आबांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला, कर्नाटकवाले अटकेची मागणी करू लागले..

सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे राज्यात गोंधळ सुरु झालाय. कारण ठरलं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल वापरलेलं आक्षेपार्ह वक्तव्य.

झालं असं की नारायण राणे  जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका केली.

ते म्हणाले,

“त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.”

राणे यांच्या या वक्तव्यामुळेच त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाले आहेत. त्यांना अटक होईल न होईल हि गोष्ट नंतरची. राजकीय वक्तव्यामुळे नेतेमंडळी अडचणीत येण्याची हि पहिली घटना नाही. यापूर्वी देखील असेच प्रसंग आले आहेत.

एकदा तर चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या विरुद्ध कर्नाटकात अटकेच्या मागणीने जोर धरला होता.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद खूप जुना आहे. बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी जोर धरत होती. थोर क्रांतीकारक सेनापती बापट यांच्या प्राणांतिक उपोषणापासून अनेक आंदोलने उभारली. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई असे अनेक पंतप्रधान बदलले पण कोणालाही तोडगा काढता आला नाही.

ऐंशीच्या दशकात सीमाभागात कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती सुरु केली. या विरोधात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असे मोठमोठे नेते एकत्र येऊन आंदोलन उभारण्यात आलं. भुजबळांना अटक झाली. पेटतच राहिला.

नव्वदचं दशक ओलांडून गेलं. दोनहजार साल उजाडलं तोपर्यंत इकडे कर्नाटकाने कानडीकरणाचा सपाटा सुरु केला होता.

केवळ जिल्ह्याचे ठिकाण नाही म्हणून बेळगाव महाराष्ट्राला देता येणार नाही, असे त्यावेळी म्हणजे राज्य पुनर्रचनेच्यावेळी सांगणाऱ्या कर्नाटक सरकारने बेळगाव वरचा दावा मजबूत करण्यासाठी २००६ साली एक खेळी खेळली.

तेव्हा कर्नाटकात जनता दल आणि  सरकार होते. मुख्यमंत्री होते देवेगौडा यांचे सुपुत्र कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्री होते बी.एस.येडियुरप्पा.

कुमारस्वामी यांनी कर्नाटक विधानसभेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बेळगावला बोलवले. या अधिवेशनामुळे बेळगाव हे कर्नाटकाचेच आहे यावर त्यांचा दावा मजबूत होणार होता. या अधिवेशनावरून सर्वत्र खळबळ उडाली. सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीने यावर आवाज तर उठवलाच पण याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले.

तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांना कर्नाटक सरकारच्या या खेळीवरून प्रचंड राग आला.

सरकारच्या अधिवेशनाविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. आरआर आबा मुख्य पाहुणे होते. त्यांनी कर्नाटक सरकारवर घणाघाती टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी कर्नाटकचे त्या वेळचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा बापच काढला. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत असेल तर त्यांना कडक भाषेतच उत्तर द्यावे लागेल असं आबांचं म्हणणं होतं.

आर आर पाटलांचं हे भाषण प्रचंड गाजलं. मात्र दुसऱ्या दिवशी कर्नाटक विधानसभेत या प्रकरणी मोठा गदारोळ झाला. कुमारस्वामींनी तर आबांच्या नावाने मोठा थयथयाट केला! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कर्नाटकात येऊन आमच्या राज्याविरुद्ध टीका करतात. आमचा बाप काढला जातो हे योग्य नाही.

इतर राज्यातील नेत्यांनी आमच्या अंतर्गत गोष्टीत नाक खुपसू नये असा इशारा देखील त्यांनी दिला. हा विषय केंद्रात घेऊन जाण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर  कर्नाटकमध्ये आमदारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक करा म्हणून जोरदार मागणी केली. आबांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल. त्यांना अटक झाली नाही पण आर आर पाटील हे कन्नडिगांसाठी व्हिलन म्हणून ओळखले जाऊ लागले.

हे ही वाच भिडू 

    

Leave A Reply

Your email address will not be published.