणि भाजप साठी.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे आणि भाजपचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले होते. गेल्या वेळी फक्त १ आमदार निवडून आलेलय शिवसेनेचे यंदा ५२ आमदार होते. त्यांनी विधिमंडळात एंट्री केली तीच एकदम धडाक्यात.
१९ मार्च, १९९० रोजी विधान सभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अख्खे विधान भवन भगवामय झाले होते. विधानसभेत ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे नारे घुमू लागले. गणपतराव देशमुख हे अस्थायी अध्यक्ष होते. त्यांनी शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात केली.
एक..एक सदस्य येऊन शपथ घेत होते. प्रत्येक जण आपआपल्या परीने शपथ घेत होता. कोणी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत होता. तर कोणी ‘हिंदू हृदयसम्राट’ कोणी आपआपल्या गुरूंना वा पक्षप्रमुखांना उद्देशून शपथ घेत होते.
पुढची घोषणा झाली.
एक तरुण सदस्य उभे राहिले. साधे कपडे, छोटी उंची, वय असेल ३०-३५. या उत्साही आमदारांनी शपथ घेतली.
मी रावसाहेब रामराव पाटील महाराष्ट्रातल्या दुष्काळी जनतेला स्मरण करून अशी शपथ घेतो कि…
सगळं सभागृह चाट पडलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. खुद्द मुख्यमंत्री शरद पवार कौतुकाने पाहत होते. विरोधकांपैकी कोणी तरी विचारलं हे आमदार कोण? पश्चिम महाराष्ट्राला एक नेता उत्तरला,
“अरे हे तर आबा, आर आर पाटील. काँग्रेसचे तासगावमधून निवडून आलेले आमदार.”
आपल्या आमदारकीच्या पहिल्याच दिवशी आर आर पाटलांनी विधानसभा गाजवली. सगळ्यांच्या तोंडात त्यांचंच नाव होतं. त्या दिवसापासून विधिमंडळ कामकाजातील त्यांचे वेगळेपण दिसू लागले.आबांनी सभागृहातील कामकाजाला सुरुवात करताना प्रथम विधिमंडळाच्या ग्रंथालयात येऊन आपल्या संसदीय अभ्यासाला सुरुवात केली.
आर आर पाटलांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. तासगाव तालुक्यातल्या एका साध्या शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या आबांनी गरिबी अनुभवली होती. सांगली जिल्ह्यातील हा दुष्काळी भाग. शेतकऱ्यांना तिथे कोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात हे त्यांनी अनुभवलं होतं.
प्राचार्य पी बी पाटील यांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन मध्ये ते शिकले.
महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका या योजनेत करत त्या पैशातून वही पेन पुस्तक खरेदी करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. दुष्काळी भागातल्या गरिब शेतकरी कुटुंबातील पोराला शिक्षण घ्यायला जो संघर्ष करायला लागतो तो आबांच्या वाटयाला आला.
पुढे राजकारणात आले जिल्हापरिषदेचे सदस्य बनले, आमदारकी देखील जिंकली पण हा साधेपणा त्यांनी सोडला नाही. ना शेतकरी कुटूंबाला सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा ते विसरले नाहीत. या सगळ्या संघर्षाला सलाम म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच शपथविधीला दुष्काळी शेतकऱ्यांचे स्मरण केले.
हे ही वाच भिडू
- “अशा बाहेर चर्चायत”, आबांनी हे तीन शब्द लिहले आणि आमदारकी वाचवली..!!!
- नमस्कार मी आबा म्हणजेच आर. आर. पाटील.
- सांगली जिल्ह्यास द्राक्षभूमी बनवणारा अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला..