शहीद पोलिसाच्या विधवेला मदत मिळत नाही तो पर्यंत मी अन्नाचा घास देखील खाणार नाही

आर.आर. आबांच्या पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपद देखील राखीव गोष्ट असायची. मंत्र्यांना देखील शिक्षा देण्यासारखा हा प्रकार होता. इथे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांचे पाय लागत नसत.

मात्र आपण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारत असल्याचं आर. आर. आबांनी ३१ डिसेंबर २००९ रोजी जाहिर केलं आणि आठवड्या भरात तिथला दौरा देखील केला.

हा दौरा आजवरच्या इतिहासातला पहिलाच दौरा ठरला. कारण एका पालकमंत्र्याने थेट गडचिरोलीच्या गावांचा दौरा मोटारसायकलवरून केला होता.

कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा वेठीस न लावता आबांनी दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर असा दौरा आखला. शासकिय विभागातील कर्मचारी इथे कधीच पोहचत नसतं. फक्त हजेरी लावणं आणि पगार घेण्याचा कारभार इथे चालत असे. आर. आर. आबांनी पहिल्याच दौऱ्यात गैरहजर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर निलंबन करण्याची कारवाई केली.

पहिला दौरा होता म्हणून स्टंट केला असेल असे तुम्ही टिका करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छतो की हा प्रकार एकाच दौऱ्यापुरता नव्हता. तिथून पुढे आबांच्या वेळापत्रकातील दर महिन्याचे दोन दिवस गडचिरोलीसाठी राखीव धरले जावू लागले.

भामरागड,सिरोंचा, कोरची, धानोरा, अहेरी, एट्टापल्ली अशी तालुक्यांना आबांनी भेट देण्यास सुरवात केली.

बंदुकीला बंदुकीने उत्तर देणाऱ्यातले आबा नव्हते.

आबांनी नक्षलवाद हा सामंज्यस्याने सोडवला जावू शकतो हा विचार केला. त्यासाठी आत्मसमर्पण करण्याचे प्रयत्न आबांनी राबवले. विशेष म्हणजे आर आर पाटलांच्या काळात सर्वाधिक आत्मसमर्पण घडून आले.

ज्या व्यक्तींवर नक्षलवादी संबधित असण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते अशा तरुणांवरील गुन्हे मागे घेवून त्यांनी सर्वसामान्य आयुष्य जगाव यासाठी आबांनी धडपड केली.

आबांच वैशिष्ट म्हणजे ते एकाबाजूला सर्वसामान्य लोकांसोबत बोलत असत तर दूसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणेसोबत बोलत असत. यातून नक्षलवाद्यांची दाहकता त्यांना समजून आली. गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याचा त्यांनी चंग बांधला.

त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली हे राज्यातलं अस जिल्हा पोलीस मुख्यालय आहे ज्यांच्याकडे हेलिकॉप्टर देखील आहेत.

त्यांच्यामुळे या योजनेमुळे उच्चधिकारी गडचिरोलीत पोहचू लागले. आपल्या डोळ्याने परिस्थिती पाहू लागले. याचा उपयोग असा झाला की आला कागद आणि केली सही हा शिष्टाचार बंद झाला. याच वेळी आबांनी गडचिरोलीच्या समस्येवर उपाय म्हणून स्वत: चार तासांच प्रेझेन्टेशन दिलं होतं.

पालकमंत्री कसा असावा हे आर.आर.पाटलांनी गडचिरोली जिल्ह्यात दाखवून दिलं.

याच काळातील एक हकीकत जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितली आहे.

चंद्रपूर येथे झालेल्या एका नक्षलवादी हल्ल्यात एक पोलीस कमांडो शहीद झाला होता. पण दुर्दैवाने त्याला शासनाकडून मदत मिळाली नव्हती. शहीद पोलीस कमांडोच्या विधवेने या बद्दल तक्रार केली. त्यावेळी प्रशासनाने उत्तर दिले की,

घटना घडली तेव्हा तो पोलीस कमांडो भाजी विकत घेण्यासाठी बाजारात गेला होता. त्यावेळी तो ड्युटीवर नव्हता म्हणून त्याला शासकीय मदत देता येणार नाही.

लोकसत्ताचे चंद्रपूरचे वार्ताहर देवेंद्र गावंडे यांनी हि गोष्ट प्रवीण बर्दापूरकर यांच्या कानावर घातली. पुढे एकदा आर.आर.पाटील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपूरला आले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या घरी जेवायला गेले होते. तिथे त्यांची भेट बर्दापूरकरांशी झाली. गप्पा मारताना त्या दुर्दैवी पोलीस कमांडोची कहाणी आरआर पाटलांच्या कानावर घालण्यात आली.

आबांनी लगेच देवेंद्र गावंडे यांना फोन लावायला लावला. चंद्रपूर मध्ये घडलेली घटना व इतर सर्व घटनाक्रम तपशीलवार समजावून घेतला. नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या जवानांबद्दल चालवलेला प्रशासकीय बेफिकीरीचा दृष्टिकोन आर.आर.पाटलांना जिव्हारी लागला.

त्यांनी अतुल लोंढे यांच्या घरातूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावले. त्यांनी प्रशासनाची खरडपट्टी काढली. लवकरच प्रश्न मार्गी लावू असे मोघम उत्तर येऊ लागले तेव्हा मात्र आबा खवळले. त्यांनी फोनवर धमकी दिली,

” तुमचा निरोप येत नाही तो पर्यंत अन्नाचा घास देखील खाणार नाही.”

प्रवीण बर्दापूरकर सांगतात जो पर्यंत त्या जवानाच्या विधवा पत्नीला मदत पोहचली नाही तो पर्यंत आबा न जेवता तसेच बसून राहिले. असा होता  हा सहृदयी संवेदनशील नेता. त्याच्याकडून सहज घडून येणारी हि प्रतिक्रिया होती. कधी अशा गोष्टींचं भांडवल करायचं असत हे देखील त्यांच्या गावी नव्हतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.